पुणे : ‘शनिवारवाडा हा पेशव्यांच्या इतिहासाचा मौल्यवान साक्षीदार आहे. पुरातत्त्व विभागानुसार शनिवारवाडा संरक्षित वास्तू असल्याने बांधकामासह अन्य सुविधा पुरविण्याला मर्यादा येत आहेत. मात्र, पुरातत्त्व कायद्यातील तरतुदींच्या आधारे शक्य तेवढ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल,’ असे आश्वासन केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी येथे गुरुवारी दिले.राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पाठपुराव्यानंतर शेखावत यांनी गुरुवारी शनिवारवाड्याला भेट देऊन पाहाणी केली. या वेळी शनिवारवाड्यासह अन्य ऐतिहासिक वास्तूंची माहिती देणाऱ्या बहुभाषिक ‘ऑडिओ गाइड’चे लोकार्पणही शेखावत यांच्या हस्ते झाले. पुरातत्त्व विभागाच्या संचालक श्री लक्ष्मी, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवा, पुरातत्त्व वास्तुरचनातज्ज्ञ किरण कलमदानी, इतिहास अभ्यासक कमांडर डॉ. उदय कुलकर्णी (नि.), पल्लवी गोखले यांच्यासह अन्य इतिहास अभ्यासक या वेळी उपस्थित होते.

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात पेशवे घराण्याचे मोठे योगदान आहे. शनिवारवाडा हा पेशव्यांच्या इतिहासाचा मौल्यवान साक्षीदार आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांना येथील पूर्ववैभवाचा, दिव्यतेचा अनुभव देता यावा या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील,’ असे शेखावत यांनी सांगितले.ते म्हणाले, ‘पेशव्यांचा सर्वत्र नावलौकिक आहे. शनिवारवाडा हा पेशवाईच्या देदीप्यमान इतिहासाचे प्रतीक आहे. त्यामुळेच जगभरातील पर्यटक दर वर्षी मोठ्या प्रमाणावर शनिवारवाड्याला भेट देतात. पर्यटकांना इथला इतिहास नीट समजून घेता यावा, त्यांना आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्याबाबत खासदार कुलकर्णी यांच्यासह काही इतिहास अभ्यासकांनी प्रस्ताव सादर केले आहेत. त्या अनुषंगाने शनिवारवाड्याची पाहणी करून इतिहास अभ्यासक, वारसाप्रेमींच्या भावना, अपेक्षा समजून घेतल्या.’

‘शनिवारवाडा ही संरक्षित वास्तू असून, शनिवारवाड्यासह परिसराला पुरातत्त्व कायद्याचे विविध नियम लागू आहेत. शनिवारवाड्याच्या अस्तित्वात असलेल्या बांधकामामध्ये फेरबदल करणे शक्य नाही. मात्र, कायद्याच्या अधीन राहून शक्य तेवढ्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

बांधकामांबाबत कायद्यानुसारच परवानगी’

शनिवारवाड्याच्या शंभर मीटर परिसरात बांधकामांवर बंदी आहे. याबाबत विचारले असता, गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले, ‘देशभरात कुठेही संरक्षित वास्तूच्या १०० मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करता येत नाही, तर २०० मीटर परिसरात काही काम करायचे असल्यास पूर्वमान्यता आवश्यक आहे. कायदेशीर तरतुदींनुसार याबाबत निर्णय घेतला जाईल.’

शनिवारवाड्याच्या मूळ वैभवाचा अनुभव पर्यटकांना घेता यावा, येथे अस्तित्वात असलेल्या ऐतिहासिक चित्रांचे पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी पाठपुरावा करत आहे. त्यानुसार शेखावत यांनी शनिवारवाड्याची पाहणी केली.- डॉ. मेधा कुलकर्णी, खासदार