पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२६वा पदवी प्रदान कार्यक्रम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. पदवी, पदविका, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी १ जुलै ते १४ ऑगस्ट या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १५ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. १२६व्या पदवी प्रदान कार्यक्रमात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ आणि एप्रिल-मे २०२५मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना, तसेच दूरस्थ अभ्यासक्रमाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी, पदविका, पदव्युत्तर प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. प्रमाणपत्रासाठी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना http://www.unipune.ac.in/ या संकेतस्थळाद्वारे अर्ज करून शुल्क भरता येणार आहे. अर्जासह मूळ गुणपत्रिका सादर करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ पूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी, दुय्यम पदवी-पदविका प्रमाणपत्र अर्जासह शुल्क भरण्याचा दुवा कायमस्वरूपी सुरू आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी १२६व्या पदवी प्रदान समारंभाच्या दुव्यावर अर्ज न भरता त्यांनी पुरवणी, दुय्यम पदवी-पदविका प्रमाणपत्र दुव्यावरच अर्ज भरावा, असेही नमूद करण्यात आले.