पुणे : अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली असून, पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली. आवक वाढल्याने मटार, ढोबळी मिरची, मिरचीच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी घट झाली. फ्लॉवर, घेवड्याच्या दरात वाढ झाली असून, फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (१९ मे) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून ६ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात, कर्नाटकातून मिळून ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून ४ टेम्पो घेवडा, पावटा ३ टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून ५ ते ६ टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशातून ५ ते ६ ट्रक मटार, मध्य प्रदेशातून १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा…पुणे : रिक्षा चालकाच्या चाव्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा तुटला अंगठा…

पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी ६ ते ७ टेम्पो, टोमॅटो ८ ते ९ हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गावरान कैरी ५ ते ६ टेम्पो, भुईमूग शेंग १०० ते १२५ गोणी, कांदा १०० ट्रक तसेच इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून ४० ट्रक बटाटा अशी आवक झाली.

हेही वाचा…टीईटी गैरप्रकारात सहभागी उमेदवारांना शिक्षक भरतीच्या माध्यमातून संधी? परीक्षा परिषदेने पोलिसांना दिलेल्या पत्रात काय?

घाऊक, तसेच किरकोळ बाजारात कोथिंबिर, मेथी, कांदापातीसह सर्व पालेभाज्यांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर एक लाख जुडी, मेथीच्या ६० हजार जुडी अशी आवक झाली. घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर कोथिंबीर १५०० ते २५०० रुपये, मेथी १२०० ते १८०० रुपये, शेपू ८०० ते १२०० रुपये, कांदापात ८०० ते १५०० रुपये, चाकवत ४०० ते ८०० रुपये, करडई ३०० ते ७०० रुपये, पुदिना ३०० ते ८०० रुपये, अंबाडी ४०० ते ७०० रुपये, मुळा ८०० ते १५०० रुपये, राजगिरा ४०० ते ७०० रुपये, चुका ५०० ते १००० रुपये, चवळई ३०० ते ७०० रुपये, पालक ८०० ते १६०० रुपये असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseasonal rains lead to decreased arrival and higher prices of leafy vegetables in pune prices of fruits vegetables stable pune print news rbk 25 psg