पुणे : ‘वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पती शशांक आणि दीर सुशील यांनी आई लता आणि बहीण करिष्मा यांचे मोबाइल संच फरार आरोपी नीलेश चव्हाण याच्या मदतीने लंपास केले आहेत. या मोबाइलमध्ये शशांक याने पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात,’ अशी माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयात दिली. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले.

हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (वय ३१), सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ६३), दीर सुशील राजेंद्र हगवणे (वय २७) यांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यानंतर आरोपींना बुधवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले.

‘आरोपी नीलेश चव्हाणचा शोध घेण्यात येत आहे. आरोपी राजेंद्र आणि शशांक यांची चौकशी करण्यात येत आहे. लता, करिष्मा आणि सुशील हगवणे यांचे मोबाइल संच सापडले नाहीत. मोबाइल संचांचा शोध घेण्यात येत आहे. चव्हाण आणि सुशील हगवणे गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेला संवाद, संदेश पुराव्यासाठी संकलित करण्यात येत आहेत. वैष्णवीचा मृत्यू होण्यापूर्वी शशांकने तिला पाइपने मारहाण केली आहे. आत्महत्येपूर्वी तिला चार ते पाच दिवस आधी मारहाण करण्यात आली होती. मारहाण करण्यासाठी वापरलेल्या वस्तू जप्त करायच्या आहेत. त्यामुळे शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून एक दिवसाची आणि राजेंद्र आणि सुशील यांच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केला. आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी बाजू मांडली.

गहाण ठेवलेल्या सोन्याची माहिती आरोपींनी स्वत:हून दिली

‘पोलीस कोठडीची मागणी करताना पोलिसांनी जुनी कारणे दिली आहे. सोन्याबाबतची माहिती आरोपींनी स्वत:हून पोलिसांना दिली. पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी करताना जुनीच कारणे दिली आहेत. सोन्याबाबतची सर्व माहिती यापूर्वीच आरोपींनी स्वतःहून दिली. व्यवसाय करण्यासाठी कुटुंबातील सर्वांचे सोने गहाण ठेवण्यात आले होते. सोने काढून घेतल्याची तक्रार वैष्णवी यांनी केलेली नाही,’ असे ॲड. दुशिंग यांनी युक्तिवादात सांगितले. आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी न्यायालयात दिली.