Vasant More vs Murlidhar Mohol Pune Jain Boarding House Land : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या विक्रीविरोधात उभ्या राहिलेल्या लढ्याला सोमवारी (२० ऑक्टोबर) पहिलं यश मिळालं. मुंबई येथे धर्मादाय आयुक्तालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली. धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणावर ‘स्टेटस्को’ म्हणजेच परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला आहे. या कथित जमीन विक्रीच्या घोटाळ्याविरोधात लढत असलेले शिवसेनेचे (शिंदे) नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना आता जनतेचा व इतर नेत्यांचा पाठिंबा मिळू लागला आहे. शिवसेनेचे (उबाठा) नेते वसंत मोरे यांनी देखील धंगेकर यांना पाठिंबा दिला आहे.
“एक पुणेकर म्हणून मी रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी आहे”, असं वक्तव्य वसंत मोरे यांनी केलं आहे. धंगेकर यांची पाठराखण करत मोरे म्हणाले, सत्तेत असूनही ते एखादा विषय लावून धरत आहेत, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं.”
भाजपावाल्यांनी पातळी घालवली आहे : वसंत मोरे
रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीच्या घोटाळ्याचा विषय लावून धरल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करू लागले आहेत. भाजपाकडून त्यांच्याबद्दल ‘भटकी कुत्री’ अशी टिप्पणी केली गेली. यावर वसंत मोरे यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी स्वतःची पातळी घालवली आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देऊन ते स्वतःची पातळी काय आहे ते दाखवून देत आहेत.”
“रवींद्र धंगेकर एखादी खरी बाजू मांडत असतील तर तुम्ही ती स्वीकारायला हवी. ‘भटकी कुत्री’ किंवा अन्य कुठलीही खालच्या पातळीवरील टीका करत असाल तर तुम्ही भाजपावाले लोक तुमची पात्रता दाखवत आहात असंच म्हणावं लागेल.”
“धंगेकर खरं बोलत असावेत”
“एखादी व्यक्ती खरं बोलत असेल तर तुम्ही ते ऐकलं पाहिजे. रवींद्र धंगेकर खोटं बोलत असते तर धर्मादाय आयुक्तांनी त्या व्यवहारावर स्थगिती दिली नसती. आयुक्तांनी स्थगिती दिली आहे याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय. रवींद्र धंगेकर खरं बोलत असावेत.”
…तर धंगेकर यांचं समर्थ करायला हवं : वसंत मोरे
“मी रवींद्र धंगेकर यांना ओळखतो. ते अभ्यासपूर्ण काम करतात आणि मला त्यांच्या कामाची माहिती आहे. धंगेकर यांनी एखादा विषय हाती घेतला तर ते लावून धरतात. पुण्यातील एखादी व्यक्ती, एखाद्या पक्षाचा पदाधिकारी, या शहराचा नागरिक म्हणून शहरात शांतता राहावी यासाठी प्रयत्न करत असेल, शहरातील जमिनी कोणी बळकाऊ नये यासाठी प्रयत्न करत असेल तर आपण त्या व्यक्तीचं समर्थन केलं पाहिजे.”
“मी रवींद्र धंगेकर यांच्या पाठिशी”
वसंत मोरे म्हणाले, “सदर जमीन ही जैन विद्यार्थ्यांसाठी आहे. त्या जागेवर कोणीतरी गोखले नावाचा बांधकाम व्यवसायिक येतो आणि तिथे मॉल बांधायचा प्रयत्न करतो, तिथल्या जैन समुदायाला हटवण्याचा प्रयत्न होत असेल आणि त्याविरोधात जैन धर्मीय रस्त्यावर उतरत असतील तर त्यात काहीही चुकीचं नाही. एक पुणेकर म्हणून मी रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी आहे.”