“संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय…” ‘१०० टक्के समाधानी’ वसंत मोरेंनी भेटीच्या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे चर्चांना पुन्हा उधाण

वसंत मोरेंनी राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भात व्यक्त केलेल्या भूमिकेला उघडपणे विरोध केल्यानंतर पहिल्यांच पक्षप्रमुखांची भेट घेतली.

Vasant More Mumbai Raj Thackeray
राज ठाकरेंच्या निवसस्थानी जाऊन मोरेंनी घेतली त्यांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात भूमिका घेताना भोंगे उतरवले नाही तर मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा लावू अशी भूमिका घेतलेली. या भूमिकेनंतर पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आपण मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवणार नाही असं सांगत राज ठाकरेंच्या भूमिकेविरोधात वक्तव्य केलेलं. त्यानंतर मागील काही दिवसांपासून मोरे हे पक्षावर नाराज असल्याची, ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात होती. मात्र याच चर्चांना उधाण आलेले असताना आज वसंत मोरेंनी मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन पक्षप्रमुख राज यांनी भेट घेतली. या भेटीनंतर मोरेंनी पोस्ट केलेला एक फोटो चांगलाच चर्चेत आहे.

नक्की वाचा >> “हॅलो, वसंत मोरे? मुख्यमंत्र्यांना तुमच्याशी बोलायचं आहे”; राज यांनी उचलबांगडी केलेल्या पुण्याच्या माजी मनसे शहराध्यक्षांना फोन

वसंत मोरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मी भेटीनंतर १०० टक्के सामनाधी असून समाधानी होऊनच इथून जातोय असं सांगितलं. तसेच राज ठाकरे हे उद्या ठाण्यात होणाऱ्या उत्तरसभेत सर्व प्रश्नांची उत्तरं देणार असल्याचं म्हटलंय. “सगळं बोलणं झालं आहे. उद्या ठाण्याच्या सभेला ये तुला सगळी उत्तर मिळतील असं सांगितलं आहे,” अशी पहिली प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिलीय. तसेच पत्रकारांनी तुम्ही या भेटीनंतर समाधानी आहात का?, असा प्रश्न विचारला असता, मोरेंनी, “मी १०० टक्के समाधानी आहे,” असं सांगितलं.

नक्की वाचा >> वसंत मोरे झाले मावळा तर साईनाथ बाबर छत्रपती शिवाजी महाराज; मनसे नेत्याचं ‘ते’ WhatsApp Status चर्चेत

“मी समाधानी होऊनच इथून चाललोय. मागील दोन तीन दिवसांपासून ज्या काही चर्चा होत्या त्यादरम्यानही मी सांगत होतो की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहे आणि मनसेमध्येच राहील,” असं वसंत मोरेंनी म्हटलंय. “ज्या अडचणी होत्या त्या दूर झाल्यात का?”, असा प्रश्न मोरेंना विचारण्यात आला. त्यावर, “उद्याची उत्तर सभा आहे उद्याच्या सभेत राज ठाकरे सर्व प्रश्नांची उत्तरं देतील,” एवढं मोजकं उत्तर मोरेंनी दिलं. तसेच, “बाकी जे बोलायचं आहे ते राज ठाकरे पुण्यात येऊन बोलणार आहेत,” असंही मोरे यांनी सांगितलं.

प्रसारमाध्यमांशी चर्चा केल्यानंतर दुपारी वसंत मोरेंनी राज ठाकरेंसोबतच्या भेटीतील एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये राज यांच्या उजव्या बाजूला वसंत मोरे आहेत तर डाव्या बाजूला पुण्याचे मनसे शहरप्रमुख साईनाथ बाबर दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना वसंत मोरेंनी ‘जय श्रीराम’ असं म्हटलंय. तसेच कॅप्शनमध्ये वसंत मोरेंनी, “मी माझ्या साहेबांसोबत… आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही…!” असं म्हटलंय. आता एकीकडे १०० टक्के समाधानी म्हणतानाच दुसरीकडे फोटोला वनवासाचा संदर्भ देत केलेलं भाष्य हे विरोधाभास दर्शवणारं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय.

कालच झालेल्या रामनवमीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरेंनी हे सूचक ट्विट केलं असून सध्या आपण संघर्ष करत असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे. आता उद्याच्या सभेला वसंत मोरे उपस्थित राहतात का?, राज ठाकरे उद्याच्या सभेत काय बोलतात याबद्दल सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vasant more posted photo after meeting raj thackeray at his home in mumbai scsg

Next Story
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यास ठाकरे सरकार जबाबदार : रामदास आठवले
फोटो गॅलरी