पुणे : मराठी रंगभूमीवर गेल्या सहा दशकांमध्ये ८० नाटकांतून सव्वाशेहून अधिक भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती बाळ गोसावी (वय ८३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यामागे मुलगी, जावई आणि नात असा परिवार आहे. त्या अभिनेते बाळ गोसावी यांच्या पत्नी, तर ज्येष्ठ अभिनेते राजा गोसावी यांच्या भावजय होत. भारती गोसावी यांच्या पार्थिवावर शनिवारी (२४ मे) दुपारी बारा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भारती गोसावी या माहेरच्या दमयंती कुमठेकर. घरामध्ये नाटकाचे वातावरण असल्याने त्यांचा रंगभूमीवर सहज प्रवेश झाला. संगीत सौभद्र नाटकात स्वरराज छोटा गंधर्व यांच्यासमवेत १९५८ मध्ये त्यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले. संशयकल्लोळ, मानापमान या नाटकांमधून त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. पौराणिक, ऐतिहासिक, संगीत नाटकांसह लोकनाट्य, फार्सिकल, कौटुंबिक, राजकीय, सामाजिक अशा वेगवेगळ्या नाटकांतून भूमिका करताना भारती गोसावी यांनी अण्णासाहेब किलोंस्कर, गोविंद बल्लाळ देवल, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे अशा दिग्गज नाटककारांची भाषा समर्थपणे पेलली.

बाळ गोसावी यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर पती आणि दीर राजा गोसावी यांच्यामुळे त्यांची नाट्यकारकीर्द सुरू राहिली. त्यांनी अत्रे थिएटर्स, कलावैभव, चंद्रलेखा, नाट्यमंदार संस्थांच्या नाटकांत काम केले. काशिनाथ घाणेकर, अविनाश खर्शीकर यांच्यासमवेत त्यांनी ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटकामध्ये गीताची भूमिका केली.