पुणे : ‘संगीत क्षेत्रात वाटचाल करताना आदर्श गायकाच्या गायकीचा प्रभाव पडणे स्वाभाविक असते. त्यामुळे कळत नकळत आपल्याकडूनही त्या गायकीचे अनुकरण केले जाते. परंतु, टिकून राहण्यासाठी अनुकरणापेक्षाही उपज अंगाचा वापर करणे योग्य ठरेल,’ असे मत ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांनी शनिवारी व्यक्त केले.
स्वरानंद प्रतिष्ठानच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त आशा खाडिलकर यांच्या हस्ते आशुतोष कुलकर्णी यांना केशवराव भोळे पुरस्कार, संगीत रंगभूमीवरील गायिका-अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर यांना माणिक वर्मा पुरस्कार, स्वरदा गोडबोले यांना डाॅ. उषा अत्रे-वाघ पुरस्कार आणि संतूरवादक डाॅ. शंतनु गोखले यांना विजया गदगकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी खाडिलकर बोलत होत्या. ध्वनी व्यवस्थापक राजू कांबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रा. प्रकाश भोंडे आणि विश्वस्त प्रा. अरुण नूलकर या वेळी उपस्थित होते. उत्तरार्धात पुरस्कार विजेत्या कलाकारांची मैफल झाली.
खाडिलकर म्हणाल्या, ‘आपल्या गायनात केवळ सूर आणि लय असणे पुरेसे नसून भाव असणे आवश्यक आहे. हृदयापर्यंत पोहोचते तेच संगीत काळाच्या कसोटीवर टिकते. संगीतात केवळ शास्त्र नाही, तर भावही तितकाच महत्त्वाचा आहे. माझ्या गुरूंना कोणताच संगीत प्रकार त्याज्य नव्हता. त्यांनी सातत्याने नवनिर्मितीची कास धरली आणि आम्हालाही स्वतंत्र विचार करायला शिकवले. टाळ्या मिळतात म्हणून तेचतेच न गाता, प्रयोग करा अशी शिकवण आणि प्रोत्साहन गुरूंनी दिले. त्याचे मोल आज प्रकर्षाने जाणवते.’ माधुरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. विजय मागीकर यांनी आभार मानले.