पुणे : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या पुण्यातील सुनावणीला गैरहजर राहिलेले अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी ‘पुणे बुक फेअर’च्या उद्घाटन समारंभाला गुरुवारी हजेरी लावली. सुनावणीला प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहता येणार नसल्याचा अर्ज पाटील यांनी बुधवारी वकिलामार्फत आयोगाला दिला होता. ‘पुढील सुनावणीला मी उपस्थित राहणार आहे,’ असे पाटील यांनी स्पष्ट केले.

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल असून, आयोगाचे कामकाज पुण्यातून सुरू आहे. ‘छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर गोविंद नावाच्या व्यक्तीने अंत्यसंस्कार केल्याचा उल्लेख पाटील यांच्या ‘संभाजी’ या कादंबरीमध्ये आहे. मात्र, त्या संदर्भात कोणतेही समकालीन ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नसल्याने विश्वास पाटील यांना चौकशीसाठी बोलविण्यात यावे,’ अशी मागणी वढू बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने ॲड. मंगेश देशमुख यांनी आयोगाकडे केली आहे. आयोगाने सप्टेंबर महिन्यात पाटील यांना हजर राहण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्या वेळी बिहार येथील पुस्तक महोत्सवासाठी जात असल्याचे त्यांनी कळवले. त्यामुळे आयोगाने त्यांना गेल्या सोमवारी (२७ ऑक्टोबर) उपस्थित राहण्याबाबत समन्स बजावले. पाटील सोमवारीही सुनावणीस गैरहजर राहिले. त्यानंतर आयोगाने पाटील यांना सक्तीने हजर राहण्याचा आदेश बजावला. पण, बुधवारीही ते सुनावणीस गैरहजर राहिले. पाटील आजारी असल्याचा अर्ज त्यांच्या वकिलाकडून देण्यात आला.

या पार्श्वभूमीवर, पाटील गुरुवारी ‘पुणे बुक फेअर’ या ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला हजर राहिले. ‘मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. एक विद्यार्थी असला, तरी त्याच्यासाठी शिक्षकाची नियुक्ती करायला हवी. तुम्ही पट म्हणाल तर आम्ही चीतपट करू,’ असे वक्तव्य त्यांनी या कार्यक्रमात केले.

‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतशिरोमणी तुकाराम महाराज यांची मराठी भाषा टिकणार आहेच; पण इंग्रजी शिक्षणाचे आकर्षण असलेल्या काळात मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. पट वगैरे आम्हाला मान्य नाही. मराठी शिकण्याची इच्छा असलेला एक विद्यार्थी असला, तरी त्याच्यासाठी शिक्षकाची नियुक्ती करायला हवी,’ असे पाटील म्हणाले.

ते म्हणाले, ‘मी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो आहे, आम्ही पाच विद्यार्थी होतो. त्या काळात जर पटसंख्येचा नियम लावला असता, तर मला शाळाच शिकता आली नसती. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. मराठी शाळेत एकच विद्यार्थी असला, तरी शाळा सुरू ठेवावी. एका विद्यार्थ्यासाठीही एक शिक्षक नेमला पाहिजे. कारण तो एक विद्यार्थी मराठी टिकवणार आहे.’

दरम्यान, या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, अतिरिक्त विभागीय आयुक्त स्वाती देशमुख, ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे अध्यक्ष डाॅ. संजय चोरडिया, ‘प्रसार भारती’चे इंद्रजित बागल, पुणे बुक फेअरचे संयोजक पी. एन. आर. राजन, शिरीष चिटणीस उपस्थित होते.

चौकशी आयोगाने पहिल्यांदा बोलावले, त्या वेळी मी पाटण्यात होतो. दुसऱ्यांदा बोलावले त्या वेळी आजारी असल्याने मला जावयाने विश्रांतीसाठी कोकणामध्ये नेले होते. पुढील सुनावणीला मी उपस्थित राहणार आहे.- विश्वास पाटील