लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील घटत्या पाणीसाठ्यामुळे शहरावर वाढीव पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे. जून अखेरपर्यंत पावसाला सुरुवात न झाल्यास वाढीव पाणीकपात करण्याबाबतचा गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. त्यानुसार दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची दाट शक्यता असून, त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून घेतला जाणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात पावसाला सुरूवात झाली, तरी पाणी नियोजनाचे आव्हान महापालिकेसमोर उभे राहणार आहे. त्यामुळे पाणीकपात अटळ असल्याचे स्पष्ट आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर या धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर घटला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा पावसाळा उशिरा सुरू होणार असल्याची शक्यता वर्तविली होती. उन्हाच्या वाढत्या झळा, उन्हामुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत झालेली मोठी वाढ आणि धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. सध्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे.

आणखी वाचा-पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने १७०० पुणेकरांनी केल्या तक्रारी

खडकवासला धरण साखळी प्रकल्पात ऑगस्ट अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणीकपात करण्याची गरज नाही, असा दावाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला होता. मात्र पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी, कडक उन्हामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन, समाविष्ट गावांमध्ये वाढलेली टँकरची संख्या, पाण्याची सातत्याने होणारी गळती यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. त्यामुळे पाणी नियोजनाचे आव्हान पाणीपुरवठा विभागापुढे उभे राहिले आहे. त्यातच पावसाला २३ जूननंतर प्रारंभ होईल, असा सुधारित अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्याशिवाय अन्य कोणताही पर्याय महापालिकेपुढे राहिलेला नाही.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाला सुरुवात झाली, तरी पावसाचे प्रमाण कसे राहील, याबाबत संदिग्धता आहे. त्यामुळे सावध भूमिका घेत पाणीकपात रद्द करणे योग्य ठरणार नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनीही त्याला दुजोरा दिला. पाऊस न पडल्यास जून महिन्यानंतर वाढीव पाणीकपातीबाबतचा विचार गांभीर्याने करावा लागेल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

जून अखेरपर्यंत पाऊस न झाल्यास धरणातील त्या वेळचा पाणीसाठा, हवामान विभागाचा अंदाज यानुसार पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागले. हा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून घेतला जाईल. तूर्त शहरात कोणतीही पाणीकपात करण्यात आलेली नाही. -अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता, पुणे महापालिका