लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : पुणे शहराचा पूर्वेकडील भाग अशी ओळख असलेल्या खराडी, वडगाव शेरी, विमान नगर परिसरातील नागरिकांना सध्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या भामा आसखेड धरणातील पाणी शहराला मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे.

भामा आसखेड धरणाच्या जॅकवेलमधूल केबल बुधवारी जळाल्याने लोहगाव, वडगावशेरीसह नगर रस्त्यावरील मोठ्या भागातील पाणी पुरवठा अचानक विस्कळित झाला. त्यामुळे या भागातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रात्री उशिरा केबल दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाले असून, गुरुवारी दुपारनंतर या भागातील पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र तो पर्यंत येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

भामा आसखेड धरणातून ६३ किलोमीटर अंतरावर असलेल्या पुणे शहरासाठी पाणी आणले जाते. या प्रकल्पातून २०२१ मध्ये शहराचा पूर्व भाग अशी ओळख असलेल्या खराडी, वडगाव शेरी, संजय पार्क, संपूर्ण विमाननगर, म्हाडा कॉलनी, एस.आर.ए. भाग, कुलकर्णी गॅरेज भाग, यमुनानगर, राजीव गांधी नॉर्थ व साऊथ, विश्रांतवाडीचा काही भाग, धानोरी, लोहगाव, चंदननगर, नगर रस्ता परिसरात पाणीपुरवठा केला जातो.

मागील तीन ते चार दिवसांपासून खराडी वडगाव शेरी या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे येत होत्या. गेल्या काही दिवसांपासून या भागात पाण्याच्या तक्रारी वाढल्या असून महापालिका प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. खराडी भागात अनेक नामांकित आयटी कंपन्यांची कार्यालय असल्याने हा भाग अत्यंत वेगाने वाढलेला आहे. मोठ्या संख्येने नोकरदार येथे राहतात. त्यातच पाणी कमी दाबाने येत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

त्यातच भामा आसखेडच्या जॅकवेलमधील केबल जळाल्याने पंपिंग यंत्रणा बंद पडली. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या भागातील पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. जॅकवेलच्या ठिकाणी लगेच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले, ते काम रात्री उशिरा पूर्ण झाले आहे. पण सुमारे १० तास जॅकवेल बंद असल्याने दिवसभर पाणी पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे आज गुरुवारी देखील नगर रस्ता आणि अन्य भागात पाणी पुरवठा विस्कळित असण्याची शक्यता आहे.

महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, भामा आसखेड जॅकवेलमधील केबल जळाल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या भागाचा पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. या ठिकाणी दुरुस्तीचे काम रात्री पूर्ण झाले आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply to vadgaon sheri kharadi stopped pune print news ccm 82 mrj