पुणे : नदीपात्रात डासांसारख्या कीटकांचे थवे मोठ्या संख्येने दिसून आले होते. याचे व्हिडीओही समाजमाध्यमांत पसरले होते. हे कीटक डास नसावेत, असा अंदाज कीटकशास्त्रज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे नेमके हे कीटक कोणते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कीटकांचे थवे दिसूनही महापालिकेने त्यांचे नमुने गोळा केले नाहीत. त्यामुळे महापालिका नागरिकांच्या आरोग्याबाबत किती गांभीर्याने पावले उचलते ही बाबही समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केशवनगर आणि खराडी गावठाण भागात नदीपात्रात कीटकांचे थवे दिसून आले होते. अनेक नागरिकांनी याचे व्हिडीओ काढून समाजमाध्यमांवर टाकले होते. नदीपात्रात पाण्याची पातळी वाढल्याने हे डासांचे थवे, असे उडत असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात हे डास नसावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण डास हे एवढ्या उंचीवर उडत नाहीत आणि ते एकदम एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र दिसून येत नाहीत, असे कीटकशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – बनावट खात्यांवर सीबीएसई करणार कारवाई, स्पष्ट शब्दांत दिला इशारा

याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता, कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. आरोग्य विभागाने ते डास नसावेत, असे सांगितले. प्रत्यक्षात ते कीटक नेमके कोणते होते, हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने गोळा करण्याचे कामही आरोग्य विभागाने केले नाही. त्यामुळे ते कीटक कोणते हा प्रश्न अनुत्तरित आहे. हे कीटक नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक आहेत की नाही, याचेही उत्तर महापालिकेकडे नाही. त्यामुळे महापालिका नागरिकांच्या आरोग्याबाबत किती गांभीर्याने विचार करते, ही बाब समोर आली आहे.

आरोग्य विभागाचे महापालिकेला पत्र

नदीपात्रात कीटकांचे थवे दिसून आल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी महापालिकेला तातडीने कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत. महापालिकेच्या हद्दीत डासांची संख्या वाढल्याचे वृत्त समाजमाध्यमांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे निर्देश डॉ. सारणीकर यांनी महापालिकेला दिले आहेत.

हेही वाचा – पिंपरी : तरुणाने रचला स्वत:च्याच अपहरणाचा बनाव, पोलिसांनी तासाभरात लावला छडा

कीटकशास्त्रज्ञ काय म्हणतात…

याबाबत राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप म्हणाले, की डासांचे थवे सायंकाळच्या वेळी दिसून येतात. मिलनाच्या काळात सगळ्या प्रकारचे कीटक थव्याने उडतात. हे नर कीटक असतात आणि ते मादीला आकर्षित करण्यासाठी असे उडत असतात. व्हिडीओमध्ये दिसत आहेत तेवढ्या मोठ्या प्रमाणात डासांचे थवे आतापर्यंत तरी दिसून आलेले नाहीत. याचबरोबर डास जास्त उंचीवर उडत नाही. कारण वाऱ्याचा वेग जास्त असल्यास डासांचे पंख तुटून ते खाली पडतात. त्यामुळे डासांच्या उपाययोजनांमध्ये जोरदार वाऱ्याचा वापर करण्याचाही समावेश असतो. नदीपात्रात दिसून आलेले कीटकांचे थवे नेमके कशाचे हे शोधण्यासाठी त्या कीटकांचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी करावी लागेल. त्यानंतर याबाबत ठोसपणे सांगता येईल.

नदीपात्रात दिसून आलेले थवे डासांचे नसावेत. ते डास नसण्याची शक्यता असल्याने आम्ही त्यांचे नमुने गोळा केलेले नाहीत. त्यामुळे ते नेमके कोणते कीटक आहेत, हे सांगता येणार नाही. नदीपात्रात जलपर्णी असून, त्या ठिकाणी आम्ही औषध फवारणी करणार आहोत. – डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What exactly are the insects that flying in the river bed pune mnc has no information pune print news stj 05 ssb