पुणे : ठेकेदारांमार्फत नियुक्त केलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम केले जाणार असल्याचे आमिष दाखवून रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्यानंतर महापालिकेने याबाबत सावध राहण्याचे आवाहन कंत्राटी कर्मचाऱ्यांना केले आहे. अशा प्रकारे कोणालाही कायम केले जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांची सफाई करण्यासाठी महापालिकेच्या वतीने निविदा प्रक्रिया राबविली जाते. या निविदेत सहभागी होऊन महापालिकेने निश्चित केलेल्या दरात काम करण्याची तयारी दाखविणाऱ्या ठेकेदाराला हे काम दिले जाते. रस्ते सफाईसाठी ठेकेदार कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरुपी घेतले जाणार असल्याचे सांगून पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत.
या प्रकाराची गंभीर दखल घेऊन महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी एक परिपत्रक प्रसिद्धीला दिले आहे. त्यामध्ये अशा प्रकारे कोणालाही महापालिकेच्या सेवेत कायम केले जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ठेकेदारांमार्फत नियुक्त केलेले सफाई सेवक हे केवळ मर्यादित कालावधीसाठीच काम करीत असून, त्यांना पुणे महापालिकेत कायम करण्याचा कोणताही प्रस्ताव अथवा योजना सध्या अस्तित्वात नाही, असे यामध्ये म्हटले आहे.
ठेकेदाराच्या माध्यमातून महापालिकेत साफ सफाईची कामे करणाऱ्या सेवकांनी ‘खोट्या आश्वासनांना बळी न पडता, अशा पद्धतीने स्वतःची आर्थिक फसवणूक होण्यापासून बचाव करावा,’ असे आवाहन महापालिकेने सर्व सफाई कर्मचाऱ्यांना केले आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये काम करण्यासाठी ठेकेदारांमार्फत रुजू झालेल्या सेवकांकडून पैसे घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याच्या तक्रारी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या.
त्यानंतर या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांनी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना दिल्या होत्या. त्यांनी त्याचा सविस्तर अहवाल देखील घनकचरा विभाग तसेच अतिरिक्त आयुक्तांकडे दिला आहे. असे प्रकार वारंवार घडत असून त्यामुळे सेवकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने हे पाऊल उचलत कंत्राटी सेवेत असलेल्या सेवकांना आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
महापालिकेत कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नोकरी मिळेल, असे सांगणारे दावे पूर्ण खोटे आहेत. यामधून कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहे. असे प्रकार घडल्यास कर्मचाऱ्यांनी त्याची माहिती तातडीने संबंधित विभागाला द्यावी.- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा विभाग, पुणे महापालिका