पुणे : ‘राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील जलप्रदूषणाबाबत अंससर्गजन्य आजार प्रतिबंधक विभागाकडून दररोज अहवाल सादर केला जातो. गुइले बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) उद्रेकानंतर या दैनंदिन अहवालाची अधिक बारकाईने तपासणी सुरू आहे. ‘जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर पिण्याचे शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध व्हावे, यासाठी मुख्यमंत्री ग्राम स्वास्थ्य योजना लवकरच राबविण्यात येणार आहे,’ अशी घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी केली.
आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले, ‘पाण्यापासून सगळे आजार पसरतात. पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याकडे तितकेसे गंभीरपणे पाहिले जात नाही. दुर्दैवाने ‘जीबीएस’सारखी घटना घडल्यानंतर आपण जागे होतो. अंससर्गजन्य आजार प्रतिबंधक विभागाकडून राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील जलप्रदूषणाचे अहवाल दररोज येतात. जीबीएस उद्रेकानंतर आपण त्यांची बारकाईने तपासणी सुरू केली आहे. एवढ्यावरच न थांबता जिल्हा शल्यचिकित्सक आणि आरोग्य उपसंचालक दर महिन्याला याबाबत आढावा घेत आहेत.’
‘राज्यातील शुद्ध पाण्याचा पुरवठा ग्रामीण पातळीवर व्हावा, यासाठी प्रोत्साहनपर योजना सुरू केली जाणार आहे. मुख्यमंत्री ग्राम स्वास्थ्य असे या योजनेचे नाव असून, तिची लवकरच अंमलबजावणी सुरू केली जाईल. यात ग्रामपंचायत आणि आरोग्यसेवक एकत्रितपणे शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न करतील. या योजनेत सगळ्या घटकांना सामावून घेतले जाणार असून, चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांना या योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहनपर बक्षीस मिळेल,’ असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
परिचारिका संपावर लवकरच तोडगा
‘परिचारिकांचा संप सुरू असून, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यांच्या काही मागण्या आरोग्य विभाग आणि काही मागण्या वैद्यकीय शिक्षण विभागाशी निगडित आहेत. याचबरोबर काही मागण्या या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना एकत्रित बैठक घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे या संपावर लवकरच तोडगा निघेल,’ असे आरोग्यमंत्र्यांनी नमूद केले.
पुण्यात कर्करोग रुग्णालय उभारणार
राज्यात दहा रुग्णालये उभारण्याचा प्रस्ताव एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे पाठविला आहे. यात राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये कर्करोग रुग्णालय उभारण्याचाही समावेश आहे. हा प्रस्ताव एकूण ८ हजार कोटी रुपयांचा आहे. बँकेकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.