पुणे : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस पडल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चार धरणे काठोकाठ भरली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा खडकवासला धरण साखळीमध्ये पाणीसाठा जास्त असला, तरी पाणी उपसण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. पावसाळा संंपल्यानंतर आतापर्यंत दहा दशलक्ष घन मीटर (टीएमसी) पाणी उपसण्यात आले असल्याने सध्या चार धरणांंमध्ये १९.०५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस दाखल होण्याचा विलंब, शेतीसाठी करावा लागणारा पाणीपुरवठा विचारात घेऊनच पुढील पाच महिन्यांच्या पाण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव या धरणांचा समावेश आहे. या चारही धरणांंची मिळून पाणी साठवण क्षमता २९ दशलक्ष घन मीटर (टीएमसी) आहे. यंदा पुण्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून धरणे भरल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याची चिंता कमी झाली.

जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, यंदा ७ फेब्रुवारीपर्यंत १९.०५ टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीच्या याच दिवशी ५९.०१ टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत १.८४ टीएमसी अधिक पाणीसाठा आहे. खडकवासला धरणात ०.९५ टीएमसी (४८.३१ टक्के), पानशेत धरणात ७.५१ टीएमसी (७०.५० टक्के), वरसगाव धरणात १०.०९ टीएमसी (७८.६८ टक्के), तर टेमघर धरणात ०.५० टीएमसी (१३.४० टक्के) पाणीसाठा आहे.

पावसाळा संपल्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या. मात्र, पाण्याचा मुद्दा चर्चेत नव्हता. यंदा डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवले गेले आहे. पावसाळ्यानंतरच्या चार महिन्यांत दहा टीएमसी पाणी संपुष्टात आले आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम पाणीवापरावरही होतो. तसेच जूनमध्ये वेळेत पाऊस दाखल होण्याबाबत शाश्वती नाही. तसेच याच प्रकल्पातून ग्रामीण भागालाही शेतीसाठीचा पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे शहराची तहान भागवून शेतीसाठीचाही पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी येत्या पाच महिन्यांचे पाणी नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे. त्याशिवाय महापालिका निवडणुका जाहीर झाल्यास शहरातील पाणीपुरवठ्याचा मुद्दा ऐरणीवर येणार आहे.

धरणे आणि पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

खडकवासला ०.९५

पानशेत ७.५१

वरसगाव १०.०९

टेमघर ०.५०

नाझरे – ०.३२

भाटघर – १७.६१

नीरा देवधर – ७.८१

गुंजवणी – ३.०८

पवना – ५.३८

भामा आसखेड – ५.३६

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the water storage in the khadwasla dam chain pune print news ccp 14 amy