पुणे : शहरातील मुख्य रस्त्यांसह प्रमुख चौकांमध्ये होणाऱ्या वाहतूक काेंडीला रस्त्यांवर बसणारे भाजी, फळविक्रेते, अनधिकृत पार्किंगसह इतर कारणे जबाबदार असल्याची निरीक्षणे महापालिकेच्या पथ विभागाने केलेल्या पाहणीत नाेंदविली आहेत. त्यानुसार महापालिकेचा अतिक्रमण विभाग, वाहतूक पाेलिस आवश्यक ती कारवाई करून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करणार आहेत.
शहरातील प्रमुख ३२ रस्त्यांवर हाेणारी वाहतूक कोंडी नक्की कशामुळे होते, या संदर्भात महापालिका आयुक्त नवल किशाेर राम यांनी गेल्या आठवड्यात बैठक घेतली हाेती. या बैठकीत पथ विभागाच्या २०० पेक्षा अधिक कनिष्ठ अभियंत्यांना प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी करण्याचे आदेश दिले होते. तसेच, वाहतूक कोंडी होत असलेल्या संबंधित ठिकाणांची छायाचित्रे काढण्यात आली होती. पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले हाेते. शहरांतील ३२ रस्ते आणि वाहतूक काेंडी हाेणारे २० हून अधिक चाैक यांचा सविस्तर अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आला.
बुधवारी झालेल्या बैठकीत या अहवालावर आयुक्त राम यांच्यासमोर सविस्तर चर्चा झाली. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त मनाेज पाटील, वाहतूक पोलिस उपायुक्त हिंमतराव जाधव, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित हाेते. ‘वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पाेलिस यांना तातडीचे आवश्यक ते उपाय करता येतील ते करावेत,’ असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
याबाबत अधिक माहिती देताना पथ विभागाचे प्रमुख पावसकर म्हणाले, ‘पथ विभागाच्या अभियंत्यांनी केलेल्या पाहणीमध्ये वाहतुकीला रस्त्यावरील दिव्याचे खांब, रस्त्यावरील अतिक्रमणे, अनधिकृत रिक्षास्थानके, झाडे, बेकायदा पार्किंग, भाजी विक्रेते, वाहतूक बेटे, सायकल ट्रॅक, पदपथांची अतिरिक्त रुंदी अशी अनेक कारणे आढळून आली.
वाहतूक कोंडी होत असलेल्या प्रत्येक रस्त्यांवर स्वतंत्रपणे चर्चा झाली. तातडीने उपाययाेजना करण्याचे नियोजन महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी केले आहे.
नक्की काय उपाययाेजना करणार?
- पथारी व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविणार, पर्यायी स्थळी व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार
- स्वतंत्र सायकल ट्रॅकऐवजी लाल रंग देऊन ताे भाग सायकलस्वारांसाठी उपलब्ध करून देणार
- रस्त्यावर बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार
- वाहनचालकांना वाहने लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यासाठी ३२ रस्त्यांलगत सार्वजनिक वापराचे आरक्षण असलेल्या जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देणार
- नीलायम चित्रपटगृहासमाेर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसना पार्किंगसाठी मनाई केली जाणार
- अनधिकृत रिक्षाथांब्यांचे जवळच स्थलांतर
- चौकांमधील वाहतूक बेटे, ‘आय लव्ह पुणे’ यांसारखे फलक तसेच इतर अडथळा ठरणारे सूचनाफलक काढणार