लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : कोथरूड भागातील एका सोसायटीतील सदनिकेत ज्येष्ठ महिला जळालेल्या अवस्थेत सापडली. ७६ वर्षीय महिलेने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

कमल संपतराव घुगे (वय ७६) असे मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचे नाव आहे. कोथरूड भागातील गुरूगणेशननगर परिसरातील एका सोसायटीत कमल घुगे राहायला आहेत. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सोसायटीतील रहिवांशांनी अग्निशमन दलाला संपर्क साधला. घुगे यांच्या सदनिकेतून धूर येत असल्याची माहिती रहिवाशांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

पहिल्या मजल्यावरील सदनिकेचा दरवाजा जवानांनी उघडला. तेव्हा घुगे गंभीरिरत्या होरपळल्या होत्या. सदनिकेतील साहित्याला आग लागली नव्हती. घुगे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घुगे एकट्या सदनिकेत राहायला होत्या. त्यांनी सदनिका भाडेतत्वावर घेतली होती, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे यांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. घुगे यांनी पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घुगे एकट्या सदनिकेत राहत होत्या. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याचे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman found burnt in flat suicide suspected pune print news rbk 25 mrj