पुणे : पारंपरिक आणि अध्यात्मिक महत्त्व जपत स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी झालेल्या विशेष सोहळ्यात विविध वयोगटातील तब्बल एक हजार १११ हून अधिक शंखवादकांनी एकत्र येत सामूहिक आविष्काराद्वारे सर्वांना मंत्रमुग्ध केले. एकाच वेळी एकाच ठिकाणी झालेल्या शंखनादाच्या अनोख्या मंगलमय नादाच्या विश्वविक्रमाची ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’मध्ये नोंद झाली.

हिंदुस्थानातील पहिले शंखवादकांचे पथक असा लौकिक असलेल्या केशव शंखनाद पथकाच्या वतीने शंखवादकांचा विश्वविक्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता. सात नादमय आवर्तनांद्वारे शंखवादकांनी भक्तीचे सूर निर्माण केले. ‘ब्रह्मनाद’, ‘सप्तखंड’, ‘अर्धवलय’, ‘तुतारी’, ‘पूर्णवलय’, ‘सुदर्शन’ आणि ‘मुक्तछंदनाद’ अशी सात आवर्तने शंखवादनातून सादर करीत तब्बल एक हजार १११ हून अधिक शंखवादकांनी हा विश्वविक्रम केला. प्रत्यक्षात एक हजार ४०० शंखवादक सहभागी झाले होते.

राष्ट्रीय महाकाल सेनेचे अध्यक्ष महंत योगी रोहतास नाथ महाराज, डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री किशोर चव्हाण, अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, गायक अवधूत गांधी, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, किरण साळी, छत्रपती राजाराम मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, सनिकेत ग्रुपचे रवींद्र वाणी, अविनाश वाणी, नीलेश पूरकर, बालाजी ग्रुपचे अनिल चितोडकर, नितीन चितोडकर, भूषण वाणी यांच्यासह केशव शंखनाद पथकाचे संचालक रणजित हगवणे, संजय ठाकूर, काळूराम डोमले, सुहास मदनाल, प्रभाकर चव्हाण, शैलेंद्र भालेराव, शंखनाद पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन या वेळी उपस्थित होते. ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’च्या सुषमा नार्वेकर यांनी पथकाला प्रमाणपत्र प्रदान केले.

प्रथम ‘ब्रह्मनाद’ या नादातून मानवीजीवन आणि परमात्मा यांच्यातील नात्याची आध्यात्मिक जोड दर्शवण्यात आली. त्यानंतर ‘सप्तखंड नाद’ व ‘अर्धवलय’ नादांचे सादरीकरण झाले. अर्धवलय नाद पृथ्वीच्या पाताळातील भागाचे प्रतिनिधित्व करतो. ‘तुतारी नाद’ या चौथ्या आवर्तनातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. ‘पूर्णवलय’, ‘सुदर्शन’ आवर्तनांनंतर ‘मुक्तछंदनाद’ आवर्तन मुक्त नादाच्या रूपात सादर झाले. सातही नादांच्या माध्यमातून पृथ्वीवरील सात खंड, पाताळातील अर्धा भाग आणि आध्यात्मिक एकात्मतेचे दर्शन उपस्थितांना झाले.

नितीन महाजन म्हणाले, ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे ७५० वे जयंती वर्ष, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाचे ३७५ वर्ष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५१ वे वर्ष, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे तीनशेवे जयंती वर्ष, महात्मा जोतिबा फुले यांचे १३५ वे पुण्यतिथी वर्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दीपूर्ती सोहळा यानिमित्ताने शंखनाद वि‌श्वविक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी वर्षभरापासून तयारी सुरू होती. पुण्यासह राज्यभरातून शंखवादक सहभागी झाले होते.

जानेवारीमध्ये ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ करण्याची तयारी सुरू करा. आध्यात्मिक साधना हा समाधानाचा प्रकार आहे. शंखनाद करण्याने आध्यात्मिक साधना होते. शंखातून निर्माण होणारा ध्वनी ही एक साधना आहे. – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री