पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटरचे यशस्विनी सन्मान पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते येत्या रविवारी (२२ जून) करण्यात येणार आहेत. बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होईल, असे सेंटरच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून कृषी, साहित्य, उद्योजकता, सामाजिक, क्रीडा प्रशिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत असलेल्या राज्यातील सहा यशस्विनींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

लेखिका श्यामला गरुड (छत्रपती संभाजीनगर) यांना ‘यशस्विनी साहित्य सन्मान’, विघ्नहर्ता महिला ग्रामीण विकास संस्था चालवणाऱ्या पर्यावरणस्नेही मनीषा पवार (गडचिरोली) यांना ‘यशस्विनी कृषी सन्मान’, आदिवासी, दलित, महिला, शेतमजूर, भूमिहीन आदी वंचित आणि असंघटित श्रमिकांच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या उल्का महाजन (रायगड) यांना ‘यशस्विनी सामाजिक सन्मान’, पत्रकार अलका धुपकर (मुंबई) यांना ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान’, महिलांना सोबत घेऊन शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वीपणे करणाऱ्या कमल कुंभार (धाराशीव) यांना ‘यशस्विनी उद्योजकता सन्मान’ तर कुस्ती या खेळातील निष्णात महिला प्रशिक्षक शबनम शेख (अहिल्यानगर) यांना ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ पुरस्कारांनी या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.