पुणे : वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात रविवारी पहाटे घडली. या प्रकरणी वाघोली पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
बादल शेख (वय २४, रा. खराडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बादल शेख याच्याविरुद्ध मारामारीचा गुन्हा दाखल झाला होता.
आरोपी आणि शेख यांच्यात वाद झाले होते. रविवारी पहाटे तीनच्या सुमाराश शेख आणि तीन आरोपी दुचाकीवरुन वाघोलीतील उबाळेनगर भागातील एका लाॅजवर आले होते. त्यानंतर तेथे त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. वादातून तिघांनी शेख याला मारहाण केली. त्याच्या डाेक्यात दगड घालून तिघे जण पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
