उन्हाळात चवीला गोड असणारे, लाल रसरशीत असे कलिंगड खाल्ल्याने, उन्हामुळे आलेला थकवा क्षणात नाहीसा होतो. अतिशय ‘रिफ्रेशिंग’ असे हे कलिंगड खाऊन झाल्यावर आपण त्याच्या साली कचऱ्यामध्ये फेकून देते. मात्र तुम्हाला माहित आहे का, की याच सालीच्या मदतीने तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांना संध्याकाळच्या खाऊसाठी सुंदर असे ‘पॅनकेक’ बनवू शकता.

पॅनकेक हा पाश्चिमात्य पदार्थ असून त्यामध्ये मैद्याचा वापर केला जातो. मात्र कलिंगडाच्या सालींचा वापर करून तुम्हाला अतिशय सुंदर आणि पौष्टिक असे ‘केमुन्डा दोड्डक’ हा पदार्थ बनवता येऊ शकतो. हा पदार्थ अगदी पॅनकेकसारखाच असतो, मात्र यात मैदा किंवा साखर यांचा अजिबात वापर केला जात नाही. चला तर मग हा गोड, पौष्टिक आणि मुलांना आवडेल असा पदार्थ कसा बनवायचा ते पाहू.

हेही वाचा : Recipe : सुक्क्या बोंबीलची चमचमीत चटणी; ‘ही’ सोपी कृती पाहून झटपट बनवून पाहा

केमुन्डा दोड्डक रेसिपी :

साहित्य

कलिंगडाच्या साली
गूळ ओले खोबरे
तांदळाचे पीठ
इडली रवा
मध
साजूक तूप

कृती

दोड्डक बनवण्यासाठी आपल्याला कलिंगडाच्या केवळ सालींचा उपयोग करायचा आहे. कलिंगड चिरून झाल्यानंतर जी पांढरी साल उरते ती वापरावी.

सर्वप्रथम, कलिंगडाच्या साली एका बाऊलमध्ये किसून घ्या.
किसलेल्या सालींमधे गूळ घालून घ्या. आता गूळ आणि कलिंगडाच्या साली गूळ विरघळेपर्यंत हाताने कालवून घ्या.
आता या मिश्रणात तांदळाचे पीठ, इडलीचा रवा, घालून थालीपीठाचे पीठ मळून घेतो त्याप्रमाणे या दोड्डकसाठी मिश्रण कालवून घ्यावे.
तुम्हाला जर पीठ कोरडे वाटत असेल तरच यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्या.
आता दोड्डकचे तयार झालेले पीठ १० मिनिटे झाकून ठेवा. यामुळे रवा फुलून येण्यास मदत होईल.

हेही वाचा : Recipe : थंडगार चटपटीत ‘मसाला पन्हे’! कैरीच्या सरबताला ‘असा’ द्या मिरचीचा ठसका…

गॅसवर एक तवा ठेवून त्याला थोडेसे तेल लावून घ्यावे.
आता हाताला थेंबभर तेल लावून तयार दोड्डकचे मिश्रण थालीपीठ थापतो तसे थेट तव्यावर थापून घ्यावे.
मध्यम आचेवर या दोड्डकच्या दोन्ही बाजू छान खरपूस सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावे.
दोन्ही बाजूंनी दोड्डक छान खमंग झाल्यावर एका बशीमध्ये काढून घ्या.
आता या दोड्डकवर साजूक तुपाचा घट्ट गोळा घालून, मध किंवा पातळ गुळासह आस्वाद घ्यावा.

पाश्चिमात्य देशांमधील पॅनकेक सारख्या आपल्या भारतीय केमुन्डा दोड्डकची रेसिपी आवडली असेल तर एकदा बनवून पाहा. ही रेसिपी इन्स्टाग्रामवरील @swantcookai नावाच्या अकाउंटने शेअर केली आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत १९४K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.