आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या निधनाने राष्ट्रीय पातळीवर नाव असलेले ईशान्येकडील नेतृत्व अस्ताला गेले. परदेशी घुसखोर, उल्फा बंडखोर, बोडो प्रश्न यामुळे धगधगणाऱ्या आसाममध्ये शांतता प्रस्थापित करण्यात गोगोई हे यशस्वी झाले. गोगोई यांच्या राजकीय कारकीर्दीला नगरपालिकेतून सुरुवात झाली; त्यानंतर १९७१ मध्ये ते थेट लोकसभेत निवडून गेले आणि पुढील तीन दशके ते दिल्लीच्या राजकारणातच स्थिरस्थावर झाले. आसामात तेव्हा हितेश्वर सैकिया हे काँग्रेसचे प्रभावी नेते होते व गोगोई यांना फार संधी मिळणेही शक्य नव्हते. यामुळे त्यांनी आसामपेक्षा दिल्लीलाच अधिक पसंती दिली. १९८५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आसाममध्ये शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने आसाम करार केला. आंदोलकच राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आल्यानंतर काँग्रेसला आसामची सत्ता गमवावी लागली आणि आसाम गण परिषदेचे प्रफुल्ल कुमार महंत हे मुख्यमंत्री झाले. या काळात प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व करण्याची संधी गोगोई यांना मिळाली. पण तेव्हा फार काही प्रभाव पाडता आला नव्हता. १९९१ ते ९५ या काळात पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) म्हणून गोगोई यांनी काम के ले. १९९६ मध्ये आसाममध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि त्याच काळात माजी मुख्यमंत्री सैकिया यांचे निधन झाले. नेतृत्वाची पोकळी त्या राज्यात जाणवू लागली असताना, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर गोगोई यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले. २००१च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाल्यावर मुख्यमंत्रिपद गोगोई यांच्याकडे सोपविण्यात आले. पुढली १५ वर्षे ते मुख्यमंत्रिपदी होते व आसामचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद त्यांनी भूषविले. २००१ मध्ये आसामची आर्थिक परिस्थिती सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याकरिता निधी नव्हता एवढी डळमळीत होती. उल्फा आणि बोडो अतिरेक्यांचे हल्ले वाढत होते. ही सारी आव्हाने पेलून त्यांनी आसामची गाडी रुळावर आणली. दहशतवादाला आळा घालतानाच, त्यांनी मोठय़ा प्रमाणावर विकासकामे सुरू केली. ‘शांतता आणि विकास एकत्रित झाल्याने त्याचा आसामला फायदाच झाला’ असा गोगोई यांचा दावा होता. काँग्रेसच्या राजकारणात मुख्यमंत्र्याला दोन-तीन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकू  दिले जात नसे. याला सोनिया गांधींच्या काळातील गोगोई आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित हे मुख्यमंत्री अपवाद ठरले. उभयतांनी मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक केली. काँग्रेस नेतृत्वाने गोगोई यांना मुक्त वाव दिला. मुख्यमंत्रिपदाच्या काळात पक्षांतर्गत आव्हाने उभी ठाकली. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी असताना त्यांचे एके  काळचे निकटवर्तीय व सध्या भाजप सरकारमधील प्रभावी मंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी बंडाचे निशाण रोवले. परंतु गोगोई यांनी सर्मा यांची डाळ शिजू दिली नाही. आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व पडताळणीवरून (एनआरसी) बराच वाद झाला. आसामचे उदाहरण समोर असल्यानेच राष्ट्रीय पातळीवर हा उपक्रम राबविण्यास विरोध होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोगोई यांच्या कार्यकाळातच ‘एनआरसी’चा कार्यक्र म सुरू झाला होता. पुढील वर्षांच्या सुरुवातीला होणाऱ्या आसाम विधानसभा निवडणुकीची तयारी वयाच्या ८६व्या वर्षी गोगोई यांनी सुरू केली होती. भाजपविरोधात आघाडय़ांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. करोनाचा संसर्ग झाला व त्यातून त्यांची प्रकृती खालावत गेली. काँग्रेसमधील सध्याच्या गोंधळात शांत व संयमी गोगोई यांच्यासारख्या नेत्याची आवश्यकता होती.