लेखक दिलीप एम. सरवटे यांची निधनवार्ता गेल्या आठवडय़ात आली..  हे घडले नसते, तर त्यांच्या नव्या पुस्तकाची ‘बुकमार्क’ने करून दिलेली ओळख त्यांनीही वाचली असती.. १९८२ पासून किमान २७ पुस्तके – तीही व्यवस्थापन आणि राजकीय व्यवस्थापन यांवर- लिहिणाऱ्या डॉ. सरवटे यांना आदरांजली वाहून या पुस्तकाकडे नव्याने पाहू..

‘करप्शन : इंडियन स्टाइल- अ‍ॅण्ड हाऊ टू कर्ब इट!’ असे या पुस्तकाचे नाव. अर्थात, भ्रष्टाचाराचे प्रकार सांगण्यातच या पुस्तकाची २०० हून अधिक पाने खर्च झाली असून पुढली फार तर ४५ पाने, चारच प्रकरणे भ्रष्टाचार कसा निपटावा याबद्दल चिंतन करणारी आहेत. यातही, अन्य देशांत भ्रष्टाचारविरोधी उपाय कोणते योजण्यात आले याबद्दलचे एक प्रकरण आणि अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनाबद्दलचे दुसरे आणि भारतात भ्रष्टाचाराविरुद्ध सध्या असणाऱ्या कायद्यांचा आढावा घेणारे तिसरे अशी प्रकरणे असल्याने ‘नवा उपाय’ काही या पुस्तकात नाही. पण आधीची २४ प्रकरणे, विविध क्षेत्रांतल्या भ्रष्टाचाराची रसाळ आणि बऱ्यापैकी तपशीलवार माहिती देणारी आहेत. उद्योग-व्यापार, राजकारण, नोकरशाही, न्यायपालिका, संरक्षण क्षेत्र, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पोलीस, महानगरपालिका- नगरपालिका, प्रसारमाध्यमे, धर्म, सामाजिक क्षेत्र, अशी एकंदर १३ क्षेत्रे.. मग उर्वरित क्षेत्रे आणि ‘सत्तेतील स्त्रियांचा भ्रष्टाचार’ याविषयी एक खास प्रकरण, तसेच भारतातील गाजलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांचा इतिहास देणारे आणखी एक प्रकरण अशी पुस्तकाची रचना आहे.

व्यवस्थापनाची पुस्तके जशी वाचकाला कंटाळा येऊ नये या बेताने लिहिली जातात, त्याप्रमाणे हे पुस्तकही लिहिले गेले असल्यामुळे प्रत्येक प्रकरणात दोन-तीन तरी चौकटी आहेत. उदाहरणार्थ, महापालिकांच्या भ्रष्टाचाराविषयीच्या प्रकरणात परदेशी (बहुराष्ट्रीय) ‘सल्लागार कंपन्या’ नेमताना केला जाणारा भ्रष्टाचार, अशी एक चौकट आहे. किंवा प्रसारमाध्यमांविषयीच्या प्रकरणात वृत्तपत्रांबद्दल किंवा चित्रवाणी माध्यमांच्या हेतूंबद्दल तीव्र आक्षेप नोंदवणारी, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त करणारी ‘वाचकांची पत्रे’ एका चौकटीत छापली आहेत! वास्तविक अशी पत्रे छापली गेली, हा माध्यमांच्या भ्रष्टाचारविरोधी स्वभावधर्माचा पुरावाच होय. धर्माबद्दलच्या प्रकरणात बाबा- बुवा- माताजी अशा अनेक नवनव्या ‘संतां’कडील संपत्तीचा उल्लेख आहे. क्रीडाविषयक प्रकरण अर्थातच क्रिकेटने अधिक व्यापले आहे, त्यात ‘बेटिंग आणि फिक्सिंग’ यांतील फरक समजावून देणारी एक चौकट आहे. सामाजिक क्षेत्रात ‘एनजीओं’वर टीकेची झोडच आहे आणि त्याला एनजीओंवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयीच्या बातम्यांचा आधारही आहे.

यापैकी बहुतेक प्रकरणे, २०१० सालात लेखांच्या स्वरूपात प्रथम लिहिली गेली होती. २०१४ च्या निवडणुकीनंतर त्यात भर घालण्यात आली. मूळ लेख लिहिले गेले, तोवर बंगारू लक्ष्मण हे ‘पक्षासाठी’ एका कथित दलालाकडून नोटांच्या गड्डय़ा घेतानाचे ‘स्टिंग ऑपरेशन’ सर्वाच्याच स्मरणात होते आणि लक्ष्मण यांना भारतीय जनता पक्षाच्या ‘राष्ट्रीय अध्यक्ष’पदावरून दूर व्हावे लागले आणि पुढे दिल्लीतील सत्र न्यायालयाने दोषी ठरविल्याने अटकही झाल्यामुळे त्यांचे राजकीय जीवन संपलेच होते. तरी पुस्तकात त्यांचा उल्लेख नाही. ‘टू-जी घोटाळा’ प्रकरणात काँग्रेस व मित्रपक्षांचे जे जे मंत्री वा नेते पकडले गेले, तुरुंगात गेले, त्यांची वर्णने आहेत, परंतु त्याआधीच्या टेलिकॉम घोटाळ्यात अडकलेले सुखराम किंवा टूजी परवान्यांचे नियम बनवताना भ्रष्टाचारास वाव ज्यांच्या काळात प्रथम ठेवण्यात आला ते प्रमोद महाजन यांचा उल्लेख नाही. त्याऐवजी मधू कोडा प्रकरण सविस्तर, किंवा ‘देशभरातील सर्वात भ्रष्ट राजकीय पक्ष कोणता?’ असा प्रश्न उपस्थित करून ‘शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ असे त्याचे उत्तर देणे, हे सारे डॉ. सरवटे यांच्या अभ्यासापेक्षा, त्यांचे व्यक्तिगत राजकीय पसंतीक्रम दाखविणारे ठरले आहे.भ्रष्टाचाराविषयीच्या प्रचारकी मुद्दय़ांचीही जाणही यातून काही वाचकांना येईल.

  • करप्शन : इंडियन स्टाइल- अँड हाउ टु कर्ब इट! लेखक : दिलीप एम. सरवटे
  • प्रकाशक : अभिजित पब्लिशर्स, पुण
  • पृष्ठे : २७६, किंमत : ४०० रु.