भाजपचे ‘व्यवस्थापक’ आणि युती-आघाडय़ांचे ‘नवशिल्पकार’ असे ज्यांचे वर्णन केले जाते, ते राष्ट्रीय पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीतच महाराष्ट्रातील ‘विशाल युती’चा मुद्दा भाजपने आपल्यापुरता बासनात गुंडाळून ठेवला. शिवसेना, भाजप आणि रिपब्लिकन पार्टी अशा त्रिकुटाच्या ‘महायुती’मध्ये राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सामावून घ्यायची आणि महायुतीला विशाल युतीचे स्वरूप द्यायचे, असे स्वप्न पहिल्यांदा भाजपलाच पडले. गोपीनाथ मुंडे यांना ‘विशाल युतीचे शिल्पकार’ अशी उपाधी आपल्या नावापुढे कोरली जावी, असे वाटू लागल्यानंतर त्यांनी औरंगाबादेत या स्वप्नाची वाच्यता केली. पण तेव्हा निवडणुकीचे वारेच नव्हे, तर साधी झुळुकदेखील आसपास नव्हती. त्यामुळे निवडणुकीची हवा तयार होईपर्यंत तो जिवंत ठेवण्याची जबाबदारी भाजपच्या ‘सामूहिक नेतृत्व’नीतीनुसार सर्वानाच उचलावी लागली. त्यासाठी पक्षाध्यक्ष असताना कधी नितीन गडकरींनी गुपचूप राज ठाकरे यांचे घर गाठले, तर कधी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंशी एकांतात चर्चा केली. या जबाबदारीत आपणही मागे राहू नये, म्हणून मुंबई भाजपाध्यक्षपदी निवड होताच आशीष शेलार हेदेखील राज ठाकरे यांच्या दर्शनासाठी धावले. अशा रीतीने राज ठाकरे यांनी आपल्या तंबूत यावे यासाठी भाजपच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक धुरिणांची स्पर्धा लागलेली होती, तर भाजपच्या किलकिल्या खिडकीतून कुणीही कितीही डोळे घातले तरी विचलित व्हायचे नाही असे ठरवून राज ठाकरे मात्र मूठ झाकून बसले होते. त्यामुळे शिवसेनेने टाळीसाठी पुढे केलेल्या हातालादेखील ताटकळून कळ लागल्याने अखेर तो मागे घेण्यात आला. राज ठाकरे यांच्या पक्षाने महायुतीत सामील व्हावे यासाठी असा ‘पाठशिवणी’चा खेळ सुरू असतानाच नरेंद्र मोदी यांची पक्षाच्या प्रचार प्रमुखपदी आणि नंतर पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी नियुक्ती झाल्याने पुन्हा हे प्रयत्न जिवंत करण्याचा विचार भाजपमध्ये डोके वर काढत असतानाच खुद्द पक्षाध्यक्षांनीच तो गुंडाळून टाकल्याने आता ‘विशाल युती’चा विषय आणि त्याभोवतीचे वादप्रवाद मागे पडणार असले, तरी काहीही करून मोदींना पंतप्रधानपदावर बसवायचे, हा नवा एककलमी कार्यक्रम भाजपने हाती घेतल्याने, विशाल युतीला वळसा घालून मनसेच्या मनधरणीचे नवे प्रयोग करण्याची मात्र छुपी मुभा त्यांना मिळालेली असणार, यात शंका नाही. राज  यांच्या हातात हुकमाचा एक्का आहे, त्यामुळे तो आपला ‘भिडू’ असावा, असे महाराष्ट्रात अनेक राजकीय पक्षांना वाटत असते. अगदी अंधश्रद्धाविरोधी कायदा झाल्यानंतरही, मनसेने भाजप-शिवसेनेसोबत जाऊ नये, यासाठी काही पक्ष देव पाण्यात घालून बसले असतील. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असे या राजकारणाचे सूत्र असते. पण राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या राजनीतीचे बाळकडू घेतले आहे, याची जाणीव त्या पक्षांना नसेल असे नाही. आपली मूठ झाकलेली ठेवायची आणि महायुतीच्या खिडक्यांतून होणाऱ्या खाणाखुणांकडे पाहायचेच नाही, ही त्यांची राजनीती असल्याचे आता उघड झालेच आहे. आता तर, भाजपने त्यांच्या तंबूच्या खिडक्या स्वत:च बंद करून घेतल्याने विशाल युतीचे ‘शिल्पकाम’ सध्या थांबले आहे. पण अजून निवडणुकांच्या वाऱ्यांना वेग आलेला नाही. मनसेला तर हातातील हुकमाचा एक्का वापरण्याची वेळदेखील आलेली नाही. आता साऱ्यांनाच या हुकमी एक्क्यावर नजर लावून बसावे लागणार आहे..