‘मान्सूनचे सर्वदूर आगमन’ हे वृत्तपत्रातल्या बातमीचे शीर्षक ‘मौसम का पहिला वरदान पहुंचा है सभी तक’ या कवितेच्या ओळीतही रूपांतरित होऊ शकते. ‘मान्सून उतरा है जहरीखाल की पहाडीयोंपर/बादल भीगो गये रातोरात सलेटी छतोंके कच्चे, पक्के घरोंको’ ही बाबा नागार्जुन यांची कविता आहे. जयहरी खाल हे उत्तराखंडमधल्या एका डोंगराळ भूप्रदेशाचे नाव. या कवितेतला शब्द ‘जहरीखाल’ हा त्याचा अपभ्रंश. मोसमी पावसाचे आगमन हे जणू अवघ्या सृष्टीसाठीच एक आश्वासन, वरदान असते असं सांगणारी ही कविता. पावसावर, ढगांवर नागार्जुन यांची ही एकच कविता आहे असे नाही. धिन धिन धा धमक धमक मेघ भजे/ दामिनी यह गयी दमक मेघ बजे/ दादूर का कंठ खुला मेघ बजे/ धरती का हृदय धुला मेघ बजे/ पंक बना हरिचंदन मेघ बजे/ हल्का है अभिनंदन मेघ भजे… हीसुद्धा त्यांची अशीच नाद असलेली कविता आहे. घनगर्द आभाळांचे संदर्भ असणाऱ्या नागार्जुन यांच्या अनेक कविता आहेत. मेघ त्यांच्या कवितेत जणू एक पात्र म्हणून येतात. आकाशातल्या ढगांच्या भटकलेपणाशी त्यांचे नाते असावे. त्यामुळेच मेघांविषयीचे अनेक संदर्भ त्यांच्या कवितेत पाहायला मिळतात. ‘अमल धवल गिरी के शिखरोंपर बादल को घिरते देखा है’ ही त्यांची आणखी एक कविता आहे.

बाबा नागार्जुन यांची ओळख ही पारंपरिक किंवा रूढ पद्धतीने सांगता येत नाही. वैद्यानाथ मिश्र हे त्यांचे नाव. बिहारमधल्या मधुबनी या जिल्ह्यात जन्मलेल्या नागार्जुन यांनी भटकंतीची अनिवार ओढ बाळगत अनेक मुलुख पालथे घातले. बिहार, राजस्थान, पंजाब, हिमाचल, गुजरात करत ही भटकंती थेट श्रीलंकेत जाऊन पोहोचली. अशाच भटकंतीतल्या एका वळणावर त्यांची राहुल सांकृत्यायन यांची भेट झाली. पुढे स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या नेतृत्वाखालील बिहारमधल्या शेतकरी आंदोलनात त्यांनी भाग घेतला. या आंदोलनामुळे त्यांना काही महिन्यांचा तुरुंगवास घडला. तुरुंगातून बाहेर पडून हिमालय, पश्चिमी तिबेट अशी भटकंती पुन्हा सुरू झाली. भटकण्याची ही ओढ आधीपासूनची. म्हणजे वयाच्या तेविशीत नवा परिसर, नवा प्रदेश पायाखाली घालायला त्यांनी सुरुवात केली ती वयाच्या तिशीपर्यंत.

गंगा वाहती असावी, जोगी भटकता असावा असं म्हटलं जातं. एके ठिकाणी राहणं म्हणजे संचय करणं. पायी भोवरा असल्यासारखं फिरणं म्हणजे कुठल्याही स्थानाची आसक्ती नसणं. थोडक्यात सांगायचं तर ‘एका झाडाची सवे न व्हावी, एका स्थानाची सवे न व्हावी’ असा हा सगळा प्रवास. हिंदी वाचकांसाठी ते बाबा नागार्जुन या नावाने परिचित आहेत तर मैथिली भाषेत त्यांनी ‘यात्री’ या नावाने लेखन केलं आहे. हे नावसुद्धा भटकंतीबद्दलच सांगणारं आहे. हिंदी, संस्कृत, मैथिली, बंगाली अशा भाषांमध्ये कविता लिहिणं, आंदोलनामुळे आणि लिहिण्यामुळे तुरुंगात जाणं, कुठलाही आडपडदा न ठेवता त्याकाळी थेट राजकीय भाष्य असणाऱ्या कवितांमधून लोकांचा आवाज व्यक्त करणं, बोलीची मोडतोड करून बेबंद अशी कविता लिहिणं अशा अनेक बाबतीत बाबा नागार्जुन हे नाव अजोड आहे. कधी क्रुद्ध, कधी कडवी, कधी तिरकस, कधी हळवी अशा अनेक अंगाने त्यांची कविता प्रयोगशील राहिली. एकाच वेळी संस्कृत काव्यशास्त्र आणि दुसऱ्या बाजूला थेट लोकपरंपरेशी सांगड याबाबतही भारतीय कवितेत त्यांचं नाव अपवादात्मक ठरावं.

दुष्काळानंतर खूप दिवस घरातली चूल पेटली नाही हे सांगणाऱ्या त्यांच्या एका कवितेत माणसांची भूक तर आहेच पण घरातले उंदीर, पाल, दारासमोरचा कावळा या सगळ्यांचीच अवस्था वर्णन केली जाते. असेच काही दिवस जातात. एक दिवस घरात धान्य येतं. ‘दाने आए घर के अंदर कई दिनों के बाद/ धुआँ उठा आँगन से ऊपर कई दिनों के बाद / चमक उठी घर भर की आँखें कई दिनों के बाद’… दुष्काळातल्या दिवसांचं असं चित्रण क्वचितच वाचायला मिळतं. त्या अर्थाने पाहिलं तर बाबा नागार्जुन यांची अनुभवाकडे पाहण्याची नजर वेगळी असल्याचं दिसून येतं. तीन-चार भाषांमध्ये कविता लिहिणे ही गोष्ट साधी, सोपी नाही. त्यांची कविता ही थेट लोकांशी जोडून घेणारी आहे. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर भारतातले प्रातिनिधिक ‘जनकवी’ अशी त्यांची ओळख सांगितली जाते. आपण ‘जनकवी’ असल्याचा सार्थ अभिमान त्यांच्याच एका कवितेतून व्यक्त होतो. प्रखर राजकीय भान असणाऱ्या त्यांच्या कवितेचे उदाहरण म्हणून ‘बापू के भी ताऊ निकले तीनों बंदर बापू के’ ही कवितेची ओळ सांगता येईल. त्यांच्या या प्रकारच्या कवितांमध्ये एक तिरकसपणा आहे. एकाच वेळी लोकप्रियता आणि कलात्मकता ही दोन्ही वैशिष्ट्ये त्यांच्या कवितेत आढळतात. छंद, शैली, शब्दकळा या सर्वच बाबतीत यासारखी दुसरी कविता दाखवणे कठीण आहे.

बाबा नागार्जुन यांचं कविता लेखन महत्त्वाचं आहेच, पण त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्याही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. ‘बलचनमा’, ‘उग्रतारा’, ‘वरुण के बेटे’, ‘नई पौध’ या त्यांच्या कादंबऱ्यांमधून आलेलं जीवन हे वेगळ्या भारतीय जीवनाचं दर्शन घडवणारं आहे. १९३९ साली एका शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व राहुल सांकृत्यायन आणि नागार्जुन यांनी केलं होतं. त्याचवेळी त्यांना अटक करून छपरा इथल्या कारागृहात ठेवण्यात आलं. राहुल सांकृत्यायन त्यापूर्वी अनेक वेळा तुरुंगात गेले होते पण नागार्जुन यांची ती पहिलीच वेळ होती. याच काळात राहुलजी हे आपल्या ‘जीने के लिए’ या कादंबरीचे ‘डिक्टेशन’ नागार्जुन यांना देत होते. त्यातूनच नागार्जुन यांना स्वत:च्या लिहिण्याची प्रेरणा मिळाली. १९४७ ला त्यांनी मैथिलीत पहिली ‘पारो’ ही कादंबरी लिहिली तर १९४८ साली ‘रतिनाथ की चाची’ ही पहिली हिंदी कादंबरी लिहिली. विराट अशा प्रदेशातलं, वेगवेगळ्या भागातलं लोकजीवन, त्यातली सामाजिक विविधता, विलोभनीय असा निसर्ग, स्थानिक बोलीतला ओबडधोबडपणा या साऱ्या त्यांच्या कवितेतल्या गोष्टी त्यांच्या कादंबऱ्यांमध्येही आढळून येतात. आदिम अशा निसर्गाची रूपे आणि मानवीय दृष्टिकोनातून येणारी आधुनिकता या दोन्ही गोष्टींचा समन्वय त्यांच्या गद्या लेखनातही आहे. ‘वरुण के बेटे’, ‘बाबा बटेसरनाथ’ या कादंबऱ्या वाचताना तर आपण जणू एखादं दीर्घ काव्यच वाचतोय असं वाटू लागतं.

‘बलचनमा’ ही कादंबरी प्रथमपुरुषी निवेदनातली आहे. बिहारमधल्या दरभंगा जिल्ह्यात गेल्या शतकातल्या चाळिसाव्या दशकात घडलेलं हे कथानक. एका सरंजामी व्यवस्थेचा आडवा छेद दाखवणारं. ‘बारा वर्षाचा असतानाच माझा बाप मरून गेला’ असं सांगणाऱ्या एका गुरं राखणाऱ्या पोराच्या मुखातून ही कथा सुरू होते. शेतमालकाच्या आमराईतून दोन आंबे तोडून खाल्ल्याचा अपराध असणाऱ्या बापाला ज्या सरंजामी कुटुंबाकडून खांबाला बांधून मारलं जातं, त्याच जमीनदाराकडची गुरं राखायला जाणं ही या ‘बलचनमा’ची असहायता आहे. बापाला मारताना त्याच्या अंगावर दिसणारे घाव, चेहरा काळा ठिक्कर पडत जाणं, डोळ्यातून वाहता वाहता सुकलेले अश्रू, ‘सोडा सरकार, पुन्हा असं करणार नाही’ असं म्हणत त्याचं विव्हळणं… हा प्रसंग त्याच्या बालमनावर पक्का कोरलेला आहे. कादंबरीची सुरुवातच या प्रसंगाने होते. बाप मेल्यानंतर एके दिवशी त्याची आजी त्याला त्याच कुटुंबातल्या मालकिणीकडे घेऊन जाते. मालकिणीच्या पाया पडून सांगते, हा आजपासून तुमच्याकडे कामाला राहील. तुम्हीच याचे मायबाप. तुमच्याकडचं उष्टं, खरकटं खाऊन याचं नशीब उजळेल. पण ‘बलचनमा’ इथं नशीब उजळत बसत नाही. या शोषणाच्या कराल जबड्यातून तो बाहेर पडतो. इन्कलाब, सुराज यासारखे शब्द उच्चारणंसुद्धा ज्याला नीट जमत नाही असा हा पोरगा गाव सोडतो. शोषणाविरुद्ध सुरू असलेल्या चळवळीत एका आंदोलनात सहभागी होतो. टोकाची आर्थिक विषमता आणि शोषणाविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक म्हणून ही कादंबरी वाचकांच्या लक्षात राहते. या कादंबरीची भाषा हे तिचं बलस्थान आहे. बोलीभाषेतल्या म्हणी- वाक्प्रचारांनी युक्त असलेल्या या भाषेला एक पिळदारपणा आहे.

बालपणीच्या स्मृती, बौद्ध धर्माचा स्वीकार आणि चळवळीतून तावून सुलाखून आलेलं राजकीय- सामाजिक भान यामुळे त्यांचं अवघं लेखन हे वाचकालाही एक अंतर्दृष्टी देऊन जातं. बाबा नागार्जुन यांच्या अवघ्या लेखनाचं मोल आहे ते त्यांच्या जीवनाला सामोरं जाण्याच्या बेडर वृत्तीत, चौकटीतल्या धारणा भिरकावून आपल्याच मस्तीत जगण्याच्या बेदरकारपणात, चहुदिशांनी केलेल्या भटकंतीत. बारा गावचं नव्हे तर बारा मुलखाचं पाणी चाखल्याच्या त्यांच्या आडव्या तिडव्या आयुष्यात… त्यांनी ‘जुळेल तेथे खूण जुळवली’ हे तर खरेच पण या भटकंतीतूनच कमावलेला लेखनाचा पिंड ‘तरी होतो हा तसाच उरलो’ याप्रमाणे स्वत्व राखणारा आहे.

aasaramlomte@gmail.com