ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स हा ऑस्ट्रेलियातील गुन्हेगार ऐंशीच्या दशकात मुंबईत आला. इथल्या अधोजगतावर त्याची ‘शांताराम’ या नावाची कादंबरी सगळ्यांना विविध कारणांनी माहिती. या ‘शांताराम’कर्त्याच्या दोनेक दशक आधी जिम (जेम्स) मॅसलोस या ऑस्ट्रेलियामधील अभ्यासकाने मुंबई पालथी घातली. शंभराहून अधिक वर्षांचा या शहराचा इतिहास खणून काढला. ‘द सिटी इन अॅक्शन : बॉम्बे स्ट्रगल्स फॉर पॉवर’ यासह त्यांची मुंबईवरची स्वलिखित आणि संपादित पुस्तके मात्र शहराच्या अभ्यासकांपुरतीच परिचित. फक्त चांगली गोष्ट ही की या अभ्यासकांकडून ‘बॉम्बे बिफोर मुंबई : एसेज इन ऑनर ऑफ जिम मॅसलोस’ नावाचा एक स्वतंत्र ग्रंथ झाला. सिडनेत प्राध्यापक म्हणून आयुष्य वेचलेल्या या प्राध्यापकाचे तीन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या कामाच्या स्मरणार्थ लेख येत राहतील. तूर्त या लेखकाच्या कामाबद्दल माहिती नसल्यास छत्रपती शिवाजी टर्मिनसबद्दल त्यांचा व्हिडीओ निबंध ‘व्हीटी इज ए लिमिनल स्पेस’ येथे पाहता-ऐकता येईल.

https://tinyurl.com/mc9v9 hdr

युद्धाने मारलेली लेखिका…

या आठवड्यात राजकीय लिखाणासाठी दिला जाणारा जॉर्ज ऑर्वेल यांच्या नावाचा ‘ऑर्वेल’ पुरस्कार व्हिक्टोरिया अमेलिना या युक्रेनियन लेखिकेच्या पुस्तकाला मरणोत्तर जाहीर झाला. दोन कादंबऱ्या एक बालपुस्तक आणि एक अकथनात्मक पुस्तक हा तिचा लेखनपसारा. युद्धसंहाराने होरपळणाऱ्या स्त्रियांवर तिचे संशोधन सुरू होते. त्यातूनच ‘लुकिंग अॅट वुमन, लुकिंग अॅट वॉर : ए वॉर अॅण्ड जस्टिस डायरी’ हे पुस्तक साकारले. २७ जून २०२३ रोजी रशियाने युक्रेनवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि आठवड्यात मृत्यू झाला. युक्रेन, युद्ध आणि स्वातंत्र्य यांवरचे त्यांचे विपुल लेखन ऑनलाइन आहे. मात्र मृत्युपूर्वी वर्षभर आधी दिलेले हे भाषण युद्धग्रस्ताच्या नजरेतून स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांची किंमत सांगणारे.

https://tinyurl.com/mt774wph

पुरुष बुकक्लबांना आरंभ?

गेल्या पाच वर्षांत सेलिब्रेटी महिलांनी उघडलेल्या ‘बुकक्लब्स’नी अमेरिका आणि युरोपातील पुस्तकउद्योगाला आणखी झळाळी आणली. म्हणजे काहींच्या लाखांच्या पहिल्या आवृत्त्या दहा लाखांनी येत असल्याने लेखक-प्रकाशक ते बाईंडरांपासून विक्रेत्याची यंत्रणा धनसमृद्धीच्या वाटेवर झपाट्याने चालू लागली. सेलिब्रेटींनी तयार केलेल्या आणि महिला-मुलींना समाजमाध्यमांतून आपल्या कक्षेत ओढणाऱ्या या बुकक्लबी प्रकल्पांच्या धर्तीवर पुरुषांना कादंबऱ्या वाचायला उद्युक्त करणारे पुरुषांचे नवे क्लब अमेरिकेत सुरू झालेत. ‘फिक्शन रिव्हायव्हल क्लब’ त्यातलाच. या क्लबच्या निर्मितीची कारणे आणि कथा सांगणारा लेख येथे वाचता येईल.

https://tinyurl.com/339m5rt3