विजय तांबे- कथालेखक
समाजमाध्यमांवर दररोज येणारी माहिती आपण कधी तपासून पाहिली आहे का? आपण नीट विचार करून शेवटचे कधी बोललो? एखाद्या परधर्मीयाबद्दल शेवटचा सहिष्णू विचार कधी केला? अनोळखी माणसांच्या किंवा समूहांच्या दु:ख वेदनांबद्दल आपल्याला शेवटची अनुकंपा कधी दाटून आली? दररोज होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल शेवटचा गंभीर विचार कधी केला? शासनाच्या स्पर्धा परीक्षेत नापास होणारी मुले काय करतात, मोठ्या प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या जनसमूहांचे पुढे काय होते, याची माहिती काढायचा आपण कधी प्रयत्न केलाय का? मी मतदान करणारा मतदार आहे की नागरिक? मतदार आणि नागरिक यामध्ये काही फरक आहे का?

आजच्या काळात या प्रश्नांची उत्तरे, मी कशाला शोधू? माझा काय संबंध, असे प्रश्न मनात उमटण्याची शक्यता असणारे बहुसंख्य आहेत. आजचा काळ प्रश्न विचारण्याचा नाही. प्रश्न निर्माण झाले की विचार करावा लागतो. डोक्याला त्रास द्यावा लागतो. बंधुभाव, प्रेम, आपुलकी, सहिष्णुता इत्यादी गुणांची मात्रा वाढू लागते. त्यापेक्षा जळजळीत अस्मितांच्या जहरी लाटांमध्ये मी सुखाने डुंबत राहतो. मला अस्मितेतून मोक्ष प्राप्त होणार असतो. समूह अस्मितेत मला सुरक्षित वाटते. आपल्यापैकी बहुतेकांना असे सुरक्षित वाटत असणे ही आजची वस्तुस्थिती आहे हे मान्य करायला हरकत नसावी.

आजचा भारत देश आणि स्वातंत्र्य मिळाले तेव्हाचा भारत देश यात फार फरक आहे याची स्पष्ट जाणीव होणाऱ्या अनेकांपैकी शिक्षणतज्ज्ञ कृष्ण कुमार हे एक. ‘थँक यू गांधी’ हे त्यांचे पुस्तक या जाणिवेचा शोध घेते. ही कादंबरी आहे की वैचारिक लेखन की त्यांचे फ्युजन यावर काथ्याकूट न करता कृष्ण कुमार यांना काय आणि का म्हणायचे आहे हे महत्त्वाचे.

नुकतेच स्वातंत्र्य मिळाले आहे. मध्य प्रदेशातील एका गावात दोन मित्र आहेत. बालवाडीत जाण्याच्या वयाचे. पहिला आहे वीरेश प्रताप सिंग राजघराण्यातला. दुसरा आहे कन्हैया स्थानिक वकिलांचा मुलगा. वीरेशला सगळे मुन्ना म्हणतात. गांधीजींच्या ‘नई तालीम’ संकल्पनेवर आधारित प्राथमिक शाळेत दोघेही शिकत आहेत. त्यानंतर गोष्ट वेगाने सरकत जाते. मुन्ना आयएएस होतो. त्याचे लग्न होते.

मध्य प्रदेश केडरमध्ये काम सुरू करतो. नंतर दिल्ली. सेवानिवृत्तीनंतर दिल्लीमध्येच राहतो. कन्हैया दिल्लीत प्राध्यापक आहे. थोडेफार लिखाण करतो. दोघांची मैत्री कायम आहे. मुन्नाला करोनाचा संसर्ग होतो. तो सिरियस होतो. मरण्यापूर्वी तो कन्हैयाला एक ईमेल पाठवतो. मी जगलो नाही तर माझे अर्धवट लिखाण तू पूर्ण कर. ही सगळी गोष्ट लेखकाने पहिल्या २७ पानांत आटोपली आहे. या कहाणीत वाचकाने गुंतून जावे अशी लेखकाची इच्छा नाही.

मुन्नाच्या मृत्यूने सुन्न झालेला कन्हैया त्याचा मेल परत परत वाचतो. त्या मेलला दहा फाइल जोडलेल्या आहेत. त्यातल्या एक-दोन हिंदीत बाकीच्या इंग्रजीत आहेत. फाइलची नावे ‘जी’वरून सुरू होतात. म्हणजे कदाचित गव्हर्मेंट असणार. सिव्हिल सर्व्हिसमधून निवृत्त झालेले अधिकारी चरित्र लिहितात तसेच असणार बहुतेक. त्यामुळे हे काम करावे की नाही याबद्दल कन्हैया साशंक आहे. तरीही आपल्या जवळच्या मित्राची मरणोत्तर जबाबदारी आपल्यावर असल्याने कन्हैया वाचत जातो. वाचताना कन्हैयाची बदलती प्रतिक्रिया लेखकाने मांडलेली आहे.

सुरुवातीचे संथ जीवन लिहून आसपासची बदलती परिस्थिती टिपल्यावर मुन्ना लिहितो शासनसंस्थेतील नवीन संस्कृतीने भारत ताब्यात घेतला आहे. राजकीयदृष्ट्या शापित असलेल्या देशावर मुन्नाचे हे भाष्य आहे हे समजल्यावर कन्हैया सावध होतो. या विस्कळीत लिखाणात काही स्फोटक दडले असावे, याची जाणीव झाल्यावर तो ठरवतो की फार काही तडजोडी न करता हे लिखाण आपल्याला वाचनीय करायचे आहे. शेवटच्या दहाव्या छोट्या फाइलचे शीर्षक असते ‘थँक यू गांधी’. मग एकंदर सगळ्या लिखाणाचा अर्थ लागत जातो आणि कन्हैयाला असे वाटू लागते, ‘माझ्यातील भीती आणि बौद्धिक पळपुटेपणा मी काढून टाकावा असेच मित्र मला सांगतोय.

प्रकाशकाला हवा तसा सुधारित मजकूर देऊन त्याला समाधानी करणारा संपादक मी व्हावे का? मग माझ्या लेखक असण्याला अर्थ काय? सत्य कथनाचे परिणाम काय होतील हे सांगायला मुन्ना जिवंत नाही. मात्र या अडचणीतून सुटकेचे प्रतीक गांधी आहेत. आपल्या मनात गांधींना ठेवण्याचा निर्णय कन्हैया घेतो. गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गाचा आपल्या परीने अर्थ लावण्याचे काम मुन्ना सुरू करतो. त्यातील बिंदू जोडून अपूर्णतेला पूर्णत्वाकडे नेताना त्याची हरवलेली वैचारिक सुरक्षितता त्याला परत मिळते.

या पुढील सर्व म्हणजे जवळजवळ दोनतृतीयांश मजकूर मुन्नाचे लिखाण आहे. लहानपणापासूनचे जीवन. त्यातले संस्कार. मग आयएएसमधील करिअर. मध्य प्रदेशात केलेले काम. भारत भवनची पायाभरणी. इंदिरा गांधींची हत्या. त्याची प्रतिक्रिया म्हणून उसळलेली दंगल. ‘युनियन कार्बाइड’ची गॅस गळती. बदलत जाणारा भोपाळ. राजीव गांधींच्या कारकीर्दीतील दोन महत्त्वाचे निर्णय. मंडल कमिशन लागू करणे. बाबरी मशीद प्रकरण. ते अगदी करोनाच्या आधीचे शाहीन बाग आंदोलन. या सर्व प्रश्नांची चर्चा करत बदलत्या भारताचे चित्र स्पष्ट करत नेण्याचा प्रयत्न केला आहे.

मध्येच मुन्ना गांधीजींविषयी चर्चा करतो. गांधींवरील अनेकांच्या लिखाणाची सुद्धा चर्चा करतो. गांधींची सत्याची कल्पना कुठून आली असेल, त्यांनी श्रद्धेला कसे विचारात घेतले असेल याची चर्चा करत असताना विविध धर्म विचारांतील संकल्पनांच्या घुसळणीतून गांधी विचार कसा घडत गेला याची मांडणी करताना तो एक महत्त्वाचे विधान करतो. ‘मूल्यांचे आचरण व्यक्तिगत असू शकत नाही. प्रत्येकाला स्वतंत्र केल्याशिवाय माझ्या स्वातंत्र्यमूल्याला काहीच अर्थ राहत नाही.’

गांधीजींचे रामाविषयीचे प्रेम सर्वश्रुत होते. त्यांचे शेवटचे शब्दही हे राम आहेत. मात्र जनतेला आंदोलनात खेचण्याच्या गांधींच्या क्षमतेची तुलना गुरुदेव टागोरांनी श्रीकृष्णाशी केली आहे. हाच मुद्दा पुढे नेत, गांधी आणि कृष्णाचा शेवट आणि चरखा आणि बासरी ही तुलना वाचनीय आहे. गांधीजींचे सत्य, विज्ञान, धर्म, जातिप्रथा याबद्दलचे विचार पुन्हा एकदा तपासून नव्या परिप्रेक्षात अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे. मुन्नाच्या पुस्तकाचे मूळ कारण आहे बदलते भोपाळ शहर आणि त्याला बसलेले दोन मोठे धक्के.

भोपाळच्या वायुगळतीचे मृत्यू हा पहिला धक्का आहे. पुस्तकात कन्हैया कंसामध्ये लिहितो की मुन्नाच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी प्रकाशित झालेल्या एका अहवालात मांडले आहे की भोपाळमधील कोविड पीडितांच्या मृत्यूंपैकी ७३ टक्के मृत्यू हे गॅसबाधितांचे होते. मुन्नाला प्रशासक म्हणून काम करताना आकडे लपवण्याचा खोटेपणा मनाला त्रास देत राहतो त्यामुळे लिहिता लिहिता तो मांडतो की जंतुनाशकाच्या कारखान्यात कधीही स्फोट होऊ शकतो हे राजीव कुमार केसवाणींनी १९८२च्या लेखात मांडले होते. त्याकडे दुर्लक्ष झाले. मुन्नाला बसलेला दुसरा मोठा धक्का आहे २०१९ ची निवडणूक. नथुराम गोडसेचे समर्थन करणारा उमेदवार बहुमताने खासदार म्हणून भोपाळचे प्रतिनिधित्व करू लागतो. या नव्या भारताचा मुन्नाला त्रास होत आहे. तेव्हा त्याला गांधीजींचा आधार मिळालेला आहे.

मुन्ना म्हणजे वीरेश प्रताप सिंग हा राजघराण्यात जन्मलेला असला तरी संवेदनाक्षम आणि गंभीर व्यक्तिमत्त्वाचा आहे. ‘आयडिया ऑफ इंडिया’ला भारताचा आत्मा मानणारा सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहे. त्याने अत्यंत अस्वस्थ होऊन आवेगाने लिहिलेले असले तरीही तो चिंतनशील नक्कीच आहे. या लिखाणाच्या आवेगात कधी कधी पुनरुक्ती आढळते.

अगदी नजीकच्या इतिहासातील घटना मांडल्याने तपशील अधिक हवेत, अधिक सखोल विश्लेषण हवे अशा अपेक्षा वाढत राहतात. इथे लेखकाने एका लेखकाची, त्याच्या विचाराची आणि त्याच्या संपादकाची गोष्ट सांगितलेली आहे. मात्र गोष्टीला महत्त्व फार कमी दिलेले आहे. लिखाणाची रचना गोष्ट टाळून निखळ वैचारिक टीकात्मक करणे शक्य असतानाही, ती तशी केलेली नाही. यातून लेखकाला मांडणीच्या मोकळेढाकळेपणाचे स्वातंत्र्य घेता येते आणि वैचारिक आणि तपशिलातील चर्चेला बगल देता येते.

या पुस्तकातील एक प्रसंग नमूद करण्यासारखा आहे- शेतकऱ्याप्रमाणे गांधींनी जगभर बिया फेकल्या. त्यातल्या काही आमच्या प्राथमिक शाळेत पडल्या. एकदा खैरून नावाच्या मुलीला आम्ही वर्गात चिडवले. तेव्हा शिक्षक आम्हाला म्हणाले, ‘कोणालाही चिडवणे वाईट आहे. खैरूनला चिडवणे जास्त वाईट. तिचे आई-वडील तिला घेऊन पाकिस्तानला निघाले होते.

जाताना एका स्फोटात आई-वडील मारले गेले. तिचे काका पाकिस्तानला गेले नाहीत कारण त्यांची भारतावर श्रद्धा आहे. काका तिला इथे घेऊन आले आणि आपल्या शाळेत तिला घातले.’ थोड्या वेळाने शिक्षकांनी आम्हाला बोलावून सांगितलं, ‘गांधीजींनी सांगितलेलं तुम्ही कधीच विसरू नका. तुम्ही चांगल्या हिंदूंसारखे वागलात तर प्रत्येक मुसलमान तुमचा आदर करेल.’ आपण गांधीवादी असा किंवा विरोधी, गांधींना टाळून भारतात पुढचे पाऊल टाकता येत नाही. भारत बदलला आहे असे कुठेतरी वाटत असेल तर कृष्णकुमारांचे लेखन नक्कीच स्पर्शून जाईल.

थँक यू गांधी

लेखक: कृष्ण कुमार

प्रकाशक: पेंग्विन इंडिया व्हायकिंग

पृष्ठे – २२४, मूल्य- ५९९ रुपये

vtambe@gmail.com