बालविवाह झाला असल्यास, तो रद्द ठरवा अशी मागणी सज्ञान झाल्यावर करण्याची मुभा देणारा बालविवाह प्रतिबंधक कायदा, प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘महिला डेस्क’ची सक्ती किंवा महिलांना ‘चेटकीण’ ठरवण्याची प्रथा हा कायद्याच्या कक्षेत आणून तो गुन्हा मानणे ही पावले महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक आहेत हे सर्वांनाच पटते; पण अशी पावले गिरिजा व्यास या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना- किंवा त्यांच्या हाती आयोगाची सूत्रे असल्यामुळे- उचलली जाऊ शकली, हे अनेकांना माहीत नसते. गिरिजा व्यास काँग्रेसनिष्ठ. त्यामुळे काँग्रेसद्वेषातून होणारी टीका त्यांच्यावर त्याही वेळी भरपूर झाली. स्वत:च्या राज्यात- राजस्थानात ‘आखात्रीज’च्या (अक्षय्य तृतीया) दिवशी होणारे बालविवाह त्यांनी रोखले नाहीत किंवा ‘१८ व्या वर्षाआधी झालेले कोणतेही लग्न बेकायदाच’ अशी कडक तरतूद त्यांनी आणली नाही, वगैरे टीकेच्या मुद्द्यांना व्यास यांच्याकडे उत्तरे होती. समाज बदलण्यासाठी कायद्यांचा उपयोग असला तरी सक्ती निरुपयोगी ठरू शकते, याची समज त्या उत्तरांतून दिसत असे. ‘अठरावे वर्ष पार करण्यास काही आठवडेच बाकी असलेल्या मुलींनी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध केलेला प्रेमविवाह तोडण्यासाठी बालविवाहविरोधी कायद्याचा दुरुपयोग होऊ नये’ असे सुनावण्याची धमकही व्यास यांच्याकडे होती.
‘डर मत ऐ पंछी मुझसे। साथी हूं सय्याद नही।।’सारख्या गजलेच्या ओळी गिरिजा व्यास यांनी निव्वळ जुळवल्या नव्हत्या… त्यांच्या गजलांतून, कवितांतून त्यांनी मूल्यनिष्ठाच जपली होती. चार कवितासंग्रह प्रकाशित झालेल्या, उदयपूरमधील विद्यापीठात तत्त्वज्ञान विषय शिकवणाऱ्या आणि त्यापूर्वी ‘भगवद्गीता आणि बायबल यांचा तौलनिक अभ्यास’ या प्रबंधावर पीएच.डी. मिळवलेल्या गिरिजा व्यास यांना ‘गणगौर’ पुजताना, आरतीच्या दीपज्योतीने कपडे पेटल्यामुळे भाजल्याच्या जखमांशी झुंजताना मृत्यू यावा हा योगायोग किती दुर्दैवी असू शकतात याचे उदाहरण. ‘गणगौर’ हे स्त्रीशक्तीचेच एक प्रतीक आहे, असा विश्वास देणाऱ्या पहिल्या काही महिला नेत्यांपैकी व्यास या एक होत्या (अशा नेत्यांत भाजपच्या वसुंधराराजेही होत्या, त्याही पक्षभेद विसरून व्यास यांच्या अंत्यदर्शनास आल्या होत्या). पंचाहत्तरी पार केल्यानंतर व्यास यांना गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला. बसल्या जागेवरून कुणाच्या मदतीशिवाय उठून उभे राहता येत नसे. त्यामुळे बहुधा, आरती ओवाळल्यानंतर गणगौरीच्या पुतळ्यांवर फुले वाहण्यासाठी त्या वाकल्या आणि घात झाला.
काँग्रेसनिष्ठ, गांधीवादी स्वातंत्र्यसैनिकांच्या घरात जन्मलेल्या गिरिजा यांना १९७७ मध्ये उदयपूर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्षपद मिळाले. १९९१ ते ९९ या अवघ्या नऊ वर्षांत लोकसभेच्या पाच निवडणुका होण्याइतके राजकीय अस्थैर्य असताना, पाचही वेळा व्यास यांनी उदयपूर मतदारसंघ राखला. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात माहिती व दूरसंचार खात्याच्या राज्यमंत्री. मग काँग्रेसच्या लोकसभेतील प्रतोद अशी पदे त्यांनी सांभाळली. समाजातल्या बहुसंख्यावादी प्रवृत्तीमुळे कायदे झुगारलेसुद्धा जाऊ शकतात, अशा वेळी सामाजिक बदल घडवायचा तर मुळात समाजाने अधिक सजग व्हावे लागेल आणि ही सजगता महिलांच्या सक्षमीकरणाशिवाय येणे शक्य नाही, अशा विचारातून त्यांनी राजस्थानात काही उपक्रमही सुरू केले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी २००५ ते २०११ पर्यंत (दोन कार्यकाळ) त्या होत्या. तेव्हा संयुक्त राष्ट्रांच्या ‘शाश्वत विकास ध्येय परिषदे’तही सामाजिक बदल- प्रक्रियेचे मुद्दे त्यांनी मांडले होते. वार्धक्य मृत्यूकडे नेतेच, पण वार्धक्याने अपघाती मृत्यू आल्यामुळे व्यास यांच्या जाण्यानंतरची हळहळ वाढते.