अमोल मुझुमदार हे नाव भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या परिचयाचे, तर मुंबईकर चाहत्यांच्या जिव्हाळ्याचे. मात्र, हेच नाव जागतिक पटलावर पोहोचण्यासाठी काहीसा विलंब झाला हे मान्य करावेच लागेल. भारतासाठी न खेळलेल्या काही सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक, सचिन तेंडुलकरचा जुना सहकारी अशी एकेकाळी ओळख असलेल्या मुझुमदारने आता भारतीय महिला क्रिकेट संघाला विश्वविजेतेपद मिळवून देणारा पहिला प्रशिक्षक असे बिरूद प्राप्त केले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात हुकलेले बरेच काही त्याने कारकीर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात मिळवले असे म्हणता येईल.
मुंबईत ११ नोव्हेंबर १९७४ रोजी जन्मलेल्या मुझुमदारला लहानपणापासूनच क्रिकेटची गोडी. वडील अनिल मुझुमदार स्वत: एका नामांकित बँकेकडून विविध स्पर्धांत खेळलेले. अमोलचे शालेय शिक्षण सुरुवातीला बीपीएम आणि नंतर शारदाश्रम विद्यालयात झाले. इथूनच त्याचा क्रिकेटमधील खरा प्रवास सुरू झाला. शाळेकडून खेळताना त्याला नामांकित प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांसारख्या प्रतिभावंत खेळाडूंसह खेळण्याची संधी मिळाली. त्याने शालेय क्रिकेट स्पर्धांत धावांचा रतीब घातला. फेब्रुवारी १९८८ मध्ये हॅरिस शिल्ड स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात सचिन आणि विनोद यांनी ६६४ धावांची विश्वविक्रमी भागीदारी रचली, त्यावेळी फलंदाजीसाठी पुढचा क्रमांक मुझुमदारचा होता. मात्र, त्याला संधीच मिळाली नाही.
अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी, दीर्घकाळ खेळपट्टीवर टिकण्याची क्षमता यांसारख्या गुणांमुळे तो कमी वयातच प्रथमश्रेणी क्रिकेट खेळला. १९९३-९४ च्या हंगामात मुंबईकडून रणजी पदार्पणात त्याने हरियाणाविरुद्ध नाबाद २६० धावांची शानदार खेळी केली. पुढच्याच वर्षी तो भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा उपकर्णधार झाला, तसेच सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्याबरोबर भारत ‘अ’ संघाकडून खेळला. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये ११ हजारहून अधिक धावा, ३० शतके आणि मुंबईकडून खेळताना आठ रणजी जेतेपदे अशा विलक्षण कामगिरीनंतरही त्याला भारताच्या मुख्य संघात खेळण्याची संधी कधीही मिळाली नाही. मुंबईनंतर तो आसाम आणि आंध्र प्रदेश यांसारख्या संघाकडून व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून खेळला. २०१४ मध्ये त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि तो प्रशिक्षण, समालोचनाकडे वळला.
फलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्याने भारताच्या १९ आणि २३ वर्षांखालील संघांना, नेदरलँड्स संघाला, भारताच्या दौऱ्यावरील द. आफ्रिकेच्या संघाला, ‘आयपीएल’मध्ये ‘राजस्थान रॉयल्स’ ला मार्गदर्शन केले. मुंबईचे मुख्य प्रशिक्षकपद भूषविण्याचीही संधी त्याला मिळाली. २०२३ मध्ये ‘बीसीसीआय’ भारतीय महिला क्रिकेट संघासाठी नव्या प्रशिक्षकाच्या शोधात होते. मुझुमदारने या पदासाठी अर्ज केला आणि अन्य उमेदवारांमध्ये तो सरस ठरला. मुझुमदारच्या मार्गदर्शनाखाली महिला संघाने दर्जेदार कामगिरी केली. कसोटीत ऑस्ट्रेलियाला हरविणे, इंग्लंडमध्ये एकाच वेळी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिका जिंकणे असे अभूतपूर्व यश महिला संघाने प्राप्त केले.
मात्र, मुझुमदारची मोठी कसोटी मायदेशातच एकदिवसीय विश्वचषकात लागली. सुरुवातीच्या चढ-उतारांनंतर मुझुमदारने खेळाडूंना खडेबोल सुनावले आणि भारतीय संघाची गाडी रुळावर आली. भारतीय संघाने बाद फेरीत आधी ऑस्ट्रेलिया, मग दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत प्रथमच विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. मितभाषी अमोलने एक विचारी आणि प्रगल्भ प्रशिक्षक म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये स्वत:चा ठसा उमटवला. ही वाटचाल दीर्घ काळ सुरू राहील हे नक्की…
