व्यक्ती जेव्हा समाज समर्पित असते, तेव्हा शासन, समाजातील विविध संस्था अशा व्यक्तींना वेळोवेळी विविध मानद पदव्या, पुरस्कार, मानपत्रे बहाल करतात. यामागे शासन व अशा सामाजिक संस्था संघटनांची गुणग्राहक वृत्ती असते, तशीच त्यामागे एक कृतज्ञताही असते. अशा पुरस्कार, पदव्यांप्रसंगी वा गौरव समारंभात जी मानपत्रे प्रदान करण्यात येतात, ती या व्यक्तींच्या संक्षिप्त चरित्राची आवृत्ती असते, तद्वतच अशा व्यक्तींच्या योगदानाचे ते मूल्यमापन अधोरेखित करण्याचा सामाजिक वा शासकीय नवोपक्रम असतो.
खरे पाहायचे तर वेळोवेळी प्रदान करण्यात आलेली मानपत्रे ही सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय वा तत्सम क्षेत्रांचे ऐतिहासिक दस्तावेज असतात. आपल्याकडे सामाजिक, ऐतिहासिक कागदपत्रे म्हणून मानपत्रांचा अद्याप अभ्यास वा संशोधन झालेले नाही. भाषा नि साहित्याच्या प्रांतात मानपत्रे एक साहित्य प्रकार (फॉर्म ऑफ लिटरेचर / जेनर) म्हणून याकडे पाहण्याची समीक्षात्मक दृष्टी विकसित न झाल्याने अशा मानपत्रांच्या तसबिरी न वाचले गेलेले नि भिंतीवर टांगलेले सुशोभन (शोपिस) बनून राहतात. बऱ्याचदा अशा मानपत्रांवर या शब्दकळांचा निर्माता गुलदस्त्यात राहतो.
तर्कतीर्थांना भारत सरकारने पद्माविभूषण, राष्ट्रीय संस्कृत पंडित, पद्माभूषण पुरस्कारांनी गौरविले होते. तर्कतीर्थांच्या अमृत महोत्सवी वर्षात मुंबई विद्यापीठाने एलएलडी (डॉक्टर ऑफ लॉ) ही मानद उपाधी प्रदान केली होती. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने तर्कतीर्थांना त्यांच्या ८७ व्या वाढदिवशी त्यांनी केलेल्या राज्याच्या साहित्यिक व सांस्कृतिक विकासाची नोंद घेत ‘ज्ञानपीठ’ सन्मानित कवयित्री अमृत प्रीतम यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करून गौरव केला होता. फाय फाउंडेशनने त्यांना ‘राष्ट्रभूषण’ पुरस्कार अर्पण केला होता.
महाराष्ट्रीय समृद्ध नियतकालिकांची मोठी परंपरा राहिली आहे. पैकी ‘श्री दीपलक्ष्मी’ मासिक जाहीर मानपत्र (खरे तर अनावृत्त मानपत्र) आपल्या नियतकालिकातून देत असे. षष्ट्यब्दीपूर्तीचे औचित्य साधत ‘श्री दीपलक्ष्मी’ने तर्कतीर्थांना जाहीर मानपत्रासारख्या दुर्मीळ सन्मानाने गौरविले होते. ही कल्पना ज्येष्ठ पत्रकार, संपादक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक असलेल्या श्रीपाद शंकर नवरे यांची. महाराष्ट्र शासनाने तर्कतीर्थांचा विशेष गौरव केला होता.
साहित्य अकादमीने त्यांना महत्तर सदस्यत्व (फेलोशिप) बहाल करीत अर्पण केलेल्या सन्मानपत्रात तर्कतीर्थांच्या मराठी व संस्कृत भाषा, साहित्यातील समीक्षात्मक विद्वान (एमिनन्ट स्कॉलर अँड लिटररी क्रिटिक) म्हणून मान्यता प्रदान केली होती. आर. व्यंकटरामन यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात २५ मार्च, १९९१ रोजी प्रदान ‘पद्माविभूषण’ सन्मानपत्रात व्यक्तिगत गुणांची नोंद घेत ते बहाल केले होते.
यासंदर्भात आठवले म्हणून सांगतो की, महात्मा गांधींनी आपल्या एका पत्रात तर्कतीर्थांचा उल्लेख निष्कलंक चारित्रिक (स्पॉटलेस कॅरॅक्टर) व अनुकरणीय व्यक्ती (मॅन ऑफ लर्निंग) म्हणून केला होता. दुसऱ्या पत्रात जे तत्कालीन तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिले होते, त्यात तर सुवर्णवत पवित्र चारित्रिक (मॅन हूज कॅरॅक्टर इज अॅज प्यूअर अॅज गोल्ड) म्हणून गौरव केला होता.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने बहाल करण्यात आलेल्या मानपत्रात ‘राष्ट्राच्या पुनरुज्जीवनाच्या हेतूने आपल्या प्राचीन शास्त्रांना नवीन विज्ञानाच्या उजेडात पाहणारा आणि ज्ञानाचा वैयक्तिक व सामाजिक जीवनात उपयोग करणारा ‘आधुनिक पंडित’ संबोधत त्यांना ‘सारस्वताचे झाड’ (बन्यान ट्री ऑफ अकॅडमिक अँड लिटररी नॉलेज) म्हणून सन्मानित केले होते.
अशी गौरवपत्रे, सन्मानपत्रे भाषा आणि साहित्य प्रांतात शब्दकळेचे चरम दृष्टांत म्हणून पाहिले जातात. प्राचार्य जी. पी. माळी संपादित व ‘अक्षर दालन’, कोल्हापूर प्रकाशित ‘शतमानपत्रे’ या मराठीतील सर्वश्रेष्ठ मानपत्र संग्रहातील प्रस्तावनेत तर मानपत्र रचनाशास्त्र व लेखनपद्धतीवर विस्ताराने प्रकाश टाकण्यात आलेला आहे. त्यात तर्कतीर्थांना ‘राजर्षी शाहू पुरस्कारा’चे मानपत्र अंतर्भूत आहे. प्रस्तुत मानपत्रात तर तर्कतीर्थांचा गौरव रूपक वापरत ‘चिरतरुण शास्त्री’ संबोधण्यात आले आहे. हे असते मानपत्रांचे शब्दसौंदर्य आणि मौल्यवान दस्तावेज म्हणून माहात्म्य! अशी मानपत्रे आपला सांस्कृतिक व ऐतिहासिक ऐवज असल्याने त्यांचे जतन, संग्रहण जितके महत्त्वाचे, तितकेच त्यांचे संशोधन व अध्ययनही.
drsklawate@gmail.com