‘चांदनी चौकातून’ या सदरातील ‘संघ-भाजप: तडजोड कोण करणार?’ हे स्फुट (रविवार विशेष – ९ नोव्हेंबर) वाचले. आजघडीला भाजपचे राजकीय सामर्थ्य, सत्तेवरील पकड आणि जनमानसावरचा प्रभाव इतका वाढला आहे की, संघाचे मार्गदर्शन आता पक्षासाठी केवळ औपचारिक शिष्टाचार ठरले आहे. मोदी-शहा युगात संघाला दिल्या जाणाऱ्या सन्मानातही सूक्ष्म अवहेलना दडलेली आहे. उदा. महत्त्वाच्या निर्णयांपूर्वी संघाच्या वरिष्ठांना ‘कळवले’ जाते, पण ‘विचारले’ जात नाही. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीस झालेला विलंब हे त्याचे सर्वात ताजे उदाहरण आहे. भाजपने संघाच्या संकेतांची वाट पाहण्याऐवजी, बिहारच्या निवडणुकीसारख्या राजकीय समीकरणांवर निर्णय अवलंबून ठेवला म्हणजे विचारसरणीपेक्षा सत्तेचे गणित हे पक्षाचा खरे मार्गदर्शक ठरले आहे.

संघालाही हळूहळू हे जाणवू लागले असावे की, पक्षाच्या यशाचे श्रेय आता संघटनात्मक योगदानापेक्षा व्यक्तिनिष्ठ नेतृत्वाला मिळत आहे. ‘आपल्याशिवाय पक्ष चालू शकत नाही’ हा संघाचा आत्मविश्वास तरी आज वास्तवाशी सुसंगत आहे का, असा प्रश्न रास्त ठरावा; कारण भाजपने आता संघाच्या कक्षेबाहेर एक नवा ‘राजकीय संघटनवाद’ उभा केला आहे- जिथे प्रचारयंत्रणा, समाजमाध्यमे आणि व्यक्तिपूजेवर आधारित जनसंपर्क हेच नवे मार्ग बनले आहेत. संघ अजूनही आपली वैचारिक मातृत्वाची भूमिका जपण्याचा प्रयत्न करत असला, तरी भाजपने त्याला केवळ सांस्कृतिक सावलीत ठेवले आहे. पक्षाचे नेते संघाचे आशीर्वाद आजही घेतात; पण निर्णय मात्र स्वत:च्या हितसंबंधानुसार घेतात. हेच दाखवते की, आता संघ ‘मार्गदर्शक शक्ती’ उरला नाही तर केवळ ‘प्रतीकात्मक वारसा’ बनला आहे.-परेश संगीता प्रमोद बंगमूर्तिजापूर (अकोला)

कामे सुरू असताना तपासते कोण?

नवा कोरा अटल सेतू कामासाठी अंशत: बंद – टप्प्याटप्प्याने काम’ ही बातमी (लोकसत्ता- ९ नोव्हेंबर) वाचली. ‘अटल सेतू’साठी थाटामाटाच्या, खर्चीक लोकार्पण सोहळ्याला जेमतेम १८ महिने होत नाहीत तोच त्याची दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे. मुळात या सेतूच्या बांधकामावर १७ हजार कोटी रुपये खर्च झाले आणि तो पैसा करदात्यांचा आहे. घाईगर्दीने उद्घाटन केलेल्या सर्वच कामांच्या दर्जाची हीच गत आहे. रस्ते बनवणारे कंत्राटदार जेव्हा काम करतात तेव्हा शासकीय अधिकारी कचेऱ्यांमध्ये बसून वरिष्ठ मंडळीची खुशामत करण्यात स्वत:चा वेळ खर्ची करीत असावेत. रस्ते उखडले की मग शासनाला कळते निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले आहे. पालिका, शासन, कंत्राटदार सर्व एकमेकाला मिळालेले आहेत, हेच वारंवार घडणाऱ्या या प्रकारातून दिसते. कामे चालू असताना तपासण्याची कृती होत नाही म्हणून कंत्राटदार त्याचा फायदा घेतात, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे कंत्राटदारांसह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांवरसुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे.- नीता शेरेदहिसर पूर्व (मुंबई)

कारणमीमांसा पटतेे; पण…

‘‘डोळसां’ पुढील अंधकार…’(८ नोव्हेंबर) या संपादकीयात पुण्यातील एका सुशिक्षित इंजिनीअरला १४ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाच्या प्रकरणाची घेतलेली दखल वाचली. झटपट श्रीमंत झालेल्या व्यक्तींच्या मनातील भीती, भारतातील दैववादाची परंपरा तसेच आसाराम बापू, राम रहीमबाबासारख्या दोषसिद्ध व्यक्तींच्या पाठीशी उभे राहून त्यांना वरचेवर ‘पॅरोल’ देणारी व्यवस्था, समाजातील बुद्धिप्रामाण्यवादाचा अभाव ही बुवाबाजीची कारणमीमांसा पटते. परंतु लेखाच्या शेवटी अंनिसने त्यांचे असणे तपासून बघण्याचा सल्ला खटकला. अंनिस आपल्या स्थापनेपासून गेली ३६ वर्षे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात लोकशिक्षण तसेच बुवाबाजीविरोधात आघाडी चालवीत आहे. डॉक्टर दाभोलकर यांनी या कामासाठी दिलेल्या बलिदानाने डिवचले जाऊन कार्यकर्ते दुप्पट जोमाने बुवाबाजीच्या प्रकरणांचा पर्दाफाश करीत आहेत. अंनिसने दहा-बारा वर्षे सातत्याने लढा देऊन बुवाबाजीविरोधात दोन कायदे पारित करून घेतले आहेत. ‘लोकसत्ता’च्याच चतुरंग पुरवणीमध्ये येणारे अॅड. रंजना पवार गवांदे यांचे लेख या जादूटोणाविरोधी आणि जात पंचायतीच्या मनमानी विरोधी कायद्याच्या आधारे बुवाबाजीच्या अनेक प्रकरणांचे पितळ उघडे पाडल्याचा लेखाजोखा देतात.- प्रभा पुरोहितजोगेश्वरी (मुंबई)

आत्मपरीक्षणाची जबाबदारी सर्वांचीच!

‘‘डोळसां’पुढील अंधकार…’ (८ नोव्हेंबर) हे संपादकीय वाचले. त्यातील ‘सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जादूटोणाविरोधी कायदा असो वा अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटना- त्यांचे असणेही त्यांनी एकदा तपासून पाहायला हवे.’ हे शेवटचे वाक्य खटकले. अंनिसने गेल्या दोन वर्षांतसुद्धा शाळा-महाविद्यालय, पोलीस स्थानक, तसेच सार्वजनिक ठिकाणी ‘डॉ. एन. डी. पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन यात्रा’, ‘जादूटोणाविरोधी कायदा प्रबोधन यात्रा’ यांसारखे उपक्रम राबवले आहेत. मेळघाटासारख्या दुर्गम आदिवासी भागात अनेक सामाजिक संस्था कार्यरत असूनही त्यांनी लहान मुलांच्या पोटावर डंबा (चटके) देणाऱ्या अघोरी प्रथेविरोधी फारसा आवाज उठवला नव्हता. तिथे यावर्षी अंनिसने डंबा प्रथेविरोधी प्रबोधन मोहीम राबवली. अर्थात मोठ्या जनसमुदायासमोर हे कार्य अपुरेच वाटणार, हे वास्तव आहे. परंतु या संदर्भात आत्मपरीक्षणाची जबाबदारी सर्वांचीच आहे. उदाहरणार्थ, फलज्योतिष हे शास्त्र नाही, हे डॉ. जयंत नारळीकर यांसारख्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक कसोटीवर तपासून शाबीत केले होते. पं. महादेवशास्त्री जोशींनी ज्योतिषातील लबाडी लक्षात आल्यावर त्यांचा ज्योतिषाचा धंदा बंद केला होता. त्यामुळे वृत्तपत्रांनी ज्योतिषासारख्या अवैज्ञानिक गोष्टी छापणे बंद करून, या अपुऱ्या वाटणाऱ्या प्रवाहाविरुद्धच्या प्रवाहासाठीच्या लढाईत आपल्या परीने सामील व्हावे असे वाटते. ज्यामुळे ‘डोळसां’पुढील थोडा तरी अंधार दूर होण्यास मदत होईल.-अॅड. सौरभ बागडेपुणे

शैक्षणिक प्रगती खरोखर झाली का?

‘‘डोळसां’पुढील अंधकार…’ हे संपादकीय वाचले. पूर्वी इंग्लंडमधून व्यापारासाठी भारतात आलेल्यांनी आपल्यावर १५० वर्षे राज्य करताना इथल्या संपत्तीची लूट केली; तर आता इंग्लंडपर्यंत जाऊन मायदेशी परत आलेल्या कुटुंबाला इथले बाजारबुणगे सहज गंडा घालून जाताहेत… हे पाहून, खरोखरच आपली शैक्षणिक प्रगती झाली आहे का असा प्रश्न पडतो. यामागे आपली शिक्षणपद्धती, इथल्या यंत्रणेतील उणिवा ही कारणे आहेतच. पण भूलथापा देणाऱ्या ढोंगी लोकांपासून सावध राहण्यासाठी प्रत्येकानेच तर्कशुद्ध बुद्धिवाद जिवंत ठेवावा लागेल.- हर्षल शिंदेमुंबई

कारण अगतिकता, हाव की अराजकता?

‘‘डोळसां’पुढील अंधकार…’ या संपादकीयास (८ नोव्हेंबर) निमित्त ठरलेल्या प्रकरणात आयटी इंजिनीअरिंगचे शिक्षण, इंग्लंडमध्ये वास्तव्याचा अनुभव, चौदा कोटी गमावण्याएवढी गडगंज संपत्ती आणि मुलींच्या वैद्याकीय समस्या हे सारे एकत्रितपणे लक्षात घेतले तर ती अंधश्रद्धा अगतिकतेतून जन्माला आलेली वाटते. वरील पार्श्वभूमी असलेल्या पित्याने सर्व शास्त्रोक्त, आधुनिक वैद्याकीय उपाय केलेले असतीलही. परंतु यापुढे फारशी काहीही सुधारणा अशा उपचारांतून होणार नाही हे समजल्यावर मुलींवरील प्रेम व अगतिकता यांमुळे ‘दवा नाहीतर दुवा तरी’ अशी मानसिकता झालेली असू शकते.

परीक्षेत यश मिळावे, उत्तम नोकरी मिळावी, व्यवसायवृद्धी होऊन धनलाभ व्हावा, इत्यादी कारणांमुळे बुवाबाजीच्या नादी लागण्यातून एकतर माणसाच्या अवाजवी अपेक्षा दिसतात किंवा व्यवस्थेवरील अविश्वास तरी दिसतो. योग्य ते प्रयत्न प्रामाणिकपणे केले तर आपल्या कुवतीस साजेसे यश नक्की मिळू शकते असा विश्वास असेल तर अशा प्रकारच्या अंधश्रद्धा निर्माण होणार नाहीत. परंतु नियमाधिष्ठित व्यवस्था आजूबाजूला दिसत नसेल, अनाकलनीयरीत्या यशस्वी वा अपयशी झालेले अनेक जण समाजात दिसत असतील तर अशा अराजकसदृश स्थितीत प्रयत्नांपेक्षा नशिबावर वा कुणाला तरी (व्यक्ती वा देव) खूश करण्यावर विश्वास वाढतो. नेमकी तिथेच अंधश्रद्धेची व भ्रष्टाचाराचीही बीजे रुजतात. कुठलीही अंधश्रद्धा वाईटच असली तरी त्याचे कारण अगतिकता आहे, हाव आहे, की अराजकता हे समजून घेणे गरजेचे आहे असे वाटते.- प्रसाद दीक्षितठाणे