‘पेन इंटरनॅशनल’ आणि ‘साऊथ एशियन लिटरेचर इन ट्रान्स्लेशन प्रोजेक्ट’च्या लघुयादीत यंदा २४ नावे असून त्यात जयंत पवार यांचे ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’, प्रदीप कोकरे यांचे ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ आणि संत सोयराबाई कर्ममेळा निर्मला बांका यांचे चौदाव्या शतकातील काव्य यांचा अनुवाद समाविष्ट झाला आहे…

‘पेन इंटरनॅशनल’ आणि ‘साऊथ एशियन लिटरेचर इन ट्रान्स्लेशन प्रोजेक्ट’ दरवर्षी विविध भाषिक क्षेत्रातून नव्याने होणाऱ्या भाषांतरित साहित्याचा भाग मागवते. त्यांतून प्रादेशिक भाषेतून इंग्रजी भाषेत पुस्तक यावे याकरिता लघुयादी निवडली जाते. विविध ब्रिटिश प्रकाशकांसमोर पुस्तक निवडीचा पर्याय उभा राहावा यासाठी हा खटाटोप. यंदा या लघुयादीत २४ नावे असून जयंत पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’, प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ आणि संत सोयराबाई- कर्ममेळा- निर्मला- बांका यांचे चौदाव्या शतकातील काव्य यांचा अनुवाद समाविष्ट झालाय. पहिल्यांदाच ‘पेन इंग्लिश’च्या लघुयादीत तीन मराठी नावे झळकत असल्याने या वृत्ताला महत्ता. आता पुढील आठवड्यात अनुवादकांना भाषांतराचा विस्तारित भाग (सॅम्पल) पाठवायचा असून त्यांची पुस्तकासाठी निवड डिसेंबरअखेर किंवा जानेवारी महिन्यात अंतिमत: पाहायला मिळेल.

मराठीतून हे लेखन इंग्रजीत नेणारे मानव कांबळी, उमा शिरोडकर आणि चंद्रकांत म्हात्रे या नव्या फळीच्या अनुवादकांवरही यानिमित्ताने प्रकाशझोत पडलाय. जयंत पवारांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या संग्रहाला २०१२ साली साहित्य अकादमीने गौरवण्यात आले. त्याआधी आणि नंतरही (त्यांच्या मृत्यूपश्चातही) मुंबई शहरातील मराठी माणसांच्या फरफटीच्या कथा वाचकांना भावल्या. काही कथांवर चित्रपटदेखील आले. गिरणगावातील लालबाग-परळ भूगोलाच्या त्यांच्या कथा मानव कांबळी हा पुण्यातील तरुण अनुवादक ‘फ्रॉम द फिनिक्स’ज् अॅशेस अरायझेस अ पीकॉक’ नावाने करीत आहे. बाबूूराव बागूल यांच्या ‘मरण स्वस्त होत आहे’ (१९६९) या संग्रहाचा त्याने ‘लुटालूट’ या नावाने गेल्याच वर्षी अनुवाद केला. जयंत पवार यांच्या कथांसह हमीद दलवाई यांच्या लेखनाचाही तो अनुवाद करीत आहे. उमा शिरोडकर मुंबईतील उत्साही अनुवादक. ‘द बॉम्बे लिटररी मॅगेझिन’च्या त्या अनुवाद संपादिका म्हणून काम पाहतात. गर्निका मॅगेझिन, हाकारा जर्नल आणि गुलमोहर क्वार्टर्ली या नियतकालिकांत त्यांचे अनुवाद वाचायला मिळतात. गेल्या वर्षी साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळालेल्या प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीचे ‘डिझोलेट आइज् ड्राउनिंग डीप’ नामे इंग्रजी भाषांतर त्या करीत आहेत. चंद्रकांत काळूराम म्हात्रे हे नवी मुंबईत विविध शाळा आणि महाविद्यालयांत दीड तप इंग्रजी शिकवतात. संत साहित्य हा त्यांचा अभ्यासाचा विषय. तुकारामांच्या शंभर कविता, चोखामेळांच्या शंभर कविता आणि संत बहिणाबाईंचे आत्मचरित्र त्यांनी यापूर्वीच इंग्रजीत अनुवादित केले आहे. सोयराबाई- कर्ममेळा- निर्मला- बांका यांच्या निवडक रचना ते अनुवादित करीत आहेत.

आपल्या परिघातील आकलनात आत्तापर्यंत ‘पेन इंटरनॅशनल’, ‘पेन इंग्लिश’, ‘पेन अमेरिका’ नव्हते. भारतीय प्रादेशिक भाषांना दोन आंतरराष्ट्रीय बुकर मिळाल्यानंतर देशातील सर्व भाषिक साहित्याचे महत्त्व उजळत असून नवे अनुवादक तयार होतायत. जयंत पवार, प्रदीप कोकरे आणि आपल्या संत साहित्यिकांच्या लेखनातला भाग ब्रिटिश प्रकाशकांपर्यंत पोहोचण्याच्या पहिल्या पायरीवर आहे. पुढले टप्पे सुकर झाले तर मराठीतील नवे साहित्य वाचणारे आणि त्यांचे महत्त्व जाणणारे वाढतीलच. तूर्त इंग्रजी भाषेच्या दारात पोहोचलेल्या या कलाकृती मूळ मराठीतून वाचायचे राहून गेले असल्यास त्यांना वाचायचे कारण नक्कीच तयार झाले आहे. भारतातील इतर कोणत्या भाषेतील, कोणते लेखक-अनुवादक या लघुयादीत आहेत, हे येथे पाहता येईल.

https:// tinyurl. com/4 w35 zbff

दैनंदिनी लेखिका…

बुकर पारितोषिकाइतकीच रक्कम असलेला ५० हजार पौंडांचा अ-कथनात्मक साहित्यासाठीचा ‘बेली गिफर्ड पुरस्कार’ गेल्या आठवड्यात ८५ वर्षीय ऑस्ट्रेलियन लेखिका हेलन गार्नर यांना जाहीर झाला. ऑस्ट्रेलियेतर जगतासाठी त्या कथा-कादंबरीकार म्हणून परिचित. त्यांच्या दोन कादंबऱ्यांवर चित्रपट झाले. वास्तव गुन्ह्यांवर पुस्तके लिहिण्यात त्या वाकबगार. गेली दोन वर्षे ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या कुटुंबीयांनाच रोजच्या जेवणात विषारी मशरूम खायला घालून थंडपणे ‘सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला’ हा हेतू तडीस नेणाऱ्या महिलेवरला खटला गाजत आहे. त्यावरदेखील गार्नर (सहलेखक म्हणून) पुस्तक लिहीत आहेत. त्यांना ब्रिटनमधील ‘बेली गिफर्ड पुरस्कार’ मिळालाय तो त्यांच्या दैनंदिनी (वासरी-डायरी) लेखनाच्या संकलनासाठी. ‘हाऊ टू एण्ड ए स्टोरी : कलेक्टेड डायरीज १९७८-१९९८’ हे ते पुस्तक. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी कित्येक मुलाखती दिल्यात. आता माझ्या प्रकाशकांनी पुरस्कारासाठी माझी पुस्तके पाठवणे थांबवावे, असा आग्रहही धरलाय. पुस्तकाच्या परिचयासह लेखिकेची ओळख ‘गार्डियन’मध्ये वाचता येईल.

https://tinyurl.com/6y9 ej9kc

बुकर विजेत्या कादंबरीचा भाग

बुकर पारितोषिकाची लांबोडकी यादी जाहीर झाली, तेव्हा १३ साहित्यिकांपैकी सहा पुरुष असल्याने ‘डेथ ऑफ द मेल नॉव्हेलिस्ट’ अशा टीका माध्यमांवर सुरू झाल्या होत्या. दरवर्षी लघुयादीत सर्वाधिक महिला आणि एखाद-दुसरा पुरुष लेखक दिसतो; पारितोषिक लेखिकाच पटकावते, असा सूरही उमटला. पण बेन मार्कोव्हिट्स यांची ‘द रेस्ट ऑफ अवर लाइव्ह्ज’ या कादंबरीवर सट्टाबाजारात सर्वाधिक बोली लावली गेली. त्यामुळे चर्चेतून ती कादंबरी आपसूक बाजूला पडली. हंगेरियन लेखक डेव्हिड सलॉय यांची सद्या:स्थितीतला युरोप आणि कथानकाद्वारे शरीरचिंतन घडवून आणणारी कादंबरी पारितोषिकप्राप्त ठरल्याने ‘पुरुष कादंबरीकार संपलेच’ या टीकेवरही पाणी टाकण्यात आले. आता ही कादंबरी घेऊन वाचायची की नाही, हे ठरवायचे असेल तर ‘ग्रॅण्टा’ मासिकाने यातल्या एका प्रकरणाचे संकेतस्थळावर असलेले टाळे उघडले आहे. ते उघडलेले राहील तोवर वाचून घ्या.

https:// tinyurl. com/247 b2 e3 f

वाचनप्रक्रिया १५३ कादंबऱ्यांची…

तीनेक वर्षांपूर्वी सारा जेसिका पार्कर या लोकप्रिय अभिनेत्रीने (मालिका आपल्या वाहिन्यांवरही लागत असल्याने कोणती ते माहीत असेलच) इन्स्टाग्रामवर बुकर पारितोषिकाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा दर्शवली. प्रक्रिया कोणती तर आलेली सर्व पुस्तके वाचण्याची. गेल्या वर्षी निवड समितीत सहभागी होण्याची संधी ‘गळ्यात’ पडल्यानंतर गळपटून न जाता तिने काय केले? अगदी पहिले पुस्तक दारात पडल्यापासून विजेता जाहीर होईस्तोवर केलेल्या वाचन अनुभवांचे कथन या लेखात आलेय.

https://tinyurl. com/mufx9d9a