स्कॉटलंडमधील एडिनबरा हे शहर. तिथल्या लेथ बंदरानजीक सरकारी स्वस्त घरांच्या वसाहतीत (आपल्याकडल्या बीडीडी चाळींच्या इमारती अथवा पोलीस लाइनीसमान वस्त्या) जन्मलेल्या आयर्विन वेल्शचा लेखक बनण्याचा निर्णय आयुष्यात खेळलेला शेवटचा फासा. म्हणजे फुटबॉलपटू किंवा संगीतकार बनण्याच्या महत्त्वाकांक्षेचा मध्यमवर्गी चुराडा जसा अनेक (क्रिकेटकांक्षी) खेळाडू-कलाकारांचा गिरणगावी वस्त्यांत व्हायचा नेमका तसाच वेल्शच्या बाबतीतही झाला. मग दारू-ड्रग्ज आदी सारीच नकारऊर्जा गोळा करणारे सारेच छंदोव्यसनी सायास पूर्ण झाले. सोळाव्या वर्षी शिक्षण सोडून तो थेट रोजगारलक्ष्यी धड्यांकडे वळला. रेडिओ-टीव्ही दुरुस्तीत उमेदवारी सुरू असतानाच शाळेतल्या एका शिक्षिकेच्या घरी दुरुस्तीचा घाट घातला जात असताना त्या शिक्षिकेने त्याला विचारले, ‘पूर्वी वर्गात गोष्टी वह्यांमधून रचून आणायचास, तसे आतादेखील लिहितोस काय?’ आयर्विन वेल्शच्या डोक्यात तेव्हा आपल्या पहिल्या कादंबरीचे खूळ घुुसले. १९९१ च्या ‘न्यू रायटिंग स्कॉटलंड’ या नियतकालिकात ‘द फर्स्ट डे ऑफ एडिनबरा फेस्टिवल’ नामक प्रकरण छापून आले. ते कथासूत्र होते रेण्टन नामक ड्रग अॅडिक्ट आणि त्याचे चार मित्र यांच्याभोवती गुंफलेले.
यातल्या रेण्टनला वयाच्या २६ व्या वर्षी दर काही दिवसांनी व्यसनमुक्तीचे वेध लागतात. घरातील स्वत:च्या खोलीत पुढील काही दिवसांचे जगण्यासाठीचे सारे ऐवज (खाणे, दूध, टीव्ही, अतिरिक्त पाहण्यासाठी श्लील नसलेली चटकदार मासिके) जमवून तो दाराला आतून फळ्याच ठोकतो. अमली पदार्थ आणण्याचा मोह होऊ नये म्हणून. आता कुणा वाचकाला या तरुणाचा वज्रनिर्धार भरपूर दिवस चालेल असे वाटत असतानाच काही तासांनी दाराला लावलेल्या फळ्या उद्ध्वस्त झाल्याची वर्णने वाचायला मिळतात. १९९३ साली ‘ट्रेनस्पॉटिंग’ नावाची संपूर्ण कादंबरी जन्माला आली. भारतीय शहरांतील सिनेमा आणि पुुस्तकप्रेमी असलेल्या प्रत्येक घरात ‘ट्रेनस्पॉटिंग’ची विविध चित्रांची प्रत फडताळात विराजमान दिसते. (मुंबईत हुतात्मा चौकातील रस्तादालन ते किताबखान्यापर्यंत आणि भारतातील सगळ्याच ग्रंथदालनांत सहज उपलब्ध पुस्तक.) इतरही युरोपेतर देशांत, अमेरिकेत ती तितक्याच जोमाने विकली जाते. पण त्यातील इंग्रजी सरळसाधी नाही. स्कॉटिश इंग्लिश उच्चारांप्रमाणे तिचा वापर असल्याने वाचक पहिल्या चारेक पानांत वाचण्याचा दमसास करीत थांबतो. मग याची कथा समजून घेण्यासाठी दीड-पावणेदोन तासांच्या डॅनी बॉयलने बनविलेेल्या चित्रपटाचा आधार घेतो. ‘ड्रग्ज अॅडिक्ट’च्या नजरेतून आलेले हे मार्गारेट थॅचरकालीन एडिनबरामधील जग. व्यसनांच्या पूर्तीसाठी चोऱ्या-माऱ्या-दरोड्यापासून एडिनबरामधील घाऊक ड्रग्ज खरेदीची लंडनमध्ये नफ्यासाठी विक्री आणि त्यातून मैत्रीफुटीने कादंबरीची भैरवी साजरी होते.
बुकबातमीचा पहिला मुद्दा हा की दर दशकात आता पुन्हा मी ‘ट्रेनस्पॉटिंग’च्या पुढले कथानक असलेली आणि त्याच व्यक्तिरेखा असलेली कादंबरी लिहिणार नाही, असे जाहीर करून वेल्श याच व्यक्तिरेखांनी सजलेली कादंबरी पुन्हा आणतो. ‘स्कॅगबॉईज’ आणि ‘पोर्नो’ या दोन कादंबऱ्यांनंतर दोन आठवड्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘मेन इन लव्ह’ या कादंबरीद्वारे एडिनबरा शहरातील मध्यमवर्गी चौकडी (रेण्टन, सिकबॉय, स्पड आणि बेग्बी) पुन्हा अवतरलीय. या चौघांच्या इतर सवयींसह प्रेमव्यसनांधता या कादंबरीत वाचायला मिळेल. पण संपूर्ण कथानक कळून घेण्यासाठी डॅनी बॉयलने त्यावर चित्रपट करण्याची वाट पाहावी लागेल.
ही बुकबातमी देण्याचा दुसरा मुद्दा आपल्याकडे म्हणजे मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांत (पंजाबसह अनेक राज्यांत) गर्द, अमली पदार्थ यांची विक्री त्याच काळात परमोच्च पातळीवर होती. तेव्हा प्रमोद नवलकर आपल्या भ्रमंतीतून मुंबईसह कुठे कुठे कसा कसा नशापाणी मिळतो याचा दाखला देत होते. अनिल अवचटांची ‘गर्दच्या विळख्यात’ नामक मालिका वृत्तपत्रातून येत होती. जयंत रानडेंचा अमली पदार्थांच्या भारतीय उद्याोगावरचा दीर्घ रिपोर्ताज ‘चरस’ पुस्तकातून सादर झाला होता. मन्या ओक याची ‘चरसी’ ही कादंबरीदेखील प्रकाशित झाली होती. (स्कॉटलंडमधील ट्रेनस्पॉटिंगच्या कैक वर्षे आधी) त्यात चरस ओढणाऱ्यांची, गर्दुल्ल्यांची भाषा समजावी म्हणून दोन पानी शब्दार्थ दिले होते. झिंगुर (झुरळ), चिबलक (पाल), टुर्रू मुरु (थातूरमातूर), आज बकरी (घबाड, जुगार), चरस आणि चरसी हे पुस्तकांचे विषयच ‘साहित्यातील ललामभूत रत्ने’च रमलेल्या किंवा पहाटे रेडिओवर भक्तिसंगीत ते ‘आत्याचा संवाद’ आणि संध्याकाळी सांजधारा ते बेला के फूलमध्ये स्वर्ग शोधणाऱ्या मराठी मध्यमवर्गाला निषिद्ध वाटले असावेत. ना धड लोकप्रिय प्रकाशक तिला मिळू शकला, ना धड प्रकाशनानंतर मराठीत ती वाचली गेली. उतारकालीन गिरणगावाइतक्याच आर्थिक गरिबीतील स्कॉटलंडमधील चरसींची कहाणी पुस्तक-सिनेमांच्या सिक्वेल्सद्वारे जगभर पोहोचली आणि अजूनही पोहोचत आहे. ‘चरसी’च्या प्रतीसाठी मराठीत (उरल्यासुरल्या) अभ्यासकांना मात्र तरसण्यापलीकडे काहीच लाभत नाही.