तर विषय असा आहे की काल म्हणजे मंगळवारी एका कुटुंबाच्या बरखास्तीची अधिकृत घोषणा झाली. तुम्ही म्हणाल की सरकार बरखास्त होऊ शकते, पण कुटुंब कसे काय? प्रश्न अगदी रास्त असला तरी तो विचारायचा नाही. याचे एकमेव कारण म्हणजे ही घोषणा खुद्द विश्वगुरूंनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारातील लाखो सदस्यांनी हू की चू न करता ‘मोदी का परिवार’ ही टॅगलाइन चूपचाप काढून टाकली. पाच वर्षांपूर्वी ‘मैं हू चौकीदार’ काढली तशीच. आता काही म्हणतील की हा परिवारसुद्धा ‘जुमला’ होता. दहा वर्षांपूर्वीच्या पंधरा लाखांसारखा. तर त्याला आमचा नाइलाज आहे. कुटुंब, मग ते कुठलेही असो. एकजिनसी असते. त्यात एकमेकांना मदत करण्याची, अडचणीत धावून जाण्याची, संकटसमयी एकत्र राहण्याची भावना असते, असा तर्क कुणी लावत असेल तर ते योग्यच. यावेळच्या निवडणुका हे एक मोठे संकट होतेच. त्याचा सामना करता यावा म्हणून तर हे कुटुंब तयार झाले. तेही त्या बिहारच्या लालूजींच्या एका वाक्यावरून. आता ते संकट टळले. यावर काही म्हणतील पूर्ण कुठे टळले? बहुमत तर मिळालेच नाही. हा त्यांच्या दृष्टीचा दोष. मित्रपक्षांच्या सहकार्याने सत्ता राबवण्यासाठी विश्वगुरू समर्थ आहेत. तसेही एकट्याने (फार फार तर दुकट्याने) देशाचा गाडा हाकण्याची त्यांना सवय आहे. त्यामुळे कुटुंबाची गरज काय? उगीच सर्वांना त्या परिवाराच्या गाड्यात कशाला अडकवून ठेवायचे याच उदात्त हेतूने त्यांनी हे केले असावे. या परिवाराने यावेळी बरोबर काम केले नाही.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : युरोपमध्ये ‘उजवे’ वारे!

कुटुंबाच्या यशासाठी सर्वजण एकदिलाने झटले नाहीत. सर्वजण शंकराच्या पिंडीवर दूध टाकत असताना आपण थोडे पाणी टाकले तर काय फरक पडतो या समजात अनेकजण वावरले. त्यामुळे उद्विग्न होत विश्वगुरूंनी हा निर्णय घेतला हा तर्क तर पूर्णपणे खोटा. तसेही ते विरोधी कुटुंबाशी लढण्यासाठी व त्यांना पुरून उरण्यासाठी एकटेच ‘काफी’ असतात. यावेळी त्यांना निवडणूक काळातील समाजमाध्यमी युद्ध लढण्यासाठी योग्य ‘टॅगलाइन’ सापडत नव्हती. पप्पू तशी संधी देत नव्हता. अचानक ती लालूंनी दिली व त्याचा अचूक फायदा त्यांनी उचलला हेच काय ते सत्याच्या जवळ जाणारे. या परिवारात मोठ्या उत्साहाने सामील झालेले माध्यमांवर तलवारबाजी करत राहिले. या नादात प्रचार करायचे विसरले. त्यामुळे कुटुंबाचा पाहिजे तसा विस्तार होऊ शकला नाही व ६० जागा कमी झाल्या यातही फारसे तथ्य नाही. असे असते तर बरखास्तीच्या वेळी कुटुंबप्रमुख या नात्याने विश्वगुरूंनी नक्कीच सर्वांचे कान टोचले असते. कुटुंब ही संकल्पना कधीच नष्ट न होणारी, वंशावळीच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या पुढे जाणारी. मग ही बरखास्ती कशी, असे अकलेचे तारे तोडण्याची गरज नाही. राजकारणात तयार झालेली कुटुंबे अशीच अल्पजीवी असतात. कधी ना कधी त्यांचे विसर्जन होतेच. एवढ्या मोठ्या कुटुंब कबिल्याला घेऊन सत्ता राबवतो म्हटले तर एक ना धड भाराभर चिंध्या अशीच अवस्था व्हायची. त्यामुळे फार विचार न करता या बरखास्तीकडे सकारात्मक दृष्टीने बघा. तरीही कुणाला एकाकी वाटत असेल तर त्यांच्यासाठी संघपरिवाराचा ‘कुटुंब प्रबोधन’ कार्यक्रम आहेच की! त्यात सहभागी व्हा, तुम्हाला नाही कुणी म्हटले?