विश्वगुरूचे हेलिकॉप्टर हवेत झेपावल्याचे दिसताच बंदीपूर प्रकल्पातील असंख्य वाघांनी मोकळा श्वास सोडला. गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षेच्या अतिरेकाने या सर्वाचे फिरणे दुर्मीळ झाले होते. आपली संख्या जाहीर करण्यासाठी नेमकी याच प्रकल्पाची निवड का? याचा कर्नाटकच्या निवडणुकीशी काही संबंध असेल का? प्रचारासाठी आपलाही वापर होतो की काय? आपल्यावर काही संक्रांत तर येणार नसेल ना! असले प्रश्न व शंकांनी धास्तावलेले वाघ मग एका देवळाच्या प्रांगणात गर्दी करू लागले. जमलेल्यांपैकी बहुतेकांच्या टोकदार मिशा खाली झुकलेल्या. मग एकाने सुरुवात केली. ‘कशाला आले असतील ते? संख्या तर दिल्लीतही जाहीर करता आली असती.’ यावर सारे एकमेकांकडे बघू लागले. तेवढय़ात एक ज्येष्ठ म्हणाला, ‘‘मी त्यांना गुजरातपासून ओळखतो. राष्ट्रीय गौरवाच्या गोष्टी ‘इव्हेन्ट’ करून लोकांपर्यंत पोहोचवायच्या ही त्यांची जुनी सवय. आपण काही त्यांचे विरोधक नाही. त्यामुळे आपल्याला धोका नाही.’’ हे ऐकताच बहुतेकांनी सुस्कारा सोडला. एक तरुण दिसणारा मध्येच बोलला, ‘त्यांचा पेहराव तर आजकाल शिकारी वापरतात तसाच दिसत होता.’ हे ऐकताच सारे खवळले. ‘तुला स्वत:च्या मागे ईडी, सीबीआय लावून घ्यायची आहे का? पुन्हा असे अनुचित बोललास तर याद राख’ अशी तंबी देऊन त्या शंकेखोर वाघाला साऱ्यांनी गप्प बसवले. मग दुसरा ज्येष्ठ गुरगुरत म्हणाला, ‘यांनी आपल्याकडे जास्तच लक्ष दिले तर ज्येष्ठांचे काय? त्यांना बाजूला सारण्याची यांची पद्धत सर्वाना ठाऊक आहे.’ यावर मग मंथन सुरू झाले. प्रसंगी ‘डरकाळी आंदोलन’ करू, पण ज्येष्ठांचा अवमान होणार नाही याची काळजी घेऊ.. यावर एकमत होते, तोच एक तरुण उभा राहिला. ‘आपली संख्या वाढली की त्यांना आनंद होतो असे माझे निरीक्षण. तेव्हा त्यासाठी आपण कसून झटायला हवे.’ हे ऐकताच शेजारी बसलेली व गावालगतच्या अधिवासात रमणारी वाघीण चक्क लाजली. तिने ‘इश्श्’ म्हणण्याचा प्रयत्न केला पण तोंडून डरकाळीच बाहेर पडली तसे सारे हसायला लागले. वातावरणातील ताणही निवळला.

मग आयुष्यात पाच वेळा बाळंत होण्याची क्षमता आणखी कशी वाढवता येईल यावर बराच काथ्याकूट झाला. सर्वाना चांगला अधिवास मिळाला तर हे सहज शक्य असे काहींचे मत पडले, पण अंतिम तोडगा निघाला नाही. ‘त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आपली संख्या वाढली नाही तर ते परदेशातून वाघसुद्धा आणतील. चित्त्यांसारखे. मग आपलीच पंचाईत होईल. देशी विरुद्ध विदेशी अशा नव्या संघर्षांला तोंड फुटेल. नाहक नवा राष्ट्रीय ‘इश्यू’ चर्चेला येईल. त्यापेक्षा संख्यावाढीच्या धोरणावर लक्ष केंद्रित करणे उत्तम. त्यामुळे ते खूश होतील. तसेही सारेच त्यांना खूश ठेवण्यासाठी धडपडतात; मग आपण का मागे राहायचे?’ एका मध्यमवर्गीय वाघाचे हे म्हणणे साऱ्यांना पटले. मग हळूहळू एकेकाच्या मिशा पुन्हा टोकदार होऊ लागल्या. तेवढय़ात एक-दोन वर्षांचा बछडा वाऱ्याच्या वेगाने पळत बैठकीत आला. ‘मी त्यांना जवळून पाहिले पण मी मात्र त्यांना दिसलो नाही. कसा दिसणार? त्यांनी काळा चष्मा न काढताच दुर्बीण डोळय़ाला लावली होती’ हे ऐकताच सारे त्याला चूप करण्यासाठी सरसावले.. बछडा पळू लागला, तेव्हा सभाच पांगली.