खूप प्रयत्न केल्यावरही व्यंगचित्रातले टोकदारपण अपेक्षेएवढे खर्ड्यावर उतरत नाही, हे लक्षात आल्यावर थकलेले राज ठाकरे मटकन खुर्चीत बसले. अलीकडे वारंवार असे का व्हायला लागले? आपण सतत बदलत असलेल्या भूमिकांचा परिणाम कुंचल्यावरही झाला की काय, या शंकेने त्यांचे अंग शहारलेच. आपल्याजवळ शैली आहे. चित्र काढण्याची व बोलण्याची सुद्धा! त्यात वाहवत जात आपली राजकीय भूमिका चुकत असेल का? तसे असेल तर सुधारणेसाठी काय करायला हवे या प्रश्नासरशी त्यांना ‘फिडबॅक’ हा शब्द आठवला. बरेच दिवस झाले. तो घेणे सोडूनच दिलेले, हे ध्यानात येताच त्यांनी पक्षाच्या प्रमुख शिलेदारांना बोलावणे धाडले. ते हजर होताच त्यांनी विचारले, ‘अगदी खरे खरे सांगा, पाडव्याची सभा कशी झाली? भाषणातील मुद्दे लोकांना भावले का? त्यांचे म्हणणे काय? भूमिकेत आणखी काही सुधारणा हवी का?’ हा शेवटचा प्रश्न ऐकून शिलेदारही चक्रावले. तरीही आयती चालून आलेली संधी सोडायची नाही, असे ठरवत त्यातल्या एकाने सुरुवात केली. ‘तुमची अलीकडची दोन्ही भाषणे जोरदार झाली. सध्या केवळ समाजमाध्यमांतून सत्तेविरोधात शड्डू ठोकणाऱ्या कागदी पुरोगाम्यांना तर खूपच आनंद झालेला दिसला. काहींनी तर ‘म्हणून राज आवडतात’ अशा पोष्टी लिहिल्या. पण साऱ्यांच्या मनात एक शंका आहेच.’ हे ऐकताच ठाकरे सरसावून बसत म्हणाले, ‘कोणती?’ त्यावर तो हळूच म्हणाला, ‘तुमच्यात आता दिसत असलेला बदल पुढे टिकेल का हीच ती शंका.’

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

मग क्षणभर शांतता पसरली. यावर मौन बाळगत त्यांनी दुसऱ्याकडे मान वळवताच तो बोलू लागला, ‘तुम्ही गंगा व कबरीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना धू धू धुतल्याचा अनेकांना आनंद झाला पण नुसते बोलून काय उपयोग? नदी स्वच्छतेसाठी तुमचा पक्ष पुढाकार का घेत नाही? त्या टोलच्या आंदोलनापेक्षा हे केव्हाही चांगले.’ हे ऐकताच ठाकरे चपापले. मग साहेबांनी कटाक्ष टाकायच्या आधीच तिसरा म्हणाला, ‘लोक म्हणतात, ते नद्यांच्या प्रदूषणाबद्दल बोलतात हे ठीकच पण गेल्या काही वर्षांत त्यांनी वारंवार भूमिका बदलून जे मौखिक प्रदूषण करून ठेवले त्याचे काय? त्यांनी कोणतीही एक भूमिका ठामपणे घ्यायला हवी, तरच वास्तवातल्या प्रदूषणाचे गांभीर्य पक्षाला आहे असे वाटेल’ हे ऐकताच त्यांना राग आला पण काहीही न बोलता कुंचला दोन्ही हातांनी चोळत त्यावर नियंत्रण मिळवत चौथ्याकडे बघितले.

वातावरणातला ताण निवळावा म्हणून तो हसत म्हणाला, ‘अनेक सत्ताधारी तुमच्याकडे चहाला का येतात यावरचे स्पष्टीकरण लोकांना पटते पण ते तुमच्याचकडे चहाला का येतात? त्या उद्धवरावांकडे वा शरद पवारांकडे का जात नाहीत हा प्रश्न त्यांना सतावतो.’ हे ऐकताच ठाकरे हसले. हे चहापाणी आता थांबवायलाच हवे. आपल्या सौजन्याचा फायदा सत्ताधारी घेतात असे पुढच्या सभेत सांगायचे त्यांनी ठरवून टाकले. मग पाचवा उत्साहात म्हणाला, ‘तुमचे लाव रे तो व्हिडीओ अजूनही लोकांना खूप आवडते. भविष्यात त्यावर अधिक भर दिला तर पक्षाला चांगले दिवस येतील असे लोक म्हणतात.’ हे ऐकून ते सुखावले. आता हीच योग्य वेळ असे मनाशी ठरवत शेवटचा शिलेदार म्हणाला, ‘तुम्ही अख्खे भाषण सत्तेच्या विरोधात करता व सर्वांत शेवटी चांगल्या कामासाठी सत्तेला आमचा पाठिंबा असे म्हणत सारे वाया घालवता. यावरून दिसते ते तुमच्या भूमिकेतले प्रदूषण असे लोक म्हणतात.’ हे ऐकताच ठाकरेंनी ‘बस्स’ म्हणत साऱ्यांना शांत केले. मोठ्या हिमतीने उपस्थित केलेला प्रदूषणाचा मुद्दा पक्षावर उलटतो की काय या शंकेने त्यांना घेरले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma raj thackeray politics statement speech amy