१ मे, १९६० रोजी मराठीभाषी प्रांताचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. तत्पूर्वी १३ फेब्रुवारी, १९६० रोजी सावरगाव डुकरे येथे विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, ‘मराठी भाषक राज्याचे माझ्या मनात चित्र काढण्याचा जेव्हा मी प्रयत्न करतो, तेव्हा मराठी जनता राज्यसिंहासनावर येऊन बसली आहे, असे चित्र उभे राहण्याऐवजी या सिंहासनावर मराठी भाषा विराजमान झाली आहे, असेच चित्र मनात चितारले जाते.’(‘सह्याद्रीचे वारे’ पृ. २७३) त्यानुसार महाराष्ट्र सरकारने १९ नोव्हेंबर, १९६० रोजी ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’ची स्थापना केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंडळाच्या उद्दिष्टात मराठी भाषा, संस्कृती, इतिहासासंबंधी संशोधनास चालना देणे, मराठीतील विविध ज्ञान-विज्ञान शाखांतील स्वतंत्र, मौलिक लेखन, प्रबंध, नियतकालिके इत्यादींच्या प्रकाशनास सहाय्य, विश्वकोशनिर्मिती, साहित्य अकादमी व तत्सम संस्था प्रकाशित अभिजात ग्रंथांची मराठी भाषांतरे करून घेऊन ती प्रकाशित करणे, इत्यादींचा अंतर्भाव केला होता. मंडळ सदस्यांत महामहोपाध्याय वा. वि. मिराशी, प्राचार्य दि. धों. कर्वे, प्रा. अमृत माधव घाटगे, प्रा. गोवर्धन पारीख, प्रा. न. र. फाटक, प्रा वा. ल. कुलकर्णी, डॉ. पु. म. जोशी प्रभृती मान्यवरांचा समावेश होता. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी अध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्यावर १६ सदस्यांची प्रस्तावित यादी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे धाडली होती. तेव्हा ते म्हणाले, ‘‘अहो, तुम्ही १६ माणसे देता, हे एवढे विद्वान एकत्र आल्यावर वादविवादात वेळ जाईल. कामे बाजूला पडतील.’’ तेव्हा तर्कतीर्थ त्यांना म्हणाले होते की, ‘‘त्यांनी वादविवाद करावा हे मी गृहीत धरतो. ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:।’ त्यातून काही तात्त्विक व मौलिक प्रश्नांचा उलगडा होऊ शकेल. परंतु, अध्यक्ष या नात्याने मी त्याच्या वादाचा प्रक्षोभ होणार नाही, अशा पद्धतीने मर्यादा घालू शकतो. विद्वानांना एका विशिष्ट तऱ्हेच्या प्रश्नांचा निर्णय करण्यासाठी मार्गदर्शन करणे, हे अध्यक्षाचे काम आहे. ते मी करू शकलो नाही, तर अशा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा नवा पाया घालण्याचा तुमचा हेतू कार्यवाहीत कसा येणार?’’

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे औपचारिक उद्घाटन २२ डिसेंबर, १९६० रोजी नागपूर येथे संपन्न होणाऱ्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने झाले. तेव्हा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ग्वाही देत म्हणाले होते की, ‘‘या मंडळाने कुठल्या प्रकारचे कार्य करावे, ते कोणत्या पद्धतीने करावे, यासंबंधी बंधन नाही. शासन या मंडळावर कुठल्याही मर्यादा घालू इच्छित नाही.’’ त्यांनी एकापरीने या मंडळाची स्वायत्तताच घोषित केली होती. आज याचे प्रकर्षाने स्मरण व कृतिशील वस्तुपाठ पुन:श्च स्थापण्याची गरज काळ अधोरेखित करत आहे.

यशवंतराव चव्हाण १९६२ मध्ये भारत सरकारच्या मंत्रिमंडळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या निमंत्रण नि विनंतीनुसार संरक्षणमंत्री म्हणून सामील झाले. त्यानंतर आलेल्या मारुतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार प्रभृती मान्यवर उत्तराधिकारी मुख्यमंत्र्यांनी यशवंतराव चव्हाण यांची परंपरा पाळण्याची नोंद तर्कतीर्थांनी ‘पुस्तक पंढरी’च्या १९८१ च्या दिवाळी अंकात करीत लिहिले आहे की, ‘‘मी या मंडळावर जोपर्यंत होतो, तोपर्यंत शासनाच्या निर्णयामुळे अडसर असा क्वचितच निर्माण होत असे. याचे कारण, त्या सर्व मुख्यमंत्र्यांचा माझ्यावर विश्वास होता. कित्येक वेळा अडचणी आल्यामुळे कार्यविलंब होऊ लागला. परंतु, प्रयत्नात अडचणी कमी झाल्या. मुख्यमंत्र्यांना न आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा माझ्या अध्यक्षतेखाली घडल्या. कारागृहामध्ये बद्ध असलेल्या एका साम्यवादाच्या अणुविद्योवरील पुस्तकाला मंडळाने अनुदान दिले. कै. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांच्या मित्राने लिहिलेल्या ‘वसंतराव नाईक बहुजन समाजाचे थोर नेते’ या चरित्राला अनुदान देण्याचे मंडळाने नाकारले. परंतु, त्यामुळे वसंतराव नाईक यांनी कधीही नाखुशी दाखविली नाही. परंतु, हा सर्व अपवाद होय.’’

तर्कतीर्थांच्या कार्यकाळात मंडळांनी शेकडो ग्रंथ, मराठी विश्वकोशाचे अनेक खंड, कोश, भाषांतरे, ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशनांनी अनुकरणीय वस्तुपाठ कायम केला.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra state board of literature and culture marathi language research culture history yashwantrao chavan laxman shastri joshi ssb