दिवाळी संपली आणि तुळशीचं लग्न झालं की लगीनसराईचे दिवस सुरू होतात. कामजीवनाला सुरुवात करणाऱ्या बहुतेकांना जोडीदाराबरोबर वागावं कसं हे सांगणारं कोणीच नसतं. आता जी माहिती इंटरनेट देईल ती योग्यच असं मानलं जातं. पण भारतीय संस्कृतीमध्ये कामजीवनाचा अभ्यास आणि त्याचं प्रदर्शन याला कमालीचं महत्त्व दिलं आहे. कामशिल्पाच्या परंपरेत अग्रेसर असणाऱ्या देशात आता लैंगिक शिक्षण या विषयावर कोणी बोलायलाही तयार नसतं. असे विषय सार्वजनिक पातळीवर उघडपणे बोलायचे नसतात, ही शिकवण एक पाऊलही पुढे टाकू देत नाही. मात्र, या क्षेत्रातील इतिहास संपन्नतेचा आहे.

मूल्य शिक्षणाचा स्वतंत्र तास असावा, अशी एक नवी टूम मध्यंतरी निघाली होती. मूल्यं शिकवता येतात, की ती आपोआप रुजतात? खरंतर कोणीच कोणाला काही शिकवत नसतं. शिकण्यासाठी वातावरण निर्माण करावं लागतं. ग्रहण करण्याची क्षमता जशी तसं अध्ययन. जे रुजेल आणि जेवढं रुजेल, त्यातून एक मूल्य नावाचं काही तरी जन्म घेत असावं. कालौघात मूल्यांची चौकट तयार होते. ती बदलतही जाते. मूल्यशिक्षणात लैंगिकताअंतर्भूत असतेच असं आपण गृहीत धरलं असल्याने त्याविषयी सार्वत्रिक मौन. तो मौनाचा इतिहास तसा अलीकडचाच. अन्यथा खजुराहोची लेणीनिर्मिती कशासाठी झाली असती? खरंतर सोवळ्याओवळ्यात धर्म शोधणाऱ्यांनी खजुराहो लेणी पाहायला हवीत. मग प्रश्न पडेल पवित्र मानल्या जाणाऱ्या देवळांमध्ये कामशिल्पं का कोरली असतील? केवळ खजुराहोमध्ये कामशिल्पं आहेत असंही नाही. देशभर एक मोठी परंपरा जपलेली दिसते. खजुराहोप्रमाणेच कोणार्क, गुजरातमधील मोढेरा, राजस्थानात राणकपूर, आंध्र प्रदेशातील पालमपेठ, कडप्पा जिल्ह्यात कॉलकुबोले, कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील वेलगवीपासून ते वेरुळच्या लेणींमध्येही कामशिल्पं आढळून येतात. अलीकडे राज्यकर्त्यांना भूतकाळाच्या खोल निसरड्या पायऱ्यांवरून पळायला नेणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यांनी एकदा या कामशिल्पांचा इतिहास वाचून पाहावा.

या परंपरेतील कदाचित पहिलं शिल्प ‘लज्जागौरी’चं. पुढे कामशिल्प विकासाचा एक स्वतंत्र आलेखही अभ्यासकांनी मांडला आहे. अगदी वेरुळच्या लेणींमध्येही रती मदनाच्या शिल्पापासून कैलास लेणींतील शिवमंदिरातील समांतर रंगमंचावर काही कामशिल्पं कोरण्यात आली आहेत. एका बाजूला ध्यान आणि दुसरीकडे काम. या दोन्हीमध्ये जगणं अभिव्यक्त करणाऱ्यांची मोठी परंपरा जपली गेली आहे. विशेष म्हणजे अशी कामशिल्पाची अभिव्यक्ती समाज जडणघडणीसाठी आवश्यक असते, असे मानणारी समाजरचना होती का? कामशिल्प करणाऱ्याला कोणी मारहाण केली नाही की, त्याची हत्यारे काढून घेतली नाहीत किंवा गुन्हाही दाखल केला नाही. व्यक्त होणाऱ्यास स्वातंत्र्य देण्याची परंपरा रुजलेली असावी इतिहासात. वर्तमानात श्लील आणि अश्लीलतेची चौकट अधिक मजबूत व्हावी, असे प्रयत्न करणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी ती मानसिकता आंतरजाल व्यवस्थेने पार उधळून लावली आहे.

पण एक प्रश्न सनातन आहे तो म्हणजे मंदिरासारख्या पवित्र मानल्या जाणाऱ्या वास्तूवर कामशिल्पं कोरण्याचे प्रयोजन काय असेल ? अशी कामशिल्पं कोरण्याला प्रोत्साहन देणाऱ्या राज्यव्यवस्थेसमोर असे कोणते प्रश्न असतील की त्यांना कामभावनेचे हे रूप जाहीरपणे प्रकट व्हावे असे वाटले असेल? लैंगिकता आणि हिंसा या दोन्हीभोवती होणारं रंजन हे अनेक कलाकारांना भुरळ घालणारं आहे. पण केवळ भुरळ यावर कलाकृती जन्माला येत नाही. प्रत्येक शिल्प, चित्र, काही तरी हेतूनेच मांडलं जातं. कामशिल्पाचा हेतू काय असेल, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. ‘भारतीय कामशिल्पे’ या नावाचं एक पुस्तक सु. र. देशपांडे यांनी लिहिलं आहे. यात कामशिल्पाचा मोठा विस्तृत पट मांडण्यात आला आहे. काही स्पष्टीकरणे दिली आहेत.

कोणतीही कलाकृती विचारशून्य कृती कशी असेल? पण कामशिल्प मांडणी आणि त्याचे हेतू याचा सहसंबंध मांडण्यात वर्षानुवर्षे अभ्यासकांना यश आले नाही. काही तर्क जरूर आहेत. एका बाजूला ध्यानस्त असणारे गौतम बुद्ध आणि त्याच लेणींभोवती कमनीय बांध्याच्या सुंदर ललना दिसतात. बाहेरचे सौंदर्य लेणींमध्ये गेल्यावर आठवत नाही. आतील शांतता बाहेरच्या कोलाहलावर मात करणारी असते, असाच संदेश तर द्यायचा नसेल लेणी कोरणाऱ्या कलाकाराला. कदाचित असेल किंवा नसेलही. अलीकडे लेणी पाहायला येणारा माणूस त्या कलाकृतीच्या अद्भुत आणि विशालतेने हरखून जातो. आपण हे काय पाहतो आहोत, हेच त्याला कळत नाही. त्यामुळे शिल्प काय संदेश देऊ पाहते आहे, असा प्रश्नच पडत नाही. काही लेणींमध्येच कामशिल्पं दिसतात, असे का असेल? अंजिठ्याच्या लेणींमध्ये कामशिल्पं नाहीत. तिथे जातक कथा, बोधिसत्व आणि बुद्धतत्त्व अशीच मांडणी. या लेणींमध्ये मोक्ष हाच एकमेव पुरुषार्थ मानला गेला असेल का? मन:शांतीच्या प्रक्रियेत कामभावना प्रमुख काम करते हे आता जवळपास सर्व मानसोपचारतज्ज्ञांना मान्य असणारं तत्त्व आहे. औषधोपचार त्या आधारे बदलावेत, अशी प्रगती अगदी वैद्याकीय क्षेत्रातही झाली आहे. जेव्हा कामशिल्पं नव्हती तेव्हा कामभावना होतीच. तरीही ती मांडली जावी, असं शिल्पकारांना का वाटलं असेल?

साधारणत: गुप्तकाळापासून मंदिरांचं महत्त्व वाढू लागलं. या काळात अगदी मंदिर आणि शिल्पकला जणू एकच अशी स्थिती निर्माण झाली. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे सारे पुरुषार्थ जिथे सापडू शकतात अशी जागा मंदिर असावी, असं वाटून कदाचित कामशिल्पं निर्माण झाली असावीत. मंदिराचे गृर्भगृह सोडून सर्व ठिकाणी ती कोरली गेली असावीत, असा एक तर्क मांडला जातो. खजुरोहासारख्या मंदिरावरील कामशिल्पांची बांधणी ही उभ्या आकारातील आहे. मंदिराचे आकारही गंगनचुंबी आहेत, कैलास पर्वतासारखे. जिथे शिवतत्त्वाला परमोच्च सुख मिळते त्याचा विलास म्हणून कामशिल्पं असावीत. हाच संदर्भ कदाचित वेरुळमधील कैलास लेणींमधील कामशिल्पांस लागू पडू शकतो.

ज्या काळात कामशिल्पं कोरली गेली तत्पूर्वी समाजाच्या केंद्रस्थानी मोक्ष होता. बौद्ध धर्म प्रभाव आणि हिंदू धर्मातील वैराग्य आणि ब्रह्मचर्य हे त्याचे साधन मानले जात होते. मोठ्या प्रमाणावर वैराग्य आणि ब्रह्मचर्य हे केंद्रस्थानी राहू नयेत तो प्रभाव कमी करण्यासाठी म्हणूनही खजुराहोमधील कामशिल्पं उभी केलेली असू शकतात, असाही तर्क मांडला जातो. पण अजिंठ्यासारख्या ठिकाणी बुद्धांचे महानिर्वाण, त्यांचे व्रस्तस्थ जगणे हे शिल्पकारांच्या केंद्रस्थानी होते. जातक कथा, बोधिसत्त्वाच्या कहाण्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात हे उद्दिष्ट असावे, हे स्पष्टपणे दिसते. पण अनेक मंदिरांमध्ये कामशिल्पाचे अर्थ तत्कालीन समाजाला लैंगिक शिक्षण देणे हेही असू शकेल, असाही तर्क मांडला जातो. कोणार्कच्या सूर्य मंदिरावरील शिल्पं ही गणिकेच्या राणीने बनवून घेतली असावीत, असाही तर्क आहे. वेश्यांच्या आयुष्यातील रात्र ही शोषणाची. त्यांना कधी एकदा सूर्य उगवतो असं होत असावं. रात्रीतील सर्व व्यवहार होऊ नयेत, अत्याचार होऊ नयेत म्हणूनही कामशिल्पं करवून घेण्यात आली, असंही स्पष्टीकरण दिलं जातं. पण हे विचार केवळ नंतर जोडले गेले. कामशिल्पाचे हेतू, या विषयावर तसे ठोस काही हाती लागत नाही, असंच अभ्यासकांनी नोंदवून ठेवलं आहे.

खरे तर खजुराहोसारख्या ठिकाणी सध्या अस्तित्वात असणारी ६२० शिल्पं कोरण्यापूर्वी कामसंहिता लिहून पूर्ण झाली होती. शिल्प हे त्या शब्दांचं माध्यमांतर आहे. कामसूत्रातील शब्दांचे शिल्प करणाऱ्या या कलाकारांना एकाच वास्तूमध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ एकत्र कोरण्यास सांगण्यात आले होते. पुढील काळात कामशिल्पांऐवजी अनेक सर्जनशील प्रतीकं आपण पूजत आलो त्यात वृषभ असो की वारुळ किंवा कवडी.

‘शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे’ असा श्लोक म्हणताना शुकाचं वैराग्य काय होतं, असा प्रश्न पडत नाही आणि पडला तर विचारला जाऊ दिला जात नाही. शुकमुनी अप्सरा स्नान करत असणाऱ्या भागातून जात होते. या अप्सरेतील कोणीही स्वत:ची वस्त्र प्रावरणं न सावरता त्यांचे आशीर्वाद घेतले. असं का केलं असं त्यांचे वडील व्यासांनी अप्सरांना विचारलं तेव्हा त्यांच्या नजरेत आसक्ती नसते, असं उत्तर देण्यात आलं. या कथेतलं वैराग्याचं वर्णन श्लोकातून व्यक्त होणाऱ्या धर्मशास्त्रात आहे. कामशिल्पं ठसठशीतपणे देशभर पसरलेली आहेत. तरीही शाळा महाविद्यालयांमधून लैंगिक शिक्षणाचा विषय जरी चर्चेत आला तरी कमालीची शांतता सर्वत्र पसरते. या आठवड्यात मुलींच्या विवाहाचं वय १८ वरून १६ वर आणावे काय, यावर एक चर्चासत्र दिल्ली येथे भारत सरकारच्या वतीने घेतलं जात आहे. अनैतिक संबंधांतून खुनाच्या बातम्या रोज धडकत असतात. त्याचे पडसादही आता समाजजीवनात उमटत नाहीत. कारण काय असू शकेल याचं, कदाचित लैंगिक शिक्षणाकडे झालेलं दुर्लक्ष असेल का, असा प्रश्न उरतोच…