चाळीस कोटी पुस्तके विक्री असलेला आणि सर्वात लिहिता लेखक म्हणून स्टीफन किंगची ओळख. या माणसाने नुसत्या शेकडो कथा-कादंबऱ्याच लिहिल्या नाहीत तर भयसाहित्याचा चिकित्सक अभ्यास असलेला ‘डान्स मकाब्र’ व स्वत:च्या लिखाणाचे आत्मचरित्र मांडणारा ‘ऑन रायटिंग’ असे दोन रसाळ ग्रंथही रचलेत. जे कोणत्याही प्रकरणापासून वाचता-वाचता त्यात बुडून जावे. ‘कॅरी’ ही त्याची पहिली कादंबरी एप्रिल १९७४ साली प्रकाशित झाली. गेल्या महिन्यात त्या कादंबरीची पन्नाशी साजरी झाली. सलग पन्नास वर्षे खूपविकी पुस्तके लिहिणारा हा लेखक निव्वळ भयकथा लेखक म्हणून वेगळा काढता येत नाही. तो रहस्य, गुन्हे, विज्ञानकाल्पनिका आणि चमत्कृतीपूर्ण अशा सर्व प्रांतांत रमला आहे. कॅसल रॉक, लडलो, स्टोनिंग्टन, डेरी, जेरुसलेम्स लॉट ही त्याने आपल्या कथा-कादंबऱ्यांमध्ये तयार केलेली काल्पनिक शहरे. या शहरांत वाढणाऱ्या अमेरिकी माणसांच्या बदलाची पार्श्वभूमी तसेच शहरांतील आर्थिक-सांस्कृतिक बदल हादेखील त्याच्या कथानकाचा पाया असतो. नारायण धारपांनी त्याच्या कादंबऱ्यांपासून प्रेरणा घेऊन ‘शपथ’ (इट) आणि ‘लुशाई’ (सेलम्स लॉट) आणि आनंदमहल (शायनिंग) यांचे कथानक पूर्णपणे मराठीत घडविले. वयाच्या ७६ व्या वर्षातही किंग भरपूर वाचतो आणि अर्थात लिहितो. वर्षाला नव्या कादंबरीसह वाचकांसमोर हजर असतो. ‘बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरीज’च्या २००७ च्या खंडाचे संपादन त्याने केले होते. अॅमेझॉनचे ‘किंडल’ हे ई-बुक-रीडर २००९ मध्ये बाजारात आले, तेव्हा त्याच्यासह ‘यू आर’ ही किंगची लघुकादंबरी उपलब्ध करून देण्यात येत असे. आता ती ‘बझार ऑफ बॅड ड्रीम्स’ या कथासंग्रहात समाविष्ट आहे. किंगच्या कादंबऱ्या भरपूर असल्या तरी काही वर्षांआड त्याचे कथासंग्रही येतात. ‘इफ इट ब्लड्स’ या २०२० सालातील कथासंग्रहानंतर गेल्या आठवड्यात ‘यू लाइक इट डार्कर’ या नावाचा त्याचा संग्रह दाखल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> लोकमानस : मस्तवाल अधिकारी, निडर धनाढ्य!

त्यात १२ कथा आहेत. काही ५० पानांच्या तर काही दीडशे पानांच्या आहेत. पुस्तक दाखल होताच त्यातील पाच अप्रकाशित कथांच्या निमित्ताने किंगच्या जगभरच्या चाहत्यांमध्ये कुतूहल वाढले.आठवड्यात खूपविक्या गटात त्याचा शिरकाव झाला. या संग्रहातील पहिलीच ‘टू टॅलेण्टेड बेस्टिड्स’ ही लघुकादंबरी वाचायला सलग तीन-साडेतीन तास लागतात. निवेदक एका गाजलेल्या (किंगइतक्याच प्रख्यात) लेखकाचा मुलगा आहे. या लेखकाची मुलाखत घेण्यासाठी एक झुंजार पत्रकार येते. तिचे स्वारस्य हे लेखकाच्या अचानक प्रकाशझोतात येण्याचे तात्कालिक कारण शोधण्यात असते. पण वय झालेला लेखक तिची भेट टाळतो. आडमार्गाने ती लेखकाची भेट घेते. पण तिच्या हाती माहितीचा कुठलाच विस्तृत तपशील येत नाही. लेखकाच्या मृत्यूनंतर त्याचा निवेदक असलेला मुलगा पत्रकाराच्या कुतूहलाचा उलगडा लावतो. त्याची ही लांबच लांब चालणारी गोष्ट. काल्पनिक कॅसल रॉक शहर, त्या शहरातील जुन्या भागांचा इतिहास, तिथल्या माणसांचा इतिहास, दोन मित्रांचा जंगल यात्रेनंतर अचानक होणारा उदय अशी ही कहाणी वाचताना पुढल्या टप्प्यातील रहस्य आकर्षण अधिकाधिक तीव्र होत जाते.

नशीब, नियती आदी किंगच्या अनेक कथांमध्ये असणारे घटक यात आहेतच. पण आरंभीच पुस्तकाच्या या पाचशे पानांच्या ठोकळ्यात गुंतवळ निर्माण होते. पुढल्या सगळ्याच कथांबाबत वेगळे म्हणता येणार नाही. ७६ वर्षांच्या- आजोबावयाच्या माणसाच्या- या कथा अजिबातच वाटत नाहीत, हे किंग यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य. एक कथा श्वानावरची आहे, एक स्वत:ला दारूच्या व्यसनापासून सुधारू पाहणाऱ्या व्यक्तीची, एक विमानातील भयाचा विस्तार करणारी, नशीब वाईट्ट असल्याने सातत्याने व्यंगत्वाची नवनवी द्वारे उघडणाऱ्या व्यक्तीवर बेतलेली, एक जुन्याच गाजलेल्या कथेचा पुढला भाग आहे.

‘द आन्सर मॅन’ या कथेची चर्चा गेले काही दिवस किंगचाहत्यांमध्ये रंगली आहे. वयाच्या तिशीत सुरू केलेली ही कथा पूर्ण करण्यासाठी किंगने तब्बल ४५ वर्षे घेतली. अर्धवट अवस्थेत सोडलेल्या या कथेचे बाड काही वर्षांपूर्वी किंगच्या पुतण्याला सापडले. सत्तरच्या दशकात ज्या बिंदूपाशी ही कथा अडकली होती, तिथून पुन्हा सुरू करत गेल्या वर्षी ही कथा किंगने लिहायला घेतली. त्यात बदल करून पुन्हा लांबोडक्या आकाराची कथा तयार झाली. किंगने अतींद्रिय घटनांचे वाचकांना जवळजवळ सर्व कथांमध्ये साक्षीदार केले आहे. किंगच्या कथा-कादंबऱ्यांवरून सिनेमाचे बेत पूर्ण अपूर्ण होण्याच्या बातम्या वर्षातील बारा महिने सुरू असतात. या संग्रहातील अप्रकाशित आणि प्रकाशित कथांमधून पुढल्या काळात किती सिनेमा प्रकल्प उभारले जातायत, त्याचे कुतूहल मोठे आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New collection of short stories by author stephen king zws