निखिलेश चित्रे

ग्रंथदालनं ही समाजासाठी नक्की काय करतात, तर वाचकांच्या बौद्धिक सजगतेला वाढवत त्यांच्यात प्रश्न-उत्तरांची आवर्तनं घडवतात. सांस्कृतिक अभिसरणाला चालना देतात. मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या ‘जागतिक ग्रंथदिना’निमित्त पुस्तकांच्या दुकानाचं अस्तित्व साजरं करणाऱ्या एका पुस्तकावर आणि ग्रंथपरिचयाची १२५ वर्षांची परंपरा जपणाऱ्या वृत्तपत्राच्या समृद्ध वाचनस्नेही उपक्रमाबद्दल..

काही वर्षांपूर्वी ऑलिव्हर डार्कशायर नावाच्या माणसानं हेन्री सॉथेरन  या लंडनमधल्या २६३ वर्षांच्या पुस्तकांच्या दुकानात नोकरीसाठी प्रवेश केला. वर्षभर ही नोकरी करून मग दुसरीकडे चांगल्या पगाराची नोकरी बघायची असा त्याचा विचार होता. पण जुन्या पुस्तकांनी वेढलेल्या त्या वातावरणात तो इतका रमला, की आजही तो तिथेच कार्यरत आहे. तिथल्या अनुभवांवर आधारित डार्कशायरनं लिहिलेलं ‘वन्स अपॉन अ टोम: द मिसअ‍ॅडव्हेन्चर्स ऑफ अ रेअर बुकसेलर’  हे रोचक आणि रसाळ पुस्तक दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालं. या पुस्तकात पुस्तकविक्रेत्याच्या आठवणी तर आहेतच, पण लंडनमधल्या वाचनसंस्कृतीचा एक उभा छेद या आठवणींतून वाचकासमोर उलगडत जातो.

दोन शतकांहून अधिक काळ टिकून राहिलेल्या कोणत्याही पुस्तकांच्या दुकानाभोवती अनेक आख्यायिकांचं मोहोळ जमणं साहजिकच आहे. या पुस्तकात निवेदनाच्या ओघात असे अनेक रोचक किस्से येतात. शंभर वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झालेल्या मालकाच्या भुताचा किस्सा हा त्यापैकीच एक. हे भूत कोणाला दिसत किंवा त्रास देत नाही. पण ज्याचं स्पष्टीकरण देता येत नाही असा दुकानात घडलेला प्रत्येक प्रसंग किंवा घटना यांचं श्रेय या भुताकडे जातं. शेल्फवरच्या पुस्तकांनी स्वत:हून जागा बदलणं, कुलूपबंद कपाटं आपोआप उघडणं आणि आतली पुस्तकं फडफडणं, बाथरूमच्या पाइपमधून विचित्र आवाज येणं असे प्रकार दुकानात वारंवार घडत असतात.

हेही वाचा >>> बुकमार्क : ग्रंथ परिचयाच्या विश्वात..

लेखकानं सांगितलेले शापित पुस्तकांचे किस्सेही मजेशीर आहेत. उमर खय्यामच्या रूबाईयात या प्रसिद्ध पुस्तकाची एक अति महागडी प्रत सॉथेरनकडे होती. तिची किंमत एवढी जास्त होती की ती विकत घ्यायला कुणीही तयार होईना. या जास्त किमतीचं कारण म्हणजे पुस्तकाचं रत्नजडित बाइंिडग. शेवटी कंटाळून मालकानं ते पुस्तक अमेरिकेतल्या एका प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवायचा निर्णय घेतला. पण कस्टम खात्यानं त्या पुस्तकावर जो कर आकारला तो द्यायला मालकानं नकार दिला. त्यामुळे ते पुस्तक गेल्या पावली परत आलं. शेवटी ते लिलावात अगदी कमी किमतीला विकलं गेलं. ते ज्यानं विकत घेतलं तो गॅब्रियल वेल्स नावाचा अमेरिकन माणूस होता. तो परतीच्या प्रवासाला निघाला टायटॅनिकमधून. त्या बोटीबरोबरच अर्थातच ते पुस्तक समुद्रतळाशी बुडालं. अजब गोष्ट अशी की त्यानंतर महिन्याभरातच त्या पुस्तकाचा बाइंडरही बुडून मरण पावला. यानंतर लेखक म्हणतो. ‘‘ज्यांचा पुस्तकांच्या शापित असण्यावर विश्वास नसतो, त्यांना तसा अनुभव आलेला नसतो इतकंच.’’

या पुस्तकातलं हेन्री सॉथेरन हे केवळ पुस्तकांचं दुकान नसून गतकाळ आणि वर्तमान यांना जोडणारा दुवा आहे. या २६३ वर्षांच्या पुस्तकांच्या दुकानाचा अवकाश गतकाळात घट्ट रुजलेला आहे. मात्र त्यात फक्त हळवा नॉस्टॅल्जिया नाही, तर परंपरा आणि इतिहास यांचं डोळस भान आहे. त्यामुळे इथे पुस्तकविक्रेता केवळ क्रय-विक्रयाचा व्यवहार करणारा व्यापारी नसून सांस्कृतिक प्रतिनिधी आहे. त्याला ग्रंथव्यवहाराविषयी उत्कट आस्था आहे आणि आपल्यावर असलेल्या अदृश्य सांस्कृतिक जबाबदारीची प्रखर जाणीव आहे. हे दुकान भूतकाळात रुतून राहिलेलं नाही, तर काळाबरोबर बदलत गेलेलं आहे. ते हट्टीपणे न बदलता तसंच राहिलं असतं, तर दोनशे वर्ष टिकूच शकलं नसतं, असं लेखक म्हणतो.

या दैनंदिन ग्रंथव्यवहाराचं वर्णन करताना तिरकस विनोद अनेक ठिकाणी सहजतेनं येतो. त्यात ग्राहकांच्या तऱ्हेवाईक मागण्या आहेत, सहकाऱ्यांच्या स्वभावातल्या विसंगती आहेत, पुस्तकांच्या नावावरून होणाऱ्या गफलती आहेत. जगण्याच्या गद्य व्यवहारांतल्या अनागोंदीतला हा विनोद डार्कशायरच्या सूक्ष्म दृष्टीनं अलगद टिपला आहे. दुकानात विविध कार्यक्रमांचं आयोजन करताना उडालेला गोंधळ असो किंवा जीर्ण पुस्तकं हाताळताना उडणारी तारांबळ असो लेखकाची दृष्टी त्यातलं गांभीर्य न गमावता मासा पकडणाऱ्या बगळयासारखी त्यातला विनोद नेमका पकडते. उदाहरणार्थ, पुस्तकातलं एक प्रकरण फक्त तऱ्हेवाईक गिऱ्हाईकांवर आहे. पुस्तकं घेण्याऐवजी विक्रेत्याला आपलं गाणं ऐकण्याचा आग्रह करणारी बाई, कायम सूट घालून दुकानात येणारा आणि आयन रँडच्या पुस्तकांची चौकशी करताना मध्येच मोठयानं हसणारा माणूस किंवा नको असलेली पुस्तकं गळयात मारणारा सेल्समन- अशी रोचक शाब्दिक व्यंगचित्र लेखक नजाकतीनं रेखाटतो.

लेखकानं पुस्तक संग्राहकांचं दोन ढोबळ प्रकारांत वर्गीकरण केलेलं आहे. पहिल्या प्रकारातले लोक भारंभार पुस्तकं साठवत बसतात. त्यांच्याकडे ती साठवण्यासाठी भरपूर जागाही असते. त्यांच्या आवडीचा ठरावीक विषय असा नसतो. ते सर्व प्रकारची पुस्तकं घेत राहतात. दुसऱ्या प्रकारातले संग्राहक विशिष्ट विषयाची किंवा प्रकारचीच पुस्तकं विकत घेतात. त्यांना त्यांच्या आवडत्या विषयाबाहेरच्या पुस्तकांत रस नसतो. अस्सल पुस्तकविक्रेत्याला या दोन प्रकारांतला फरक नेमका ओळखू येतो, असं डार्कशायर म्हणतो.

पुस्तकविक्रीच्या व्यवसायातले बारकावे निवेदनाच्या ओघात सहजतेनं समाविष्ट होतात. दुर्मीळ पुस्तकाची किंमत ठरवणं, जर्जर पुस्तकाचा जीर्णोद्धार किंवा लुप्त समजण्यात आलेलं पुस्तक अचानक मिळणं हे सगळं अत्यंत वाचनीयतेनं पुस्तकात आलेलं आहे. या तपशिलांतून पुस्तकविक्रीचे कलात्मक पैलू समोर येतात.

हे पुस्तक पुस्तकांइतकंच माणसांनी गजबजलेलं आहे. पुस्तकविक्रेते, ग्राहक, बाइंडर अशी अनेक रंगीबेरंगी पात्रं इथे वाचकाला भेटतात. या प्रत्येकाची स्वत:ची अशी गोष्ट आहे. या सगळया गोष्टी एकमेकींत आणि पुस्तकांत गुंतलेल्या आहेत. लेखक-निवेदकाच्या या सगळयांशी आलेल्या संपर्कातून या आठवणींना मानवी स्पर्श लाभला आहे. अशा प्रकारचे रोचक किस्से पुस्तकात पानोपानी आहेत. त्यामुळे पुस्तकाची वाचनीयता तर वाढतेच, शिवाय लंडनमधील पुस्तकविश्वाची ओळख वाचकाला होते.

काही जण पुस्तकाच्या वस्तू म्हणून प्रेमात असतात. पुस्तकाचा स्पर्श, वास, पानं उलटताना होणारा आवाज या गोष्टींचं त्यांना आकर्षण असतं. दुकानात फक्त जुन्या पुस्तकांचा वास घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे असं लेखक सांगतो. आपल्याला पुस्तकांचा वास आवडतो म्हणून आपण इथे आलो आहोत, आपल्याला पुस्तकं अवतीभवती असलेली आवडतात असं कबूल करणारे बरेच जण दुकानात नेहमी येत असतात. पण सॉथेरनमधले विक्रेते त्यांची गरज समजून घेतात. पुस्तकांच्या सान्निध्यात असण्याची गरज अतिशय मानवी आहे असं लेखक म्हणतो. या संदर्भात पुस्तकात आलेली एका वृद्ध महिलेची आठवण मार्मिक आहे. ही बाई आपल्या नातवाला घेऊन दुकानात आली. तिनं त्याला खोलवर श्वास घ्यायला सांगितला. मग विक्रेत्याजवळ जाऊन तिनं आपल्या या भेटीचं कारण सांगितलं. ती नातवाला घेऊन लंडनच्या ‘गंधयात्रे’वर निघाली होती. ही गंधयात्रा म्हणजे काय? तर माणसाच्या स्मृतीत दृश्य आणि ध्वनी यापेक्षा गंधाबाबत अधिक तीव्र असतात. त्यामुळे ती तिच्या नातवासह लंडनमधल्या तीव्र ‘गंध-स्वरूप’ असलेल्या ठिकाणांना भेटी देत होती. नातू तिथला गंध मनात साठवत होता. असं केल्यामुळे तो मोठा झाल्यावर आपण या जगात नसलो, तरी त्याला तो गंध आला की आपली आठवण येईल, असं त्या महिलेला वाटत होतं.

डार्कशायरच्या निवेदनात एक शांत समजूतदारपणा आहे. त्यामुळेच लेखक भिन्न स्वभावाच्या तऱ्हेवाईक, प्रसंगी विक्षिप्त ग्राहकांना समजून घेतो. एका ठिकाणी तो मार्मिक निरीक्षण नोंदवतो:

‘‘अलीकडच्या काळात लंडनमध्ये पुस्तक-यात्रा (बुक टूर्स) करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या लोकांचे गट एका पुस्तकाच्या दुकानातून दुसऱ्या दुकानात ‘साइट सीइंग’ केल्यासारखे हिंडतात. काही जणांना हा प्रकार आवडत नाही. पण डोळे विस्फारून विस्मयानं पुस्तकांकडे बघणारी ही माणसं पाहिली की मला माझा सॉथेरनमधला पहिला दिवस आठवतो आणि छान वाटतं. मी त्यांना समजू शकतो.’’

पुस्तकांची चांगली दुकानं ही फक्त ग्रंथव्यवहारापुरती मर्यादित नसतात. ती वाचकाची बौद्धिक सजगता कायम ठेवणारी सांस्कृतिक केंद्रं असतात. ती वाचकाला चकित करतात. त्याच्यासमोर आव्हानं उभी करतात. प्रश्नांची उत्तरं देतात. नवे प्रश्नं निर्माण करतात. सांस्कृतिक अभिसरणाला चालना देतात. ‘वन्स अपॉन अ टोम’ हे पुस्तक पुस्तकांच्या दुकानांचं अस्तित्व साजरं करतं. तसं करताना ते अ‍ॅमेझॉनसारख्या पुस्तकविक्रीच्या ऑनलाइन पर्यायांचं महत्त्व नाकारत नाही किंवा त्यांच्या लोकप्रियतेसमोर पूर्वग्रहातून नैतिक प्रश्नही उभे करत नाही, तर प्रत्यक्षातल्या पुस्तकदुकानांचं महत्त्व नव्यानं अधोरेखित करतं. पुस्तकांच्या दुकानाची नवी नाती, नवे संदर्भ निर्माण करण्याची क्षमता, दुकानाचा त्या शहराशी असलेला अन्योन्यसंबंध याची नव्यानं उजळणी करतं. हे काम महत्त्वाचं आहे. कारण सांस्कृतिक इतिहासातलं पुस्तक व्यावसायिकांचं महत्त्व लक्षात घेणं त्यांचा वारसा जपण्यासाठी गरजेचं आहे. 

वन्स अपॉन अ टोम: द मिसअ‍ॅडव्हेन्चर्स ऑफ अ रेअर बुकसेलर ऑलिव्हर डार्कशायर

प्रकाशक:  बँटम बुक्स

पृष्ठे : २५६, किंमत : ६२८ रुपये

satantangobela@gmail.com