रवींद्र कुलकर्णी

‘न्यू यॉर्क टाइम्स’चे पाळण्यातले नाव ‘न्यू यॉर्क डेली टाइम्स’ असे होते. अमेरिकन यादवी युद्धाच्या १० वर्षे आधी म्हणजे, १८५१ साली त्याचा जन्म झाला. त्याच्या जन्मदात्यांची त्यामागची भूमिका अशी होती की समाजात पूर्णपणे चांगले अथवा पूर्णपणे टाकाऊ असे काही नसते. ‘‘जे चांगले आहे ते जपू आणि त्यात सुधारणा करत राहू तसेच जे वाईट आहे ते नष्ट करू वा बदलू.’’ या भूमिकेला अनुसरून प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांबद्दल माहिती देणे पत्राच्या पहिल्या आवृत्तीपासून सुरू झाले. माहिती देतानाही समाजाला आरसा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी म्हटले, ‘‘साहित्यातून प्रगट होणाऱ्या समाजातल्या रीतीभाती, नीतीच्या समजुती वाचकांना दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहील. कधी कधी त्यावर टीकाही केली जाईल, पण ती नम्रतापूर्वक असेल, अर्थात अधेमधे यात चुकाही होण्याचा संभव आहे.’’

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
senior scientist dr anil kakodkar
अग्रलेख : सुरक्षित सपाटांचे साम्राज्य!
big job cuts in indian it companies
­­­­अग्रलेख : स्वयंचलन आणि स्वहित
students choose the US for overseas higher education
अग्रलेख : ‘आ’ आणि ‘उ’!
loksatta editorial pm narendra modi controversial statement on muslim community
­­­­अग्रलेख : पंतप्रधानांचे आभार माना!
article about elon musk india visit elon musk investment in india
अन्यथा : जगी ज्यास कोणी नाही, त्यास..
Loksatta editorial political party Speeches of political leaders criticizing each other
अग्रलेख: घंटागाडी बरी…
d gukesh
अग्रलेख: महाराष्ट्र ‘दीन’!

‘न्यू यॉर्क टाइम्स’ प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची नोंद आणि त्यांच्या जाहिराती देणे, यावरच थांबून राहिले नाही. पुस्तकांबद्दल लिहिणे, साहित्यविषयक विविध लेखकांचे निबंध आणि मुलाखती, तसेच वाचकांची पत्रे प्रकाशित करणे हेही सुरू राहिले. १८९६ पासून दर शनिवारी ‘न्यू यॉर्क टाइम्स बुक रिव्ह्यू’ या नावाने स्वतंत्र पुरवणी देणे सुरू केले. त्यात राजकारण, संगीत, क्रीडा अशा विविध प्रकारच्या जीवनप्रवाहात अग्रणी असणाऱ्या माणसांनी पुस्तकांवर लिहिले. ‘न्यू यॉर्क टाइम्स बुक रिव्ह्यू १२५ इयर्स ऑफ लिटररी हिस्टरी – १८९६ टू २०२१’ या अत्यंत देखण्या पुस्तकात १२५ वर्षांतील मोजकी पुस्तक परीक्षणे, निबंध, मुलाखती, वाचकांची पत्रे व तसेच काही छायाचित्रे एकत्र करण्यात आली आहेत. पुस्तक परीक्षणे लिहिणाऱ्या लेखकांची नावे पाहिली तरी या ग्रंथाच्या श्रीमंतीची आपल्याला कल्पना यावी. जेम्स बाल्डविन, मार्गारेट अ‍ॅटवुड, व्हर्जिनिया वूल्फ हे साहित्यिक, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना ज्याच्यामुळे राजीनामा द्यावा लागला तो पत्रकार कार्ल ब्रेस्ताईन या दर्जाची मंडळी त्यात आहेत. तर सत्तेची नशा उलगडून सांगणारा चरित्रकार रॉबर्ट कारो लिखित लिंडन जॉनसनच्या चरित्राच्या एका खंडाचे परीक्षण बिल क्लिंटन यांनी केले आहे. हर्बर्ट हुव्हर आणि जॉन एफ. केनडी यांनीही यात पुस्तकांवर लिहिले आहे.

हेही वाचा >>> अन्यथा : जगी ज्यास कोणी नाही, त्यास..

कार्सन माक्युलार्स हिची, ‘द हार्ट इझ अ लोन्ली हंटर’ ही कादंबरी आली तेव्हा ती फक्त २२ वर्षांची होती. अमेरिकेच्या एका गावातल्या दोन मुक्या व बहिऱ्या व्यक्तींमधील मैत्रीची ही कथा आपल्याला गुंतवून ठेवते. गावात एकमेकांना धरून राहणारी माणसेही किती एकटी असतात ते कादंबरीत अनुभवता यते. सूक्ष्म मनोव्यापार मांडण्याच्या तिच्या कौशल्याची चुणूक पुढील संवादात दिसते. ‘‘भांडण्यासाठी शब्दांची गरज नसते, आता आपण शांतपणे शेजारी बसलो असतानादेखील मी तुमच्याशी नेहमी सारखाच वाद घालत असते.. तेव्हा आपण कुठल्याच प्रकारे न भांडण्याचा प्रयत्न करू.’’ एवढया लहान वयात या लेखिकेने या कादंबरीत एवढी उंची गाठली आहे, की तिला पुढे तिथवर जाता येणेही अवघड आहे, हे १९४० सालच्या परीक्षणात व्यक्त केलेले मत नंतर तिने खोटे ठरवले.

सर्वसामान्य वाचकाला लेखकाबद्दल कुतूहल असते हे ओळखून ‘टाइम्स’ने लेखक आणि त्याच्या घराबद्दल माहिती देणारे सदर १८९७ च्या अखेरीस सुरू केले. छायाचित्रांचा प्रसार अजून पुरेसा झाला नव्हता. लेखक दिसतो कसा याचेही कुतूहल असे. या प्रकारचे २२ लेख गोळा करून ‘अमेरिकन ऑथर्स अ‍ॅण्ड देअर होम्स’ असे पुस्तक काढले. त्यात मार्क ट्वेनच्या संबंधात लिहिले, ‘तो त्याचे बरेचसे लिहिण्याचे काम अंथरुणातून करतो.’ त्याने नवोदित लेखकांना सल्ला दिला आहे , ‘लिहिणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे. कधीतरी अंथरुणातून ते जमते का ते पाहा. मी जागा झालो की तोंडात पाइप ठेवतो. मांडीवर लाकडी बोर्ड घेतो आणि लिहितो. विचार करणे सर्वात सोपी गोष्ट आहे आणि त्यानुसार बोटे हलवण्यात काही फार कष्ट नाहीत.’’

शोधपत्रकारितेतून जन्माला आलेले ‘अ‍ॅण्ड द बॅण्ड प्लेड ऑन’ हे एड्सविषयीचे गाजलेले पुस्तक अमेरिकेने या भयावह साथीकडे कसे दुर्लक्ष केले, हे सांगते. याचा लेखक रँडी शिल्ट्स या गे पत्रकाराच्या मुलाखतीचा गोषवारा बुक रिव्ह्यू केवळ २०० शब्दांत यात दिला आहे. तो म्हणतो, ‘‘खरेतर कुठल्याही पत्रकाराने हे काम करायला हवे होते. मी केले कारण ज्यांच्याबद्दल मला आस्था व प्रेम होते त्यांच्यामध्ये एड्स पसरत होता आणि ते सारे मरण भोगत होते.’’ येथे कुठल्याही लेखनाच्या प्रेरणेचा मूलमंत्रच त्याने सांगितला आहे.

अनेक प्रकाशक पुढच्या ऋतूत कोणती पुस्तके येणार आहेत त्याच्या जाहिराती ‘न्यू यॉर्क टाइम्स बुक रिव्ह्यू’त देऊ लागले. ‘द पॉकेट क्लासिकल लायब्ररी’ने खिशात मावतील अशा आकारात अभिजात पुस्तकांच्या आवृत्त्या काढल्या. किप्लिंग, कार्लाइल, डिकन्स अशांची पुस्तके त्यात होती. ज्यात त्यांचे केवळ महत्त्वाचे लेखन समाविष्ट केले होते. याची जाहिरात मजेशीर आहे. डेटवर गेलेले असताना एका तरुणाला त्याची मैत्रीण विचारते,

‘‘तू काय वाचतोस?’’ ‘‘हल्ली वेळच मिळत नाही.’’ ‘‘पण तुला केवढे लेखक माहीत आहेत आणि त्यांच्याबद्दल तू किती सफाईने बोलतोस! तुझे वाचन चांगले आहे असे दिसते.’’ तो हसत म्हणतो, ‘‘मी वेळ फुकट घालवत नाही. द पॉकेट क्लासिकल लायब्ररीचा नामवंत लेखकांच्या लेखनाचा १२ पुस्तकांचा सेट माझ्याकडे आहे. नेमके आणि दर्जेदार साहित्य त्यात आहे.’’ मग ती तरुणी चीत्कारते, ‘‘तू मला त्याबद्दल सांग काहीतरी.’’

थोडक्यात, मैत्रिणीवर छाप पाडण्यासाठी ‘कार्लाइल वा डिकन्स यांचे निवडक लेखन असलेली आणि बाळगायला सोयीस्कर आकार असलेली आमची पुस्तके घ्या’ असे जाहिरात सांगते. त्यातून पुढे आपल्याला अपेक्षित असलेल्या लग्नाबद्दल यात काही म्हटलेले नाही. सुखी संसारासाठी कार्लाइल हे भांडवल होऊ शकत नाही, हे प्रकाशन संस्थेला माहीत असावे.

कोणत्याही विषयावरचे पुस्तक ‘टाइम्स’ला अस्पर्श नाही. रचेल कार्सन लिखित ‘सायलेंट स्प्रिंग’ या पर्यावरण जागृतीची सुरुवात करणाऱ्या पुस्तकापासून स्त्रीमुक्ती, समाजशास्त्र, वर्णभेद, राजकारण, आरोग्य, कादंबऱ्या अशा विविध विषयांवरच्या ग्रंथांचा समाचार यात घेतलेला आहे. सगळी पुस्तके समकालीन आहेत असेही नाही. ‘रिअसेसमेंट’ या सदरात डॉन क्विझोतला ४०० वर्षे होत असल्याच्या निमित्ताने त्याचा आढावा कार्लोस फुन्तीस या मेक्सिकन कादंबरीकाराने यात घेतला आहे. त्याच्या मते या कादंबरीची सगळी गंमत कट्टर श्रद्धेच्या युगात त्याने जी अनिश्चिततेची ओळख करून दिली त्यात होती. कादंबरीची सुरुवातच, ‘‘समव्हेर इन ला मांचा..’’ अशी आहे. यथे वाचक आपल्या मनातल्या आटपाट नगराची कल्पना करण्यास मोकळा आहे.  सजगतेने हे पुस्तक वाचल्यास ज्याला लेखनात सुधारणा करायची आहे, त्याला अशा काही टिप्स मिळू शकतात.

हे पुस्तक क्रमश: वाचावे असे नाही. कुठलेही पान उघडावे व काही काळ वाचत राहावे. असे करून मन भरले की अशा अनेक जुन्या ओळखीच्या वा अनोळखी आणि काही केवळ तुलनेनेच नव्या असलेल्या पुस्तकांच्या परीक्षणांचा आता काय उपयोग, असा प्रश्न मनात आला की मग प्रस्तावना वाचावी. पुस्तकांचा मागोवा घेताना आपल्या १२५ वर्षांच्या वाटचालीत ‘न्यू यॉर्क टाइम्स बुक रिव्ह्यू’ जे शिकले त्याचा आलेख पुस्तकाच्या प्रस्तावनेत वाचता येतो. शिकणे अवघड नसते पण वाटचाल चालू राहणे महत्त्वाचे. या दोन्ही गोष्टी वेगळया नाहीत.

या ग्रंथात लेखकांची उत्तम छायाचित्रे तर आहेतच पण न्यू यॉर्क पब्लिक लायब्ररीच्या जिन्यात, बाकावर, वळचणीला खांबाआड, शेजारच्या ब्रायन्ट पार्कमध्ये, कारच्या बॉनेटवर वा सबवे ट्रेनमध्ये अशा विविध ठिकाणी वाचत बसलेल्या वाचकांचीही छायाचित्रे यात आहेत. त्यातले सर्वात मोहक छायाचित्र संगणकयुगाच्या आधीच्या कुठल्या तरी एका प्रसन्न सकाळी न्यू यॉर्क पब्लिक लायब्ररीच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर बसलेल्या तरुणांचे आहे. त्यातला प्रत्येक जण वाचत बसलेला नाही, पण ते पाहताना ग्रंथालयाच्या सान्निध्यात असणेही किती आनंददायी असते याची जाणीव आपल्याला होते.

kravindrar@gmail.com

हेही वाचा

राष्ट्रकुल देशांतील (५६) सर्वोत्कृष्ट कथांना दरवर्षी मे आणि जून महिन्यांत चाळणी लावली जाते. आफ्रिका, आशिया, कॅनडा-युरोप, कॅरेबियन आणि पॅसिफिक या पाच विभागांचे एकेक स्वतंत्र विजेते आणि एक सर्व विभागांतून विजेता या काळात ठरतो. साताठ हजार कथालेखकांमधून त्यातील कथा निवडल्या जातात. यंदा आशिया विभागातील लघुयादीत तीन भारतीय लेखकांच्या कथांची वर्णी आहे. त्यातही मुंबईच्या लेखिकेच्या कथेचे शीर्षक ‘ऐश्वर्या राय’ असे आहे. तूर्त याविषयीची बातमी.

https://shorturl.at/suRS3

या ‘कॉमनवेल्थ’ स्पर्धेतील दरवर्षीच्या विविध विभागांतील विजेत्या कथा अधिकृतरीत्या ‘ग्रॅण्टा’ या ब्रिटिश मासिकाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जातात. गेल्या वर्षीच्या विजेत्यांच्या कथा इथे वाचता येतील.

https://shorturl.at/dgiJT

गेल्या आठवडयात सलमान रश्दी यांनी आपल्यावर झालेल्या चाकू हल्ल्याचा तपशील एका मुलाखतीत विस्ताराने मांडला. त्यांच्या नव्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे नाव ‘नाईफ’ आहे. त्याविषयी वाचा.

https://shorturl.at/tABDY