राजेश बोबडे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९६०च्या दशकात व्यक्त केलेले चिंतन आजही लागू पडते. महाराज म्हणतात, ‘भौतिक सामर्थ्यांनेही जगातील काही देशांत माणसे पुढे आली आहेत, हे खरे आहे, पण त्या देशांना विचारा, तुमच्यातील सर्व बुद्धिमान लोक देशाच्या दृष्टीने केवढी मदत करतात? येथे पाहावे तर बुद्धिमान समाज छिद्रे पाहण्यात, टीकेचे शस्त्र चालविण्यात आणि चालता गाडा रोखण्यातच गर्क आहेत, तरबेज आहेत! भारतीय एकात्मता वाढविण्यासाठी, भारताला अधिक प्रबल करण्यासाठी किती लोक झटतात? पाहावे तिकडे स्वार्थाचा हलकल्लोळ सुरू आहे. एकमेकांच्या डोक्यावर चढण्याचा प्रयत्न होत आहे. सत्तास्थानी येण्यासाठी जातीगटांची धडपड सुरू आहे. आपली प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी वाट्टेल ते केले जात आहे. शक्तीची नशा सर्वाच्या अंगात भरल्याने शासन तरी काय करणार? ते बिचारे यातूनच जन्मास आले आहे; तेव्हा त्याला या सर्व गोष्टीवर कशी मात करता येणार?’’
‘‘एका गरीबाच्या लग्नाची गोष्ट आहे. तो आपल्या जातीचा म्हणून त्याचे दिवाळे निघेल इतपत पाहुणे त्याच्या लग्नमंडपात गेले. प्रत्येकाजवळ खायला एक तोंड असले तरी काम करायला दोन हात आहेत; पण त्यांचा उपयोग कोण करणार? त्याला कोणाचेही काडीमात्र सहकार्य लाभले नाही. उलट चांगली सोय झाली नाही, म्हणून जो तो त्यालाच टोचू लागला. बिचारा घरमालक चिडला. त्याने मंडपच पेटवून दिला आणि म्हणू लागला- ‘अरेरे! मी सर्वाचीच फार छान व्यवस्था करणार होतो पण काय करू? आग लागल्याने निरुपाय झाला! सर्व साहित्य जळून गेले! आता लग्नानंतर मेजवानी देण्याचा प्रयत्न करू!’ तात्पर्य, जातीने त्याला फसविले आणि त्याने जातीला फसविले! असे न करता, सर्वानीच हातभार लावून सोयी करून घेतल्या असत्या, तर किती छान झाले असते!’’
‘‘आज आपल्या देशातदेखील हेच सुरू आहे. सरकारची शक्ती कमी पडते; ते सर्वासाठी सोय करू शकत नाही. पण त्यासाठी देशाला आग लावणे हा उपाय नव्हे. हा देश सरकारच्या बापाचा नाही, तर तो करोडो भारतीय जनतेचा आहे आणि ही लोकशाही कोणत्याही एका गटाच्या, पक्षाच्या वाटय़ाला आलेली मिरासदारी नव्हे, तर ती प्रत्येक नागरिकाच्या हक्काची आहे. त्यासाठी सर्वच गटांनी व पक्षांनी, जातींनी व धर्मानी हातभार लावून देशाचे वैभव जपले पाहिजे. बिघडलेले संबंध राष्ट्रीय भावनेने जुळवून गुण्यागोविंदाने नांदले पाहिजे.’’ हे सर्व करताना आपला पुढारी कसा असावा याबाबत महाराज ग्रामगीतेत म्हणतात-
तोचि करावा पुढारी।
एरव्ही पडो नये कुणाच्याही आहारी।
धन वेचतो म्हणोनि गावाधिकारी।
करु नये कोणासि।
।rajesh772@gmail.com
