सप्रेम नमस्कार, छत्रपती संभाजीनगरमधील वातींचा विक्रीव्यवसाय करणाऱ्या एका महिला बचत गटाकडून प्रेरणा घेत आम्ही राज्यातील तमाम राजकारण्यांसाठी ‘राजकीय वाती उत्पादक कंपनी’ स्थापन केली असून सध्याचे राजकीय वातावरण बघता वर्षभरात या कंपनीची उलाढाल एक कोटीवर नेण्याचा आमचा मानस आहे. वातींचा उपयोग केवळ देवाला प्रसन्न करण्यासाठी ही संकल्पना आता जुनी झाली असून, देवाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनाही ती फायद्याची ठरू शकते असे आमचे ठाम मत झाले आहे. ‘वात लावणे’ या प्रचलित राजकीय वाक्प्रचाराला केंद्रस्थानी ठेवून आम्ही वातींचे वेगवेगळे प्रकार विकसित केले आहेत.

यातली पहिली असेल ‘भाषावात’. ही तेलात बुडवून दिव्यात टाकून पेटवली की त्याच्या ज्योतीतून मराठीतील बाराखडीचे शब्द तडतड फुटत बाहेर पडायला लागतील. यामुळे जनक्षोभ उफाळून येण्यास मदत होईल व आंदोलकांना प्रभावी ठरेल असा ‘वातमोर्चा’ रात्री काढता येईल. हे शब्द देवनागरी लिपीवर आधारलेले असल्याने हिंदीभाषकांनासुद्धा या वातीचा उपयोग करता येईल. दुसरी ‘अस्मिता वात’. ही पेटवताच ‘जय भवानी’ सारखे प्रेरणादायी शब्द ज्वाळांमधून दिसायला लागतील. औरंगजेब, बाबर, अफजलखान यांच्यासारख्या ‘क्रूर’ मुघलशासकांचे पुतळे जाळण्यासाठी टेंभ्याऐवजी या वातीचा वापर करता येईल. ही वात आकाराने मोठी असेल.

खास महाराष्ट्रासाठी तयार केलेली ‘स्वाभिमान वात’ हे कंपनीचे विशेष आकर्षण असेल. ती पेटवून घराबाहेर पडलेल्या आशीष शेलारांनी ‘इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धवजींना मागच्या रांगेत बसवणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे’ असे पक्षीय भेद विसरायला लावणारे वक्तव्य केले. यावरून या वातीचा प्रभाव तुमच्या लक्षात आला असेलच. याशिवाय ‘खोके किंवा रोकड वात’ आम्ही विकसित करत आहोत. ती पेटवली की सुरत असो वा गुवाहाटी, कुठेही खोके विनासायास पोहचतील. एकदा का या वातीने ओवाळणी केली की यंत्रणांची वाकडी नजर खोक्यावर पडणार नाही. रोकड असलेली बॅग उघडायच्या आधी ही वात पेटवली तर त्याचा प्रकाश इतका दिपवणारा असेल की कोणत्याही छुप्या कॅमेऱ्यात बॅगचे चित्रीकरण होऊ शकणार नाही. विकसित होण्याआधीच या वातीची नोंदणी अनेक नेत्यांनी केल्याने वर्षभरानंतरच ती सर्वसामान्यांसाठी बाजारात उपलब्ध होईल याची नोंद घ्यावी.

महाभारतातील कौरव व पांडवांमध्ये रंगलेल्या द्याुतखेळाचा प्रचंड अभ्यास करून ‘जुगार वाती’ची निर्मिती आम्ही केली आहे. ही वात एका कुपीत ठेवायची असून जेव्हा जेव्हा रमी खेळायची उबळ येईल तेव्हा कुपी उघडून ती पेटवायची. याच्या ज्योतीचा झोत केवळ पत्त्यावर पडेल. खेळणाऱ्याव्यतिरिक्त इतरांना अंधारच दिसेल, त्यामुळे चित्रीकरण करणे कठीण जाईल. तद्वतच मारझोड करण्यासाठी राजकीय नेत्यांना अखंड ऊर्जा देत राहील, अशी ‘धटिंगण वात’ आम्ही तयार केली आहे. या नेत्यांच्या हाताच्या मुठी जेव्हा जेव्हा वळवळतील तेव्हा तेव्हा त्यांनी ‘ताडनकृती’ करण्याआधी ही वात पेटवायची. त्याकडे एक मिनिट टक लावून बघायचे व नंतरच मारण्यासाठी बाहेर पडायचे. यामुळे नेत्यांना केलेल्या कृतीचा कधीही पश्चात्ताप होणार नाही. या वातीची विक्रमी मागणी नोंदवण्यात आली आहे.

वातींच्या या विविध प्रकारांमुळे आता कुणावरही मेणबत्ती मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही. रात्रीच्या मोर्चासाठी मागणीनुसार वेगवेगळ्या वाती तयार करून देण्याची आमची तयारी आहे. आमची कंपनी नव्या युगाची असून ‘ज्योत से ज्योत जलाते चलो, द्वेष की गंगा बहाते चलो’ ही आमची टॅगलाइन आहे. सर्वांनी या ‘स्टार्टअप’ उत्पादन कंपनीचा लाभ घ्यावा ही विनंती.