ज. वि. पवार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिल्पांकित केलेल्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्या आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीतील सुवर्णकाळ म्हणजे ‘दलित पँथर’ या लढाऊ चळवळीने दिलेल्या लढ्याचा काळ. हा लढा अल्पकाळ होता. प्रवास किती दूरवरचा केला यापेक्षा तो कोणत्या दिशेने केला, हे जसे महत्त्वाचे असते तद्वतच लढा किती काळ दिला यापेक्षा तो कोणत्या उद्देशाने दिला हे महत्त्वाचे असते. दलित पँथरने नि:स्वार्थपणे लढा दिला आणि त्यामुळे तो यशस्वी ठरला.

२९ मे १९७२ रोजी कवी मित्र नामदेव ढसाळ व मी म्हणजेच ज. वि. पवार यांनी मुंबईच्या रस्त्यावर ही चळवळ सुरू केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी पुकारल्यामुळे सर्व प्रकारचे लढे थंडावले होते. म्हणजे दलित पँथरचा खरा लढाऊ कालखंड अल्प असला, तरीही या लढ्याने भारतीय समाजव्यवस्थेवर आपला ठसा उमटविला. हा लढा एवढा सर्वगामी आणि सर्वस्पर्शी ठरला, की त्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात त्याचा जगभर मागोवा घेतला जात आहे. दलित पँथर ही एक चळवळ होती. ती खळाळत्या आणि प्रवाही पाण्यासारखी होती. संघटनात्मक नियम- पोटनियमांत बंदिस्त होणारी नव्हती.

खरे तर १९६० चे दशक हे अस्वस्थतेचे दशक होते. जगभर व्यवस्थेविरुद्ध उद्रेक झाला होता. अमेरिकेत वंशवादाने परिसीमा गाठली होती. काळा-गोरा वाद अमानुष होता. माणसांची खरेदी-विक्री होत होती. गुलाम हा परवलीचा शब्द झाला होता. अमेरिकेत अन्याय अत्याचारांना उधाण आले होते. भारतात वाढते अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने खासदार एलिया पेरुमल यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यासगट स्थापन केला. देशभरातील दलितांवरील अन्यायांची यादी करणे आणि त्यावर उपाय सुचविणे हा या अभ्यासगटाचा उद्देश होता. १९६५ साली स्थापन झालेल्या या पेरुमल समितीने ३० जानेवारी १९७० रोजी आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला. तो सरकारच्या डोळ्यांत अंजन घालणारा ठरला. तो संसदेच्या पटलावर ठेवण्याचे धैर्य केंद्र सरकारकडे नव्हते. जागरूक संसद सदस्यांच्या आग्रहामुळे तो १० एप्रिल १९७० रोजी संसदेत मांडला. या अहवालातून उघड झालेले क्रौर्य पाहून पुरोगामी पत्रकारांनी त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली. वर्तमानपत्रांनी आग ओकल्यामुळे दलित तरुणांमध्ये आगडोंब उसळला. त्यांच्या मुठी आवळू लागल्या.

या दरम्यान ‘दलित युवक आघाडी’ या नावाने मुंबईतील वडाळा येथील सिद्धार्थ विहार परिसरातील वसतिगृहातील विद्यार्थी एकवटले. अर्ज-विनंत्या, पत्रके, पत्रकार परिषदा इत्यादी माध्यमांतून ते निषेध नोंदवीत होते. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक ‘मराठा लॉबी’मुळे हतबल झाले होते. ते वाढता अन्याय रोखू शकत नव्हते. त्यातच १४ मे १९७२ रोजी परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगावच्या दोन महिलांची गावभर नग्न धिंड काढण्यात आली. गावच्या विहिरीवर या दोन महिलांची सावली पडली, हा त्यांचा गुन्हा होता. वर्तमानपत्रातील या बातमीने स्फोटकांच्या कोठारात ठिणगी पडली. दलित युवक आघाडीच्या बैठकीत ब्राह्मणगावात जाऊन त्या महिलांना साडी-चोळी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मी व नामदेव ढसाळ यांनी विरोध दर्शवत सभात्याग केला.

दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ मे १९७२ रोजी भल्या पहाटे नामदेव माझ्या घरी आला. तो अंतर्बाह्य पेटलेला होता. आता करायचे काय हा विचार करता करता अमेरिकेतल्या ‘ब्लॅक पँथर’सारखी उग्र चळवळ उभारण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत १५ ऑक्टोबर १९६६ रोजी कॅलिफोर्निया येथील ऑकलंड शहरात बॉबी सील व एच. पी. न्यूटन यांनी ब्लॅक पँथर ही चळवळ सुरू केली होती. त्याच धर्तीवर २९ मे १९७२ रोजी मुंबईत ‘दलित पँथर’ ही चळवळ उभारली. या चळवळीचे विस्तारीकरण राजा ढाले यांच्या ‘साधना’तील लेखामुळे झाले.

एखादी चळवळ यशस्वी झाली की तिचे पितृत्व स्वीकारण्यास अनेक लोक पुढे सरसावतात. अपयशाचे धनी होण्यास कोणीही तयार नसते. कोणतीही चळवळ असो तिचा परिणाम कालांतराने जाणवतो. दलित पँथरचा परिणाम नंतरच जाणवू लागला. तिने आपले ईप्सित साध्य केले. ज्या समकालीन तरुणांनी नाके मुरडली वा दलित पँथरशी फारकत घेतली ते तरुण आता उतारवयात स्वत:ला ‘पँथर’, ‘ज्येष्ठ पँथर’, ‘पँथर नेते’ एवढेच नव्हे तर ‘पँथरचे संस्थापक’ म्हणवून घेत आहेत. याचे कारण ५० वर्षांनंतर दलित पँथरचे जगभर कौतुक होत आहे. या कौतुकाचे आपणही धनी व्हावे यासाठी हा सगळा आटापिटा आहे. दलित पँथरच्या चळवळीत आपलाही सहभाग होता हे भासविताना, दलित पँथर कोणी आणि कधी स्थापन केली, तिचा पहिला मेळावा कधी झाला याला आपण महत्त्व देत नसल्याचे सांगत आहेत. त्यांना माहीत आहे की, दलित पँथरच्या स्थापना प्रक्रियेत आपण नव्हतो, पहिल्या मेळाव्यालाही हजर नव्हतो. त्याचे श्रेय आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून या श्रेयाचे हक्कदार असलेल्या ढसाळ- पवारांनाही श्रेय मिळू नये, असा खटाटोप केला जात आहे. त्यासाठीचे बैठकीचे खोटे इतिवृत्त माझ्या दप्तरी आहे.

नंतरच्या काळात ढाले-ढसाळ विसंवाद झाल्यावर आणि मी ढसाळांच्या विरोधात गेल्यानंतरही ढसाळ यांनी जे लेखन केले वा मुलाखती दिल्या त्यात त्यांनी दलित पँथरची स्थापना ढसाळ-पवार यांनीच केली हे मान्य केले आहे. दलित पँथरचा अधिकृत इतिहास मी ६ डिसेंबर २०१० रोजी प्रथम मराठीत प्रसिद्ध केला, तोच इतिहास ढसाळ यांच्या नावे १५ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रकाशित झालेल्या ‘दलित पँथर – एक संघर्ष’ या ग्रंथात जसाच्या तसा प्रसिद्ध करण्यात आला. म्हणजे ढसाळांच्या ग्रंथाचे संपादक, प्रकाशक आणि प्रस्तावनाकार माझ्या लेखनाला दुजोरा देतात, तेच लोक दलित पँथर कोणी व कधी स्थापन केली, तिचा पहिला मेळावा कधी झाला याबद्दल संभ्रम निर्माण करतात. ते लोक स्वत:शी आणि इतिहासाशी प्रतारणा करत नाहीत का?
व्यवस्था बदलण्यासाठी दलित पँथरने काही मूलगामी लढे दिले, उदाहरणार्थ शिवाजी पार्क मैदानावर करण्यात आलेले गीता दहन. अशा कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता का? मुळीच नाही. दलित पँथरच्या प्रमुखांवर शेकडो खटले लादण्यात आले, त्यांनी अनेकदा कारावास भोगला, अनेक अत्याचारग्रस्त गावांना भेटी दिल्या, या सर्व प्रवासात त्यांचा सहभाग नव्हता अन् तरीही हे स्वत:ला नेते म्हणवितात. हा वस्तुस्थितीचा विपर्यास नाही का? दलित पँथरमध्ये काम करणारे, चळवळीसाठी त्याग करणारे कार्यकर्ते आजही हयात आहेत. त्यांना सत्य माहीत आहे.

भारतीय संविधानाची काटेकोर अंमलबजावणी करणे हे दलित पँथरचे ईप्सित होते. राज्यकर्त्यांनी ही अंमलबजावणी केली असती तर तरुणांना त्यांच्या तारुण्याची होळी करावी लागली नसती. संविधानाने जाती प्रथेचे उच्चाटन केले, परंतु खेड्यात जाती प्रथा थैमान घालत होती. दलित स्त्रिया तर नरपशूंच्या खाद्य ठरत होत्या. खेड्यांत दोन सत्ताकेंद्रे शक्तिमान ठरली होती. एक सत्ता केंद्र होते परंपरागत पाटीलकीचे तर दुसरे होते सरपंचांचे. ही दोन्ही सत्ता केंद्रे एकवटली होती- बहुसंख्याक मराठा जातीकडे. हा मराठा समाज काँग्रेसधार्जिणा होता आणि काँग्रेस पक्षच सत्ताधारी होता. त्यामुळे अन्याय करणारे आणि कायद्याचे संरक्षण करणारे तेच होते. त्यामुळे त्यांच्याकडून न्याय मिळणे अशक्यप्राय होते. दलितांचे संरक्षण करणे ज्या रिपब्लिकन नेत्यांचे काम होते त्यांनीच आपला स्वाभिमान काँग्रेसच्या पेढीवर गहाण ठेवला होता. यामुळे दलित पँथर एखाद्या गावात टोळधाडीसारखी जायची, अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवून द्यायची तेव्हा तिची सगळ्यात मोठी मिळकत होती ती अत्याचारग्रस्तांच्या मनात निर्माण होणारा ‘आपल्यासाठी कोणीतरी लढत आहे,’ हा विश्वास. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हा विश्वास दिला तो दलित पँथरने. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाग घेण्याचे आणि आंबेडकर जयंती साजरी करण्याचे धैर्य त्यांना मिळू लागले.

ज्या दोन लढवय्या चळवळींचा आजही जगभर मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जात आहे. या दोन चळवळी म्हणजे अमेरिकेतील ब्लॅक पँथर आणि भारतातील दलित पँथर. हे मी माझ्या अनुभवांवरून सांगत आहे. ब्लॅक पँथर आणि दलित पँथर या लढ्यांचे विश्लेषण करणारे अनेक कार्यक्रम मी कोविड टाळेबंदीच्या काळात केले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ, बोस्टन, लंडन आणि जर्मनीत झालेले माझे कार्यक्रम याची साक्ष आहेत. आज ५० वर्षांनंतर मी मागे वळून पाहातो, तेव्हा दलित पँथरच्या दणक्यामुळे दलितांच्या जीवनाचा कायापालट झाल्याचे दिसते. ही चळवळ कार्यरत नसती तर दलित साहित्य अल्पावधीत ‘ग्लोबल’ झाले नसते. बाबासाहेबांच्या विचारांवर अधिष्ठित राहून लढे पुकारण्यात आले नसते.

दलित मंडळी उच्चविद्याविभूषित होऊन उच्चाधिकारी झाली. यामुळे काही प्रमाणात जाती प्रथा नष्ट होऊ शकली. दलित पँथरने जे आंदोलन छेडले, मोर्चे काढले, त्यामुळे आरक्षणातील ‘बॅकलॉग’ भरला गेला. १९७२ आधी हा ‘बॅकलॉग’ चतुर्थश्रेणीपर्यंतच सीमित होता. सरकारी वा निमसरकारी आस्थापनांत उच्चश्रेणीत भरती केली जात नव्हती. महाराष्ट्राचे पोलीस खाते याला साक्ष आहे. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे होते. दलित पँथरने प्रत्येक श्रेणीतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गात उच्चस्तरीय पदांतील बॅकलॉग भरला नसल्याचा ‘डेटा’ सादर केला. त्यानंतर सर्व श्रेणींत जलदगतीने भरती झाली. मंडल आयोगाची अंमलबजावणी करून इतर मागासवर्गीयांनाही दलित पँथरनेच राजकीय भान दिले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी प्रखर लढा दिला, तोही दलित पँथरनेच, ओबीसी नेतृत्वाने नव्हे!

राजकारणातील प्रगल्भता असो वा समाजवैज्ञानिकता असो, हे सारे शक्य झाले, ते दलित पँथरच्या अहिंसक दबावामुळे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हजारो वर्षांच्या स्थितीत बदल घडवायचा होता. आज हे स्थित्यंतर झालेले दिसत आहे. दलित पँथरच्या लढ्यामुळे लाभार्थी ठरलेले लोक आज मान्य करोत वा न करोत त्यांच्या परिस्थितीतही स्थित्यंतर घडले आहे, ही वस्तुस्थिती आहे.
javipawar@gmail.com

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dalit panthers struggle to change the system dr babasaheb ambedkar constitution of india amy