रशियाशी शीतयुद्ध अमेरिकेने धकवून नेले; पण आज चिनी लष्करी ताकदीमागे प्रचंड आर्थिक बळही आहे आणि अनेक देशांची साथ अमेरिकेऐवजी चीनला मिळते आहे…

दुसरे महायुद्ध संपल्यास ८० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने विजयी सत्तांनी म्हणजेच अमेरिका, रशिया आणि युरोपीय देशांनी स्मरणोत्सव साजरा केला, ते स्वाभाविकच. त्या उत्सवाची दखलही बाह्य जगताने घेतली नाही. त्या महायुद्धात चीनची भूमिका शोषिताचीच. पण नागासाकीपश्चात पराभूत जपानची पकड चीनवरही ढिली झाली आणि अखेरीस तो देश जपानी जोखडातून मुक्त झाला, त्याबद्दल चीनने स्मरणोत्सव साजरा करण्याचे कारण काय? असा प्रश्न अर्थातच चिनी राज्यकर्त्यांना पडला नाही. त्यामुळे युद्धसमाप्तीस आणि चीनच्या बाबतीत जपानी अंमल संपल्याबद्दल सर्वाधिक मोठे शक्तिप्रदर्शन या देशाने करून दाखवले. ते इतके भव्य आणि जंगी होते, की त्याची चर्चा पाश्चिमात्य माध्यमांमध्ये अजूनही सुरू आहे. ती संपण्याची चिन्हे नाहीत. ज्या कम्युनिस्ट पक्षाने या शक्तिप्रदर्शनाचा घाट घातला, त्यांचा जपानी शोषकांविरुद्धच्या लढ्यातील सहभाग नगण्य होता. युद्धामुळे कमकुवत झालेल्या जपान्यांविरुद्ध चीनमध्ये प्रखर लढा दिला, तो चिनी राष्ट्रवादी फौजांनी. पुढे चार वर्षांनी याच राष्ट्रवाद्यांना कम्युनिस्टांनी पराभूत केले आणि चीनवर पकड मिळवली, ती आजतागायत. तेव्हा युद्ध संपल्याबद्दल विजयोत्सव साजरा करताना जपानच्या पराभवाचे श्रेय चीनमधील कम्युनिस्ट शासकांनी घेणे तसे चमत्कारिकच. त्यांनी तसे केले, कारण त्यांना प्रस्तुत संचलनाच्या माध्यमातून चीनच्या राक्षसी लष्करी सामर्थ्याचे दर्शन जगाला घडवण्याचे निमित्त हवे होते. या संचलनाची दखल जगातली एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही घ्यावी लागली इतके ते भव्य आणि वैविध्यपूर्ण होते. चीनच्या लष्करी ताकदीविषयी जगाला कल्पना गेली कित्येक वर्षे होतीच. उत्पादक उद्योगांतून आर्थिक ताकद वाढवत असताना, या देशाने कटाक्षाने देशांतर्गत शस्त्रास्त्र निर्मितीवर भर दिला. त्यामुळेच निव्वळ आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आणि रणगाडेच नव्हे, तर ड्रोन, लेझर आणि अंतराळ या नव्या आघाड्यांवर हा देश अमेरिकेसकट सर्वच देशांच्या पुढे सरकल्याचे आढळून आले. हे सामर्थ्य सादर करण्याची संधी जिनपिंग यांना देण्याचे श्रेय मात्र सर्वस्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे! व्यापारात युद्धखोरी आणि युद्धात व्यापार यांची सरमिसळ करण्याची हास्यास्पद आणि तितकीच हानीकारक ट्रम्पनीती आधीच्या कोणत्याही अमेरिकी अध्यक्षाने दाखवलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात युद्धखोर तरी बरीचशी जबाबदार आणि लोकशाहीवादी, पण सर्वार्थाने समृद्ध असलेल्या अमेरिकेसारख्या महासत्तेची जागा रिती होऊ लागलेली दिसते. तो अवकाश भरून काढण्याची चतुराई आणि महत्त्वाकांक्षा चीनचे विद्यामान नेतृत्व दाखवत आहे. शत्रू म्हणवणाऱ्यांशी दोस्ताना आणि मित्र मानलेल्यांशी दुश्मनी या विद्यामान अमेरिकी चक्रव्यूहात, एके काळी बेभरवशाचा ठरवला गेलेल्या चीनचे अजस्रा सामर्थ्य आणि धोरणात्मक शाश्वतता बहुतांना अधिक जवळची आणि आश्वासक वाटू लागली आहे. त्यासाठी पुराव्यादाखल दोन घटनांची दखल आवश्यक.

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन या संघटनेची नुकतीच चीनमधील तियानजिन येथे पार पडलेली शिखर परिषद त्या देशाचे नेते क्षी जिनपिंग यांच्यासाठी राजनयिक ‘मास्टरस्ट्रोक’ ठरली. त्या परिषदेत जिनपिंग यांच्या बरोबरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन या तिघांची एकत्रित हास्यविनोदमग्न छबी ट्रम्प यांचा पुरेसा जळफळाट करणारी ठरली. ट्रम्प यांचे समर्थक आणि विरोधक अशा दोहोंनीही कपाळावर हात मारून घेतला नि ‘भारताला दुखावल्याचे परिणाम आता भोगा’ अशा स्वरूपाची टिप्पणी केली. ज्या भारताला चीनच्या विरोधात उभे करण्यासाठी अमेरिकेच्या प्रशासनांनी २५ वर्षे प्रयत्न केले, तो भारत ट्रम्प यांच्या धोरणांमुळे दुरावला, दुखावला नि ‘कट्टर शत्रू’ चीनला जाऊन मिळाला, असा सर्वसाधारण सूर. वास्तव यापेक्षा वेगळे असणार याची भारताला कल्पना आहेच. पण चीन, रशिया आणि भारत या त्रिकुटाकडे अमेरिकेचे मित्रदेशही ओढले गेले, तर जे नुकसान सोसावे लागेल ते पाहण्यासाठी ट्रम्प सत्तेवरही नसतील, ही भीती अगदीच अनाठायी नाही.

दुसरी घटना म्हणजे अर्थातच बीजिंगमध्ये तिआनान्मेन चौकात झालेले लष्करी संचलन. कधी काळी याच चौकात लोकशाहीवाद्यांचे आंदोलन निर्दयरीत्या चिरडून टाकण्यात आले होते. त्या चौकात परवाही रणगाडे फिरले. पण आंदोलकांना चिरडण्यासाठी नव्हे, तर संहारक शस्त्रप्रदर्शनाआधी निव्वळ एक नांदी म्हणून. चीनकडे जगातील सर्वांत मोठे खडे सैन्य आहे. आता त्यात अतिसंहारक शस्त्रास्त्रांची भर पडली आहे.

ही अस्त्रे भारतासाठी नाहीत, युरोपसाठी नाहीत. ती बनवली गेली अमेरिकेविरुद्ध डागण्यासाठी. प्राधान्याने बचाव पण वेळ आल्यास त्या देशावर प्रतिआक्रमण करण्यासाठी. ‘डाँगफेंग – ६१’ हे क्षेपणास्त्र अनेक स्फोटके एकाच वेळी वाहून नेऊ शकते. ‘डाँगफेंग – ५ सी’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या टप्प्यात अमेरिकेतील सर्व प्रमुख शहरे येतात. ‘गुआम किलर’ म्हणून ओळखले गेलेले ‘डाँगफेंग – २६ डी’ हे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र खास प्रशांत महासागरातील गुआम देशस्थित अमेरिकेच्या हवाई तळाला डोळ्यासमोर ठेवून बनवले गेले. ‘वायजे – १७’, ‘वायजे – १९’ ही हायपरसॉनिक अर्थात अतिस्वनातीत युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या बलाढ्य विमानवाहू युद्धनौकांना लक्ष्य करण्यासाठी सज्ज आहेत. अमेरिकेचे आरमार जगात सर्वांत बलाढ्य मानले जाते. या आरमाराच्या आशिया-प्रशांत टापूतील आणि विशेषत: तैवानच्या समुद्रातील हालचाली चीनसाठी आजवर प्रतिरोधक ठरत होत्या. हे चित्र झपाट्याने बदलू लागले आहे. नजीकच्या भविष्यात तैवानवर कारवाई करण्याची वेळ येईल, तेव्हा अमेरिकेशी थेट संघर्ष उडण्याची शक्यता दाट. त्यावेळी अत्यंत बलाढ्य चीनशी टक्कर घेण्यासाठी अमेरिकेस दहादा विचार करावा लागेल. तसे विचारी नेतृत्व त्या देशात अस्तित्वात नसल्यामुळे तर युद्धभडक्याची शक्यता अधिकच वाढते. याशिवाय विरोधी लढाऊ ड्रोन, तसेच लढाऊ विमानांचा वेध घेणारी लेझर यंत्रणा सादर केली गेली. अत्याधुनिक पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांच्या निर्मितीत चीनने अमेरिका आणि रशियावर आघाडी घेतली आहे. ड्रोन्सच्या निर्मितीत वैविध्य आणले आहे. पाण्याखाली संचार करतील असे महाकाय ड्रोन किंवा लढाऊ विमानांचे मदतनीस ठरतील असे ड्रोन बनवून विलक्षण कल्पकता आणि लवचीकताही चीनने दाखवली आहे.

महासत्तांच्या या ताज्या शस्त्रस्पर्धेस शीतयुद्धकालीन इतिहासाची उपमा दिली जाते. ती तथ्याधारित खचितच नाही. सोव्हिएत रशिया अण्वस्त्रनिर्मिती, क्षेपणास्त्रसज्जता किंवा अंतराळ स्पर्धेत अमेरिकेस तोडीस तोड ठरत होता हे खरे. पण या दोन देशांच्या आर्थिक क्षमतेची तुलनाच होऊ शकत नव्हती. संसाधनसमृद्ध असूनही सोव्हिएत अर्थव्यवस्था अमेरिकेच्या तुलनेत मागास होती. त्या देशातील मोटारी, संगणक, उपकरणांची निर्मिती अमेरिकेच्या आसपासही नव्हती. तसे आजच्या चीनबाबत म्हणता येत नाही. उत्पादन क्षमता आणि वेगाच्या बाबतीत या देशाने अमेरिकेस केव्हाच मागे सोडले आहे. व्यापारयुद्धात डरकाळ्या फोडणाऱ्या ट्रम्प यांना ‘म्यांव’ करायला लावण्याची हिंमत एकट्या चीनने दाखवली. मोबाइल फोनपासून संवाहकांपर्यंत आणि विद्याुत वाहनांपासून हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांपर्यंत हा देश काहीही आणि कितीही वेगात बनवू शकतो. तेव्हा गतशतकातील रशियापेक्षा या शतकातील चीन हा अमेरिकेसाठी अधिक प्रभावी आणि धोकादायक प्रतिस्पर्धी ठरतो. आणखी विरोधाभास म्हणजे, आज अनेक आंतरराष्ट्रीय संकेत आणि कायदे (उदा. वातावरणीय बदल) पाळण्याची हमी आणि प्रामाणिकता चीन दाखवतो. ट्रम्पशासित अमेरिकेने त्याही बाबतीत ताळतंत्र सोडलेले दिसते.

सबब पर्यायी सत्ताकेंद्रच नव्हे, तर आशादायी आणि दिशादर्शक म्हणूनही या देशाकडे अमेरिकेपेक्षा अधिक आस्थेने पाहिले जाऊ लागले आहे. तिआनान्मेन चौकातल्या ड्रॅगन ड्रिलचे डिंडिम इतक्या तीव्रतेने वाजले, त्यास ही पार्श्वभूमी आहे. आपली आंतरराष्ट्रीय व्यापारातील सर्वाधिक तूट ज्या देशाबरोबर आहे त्या चीनचे हे शक्तिशाली वास्तव आपण लक्षात घ्यावे असे.