यंदा ही निमंत्रणे दोन शाखांतून आली. दोन दोन ठिकाणी विचारांचे सोनेच सोने. ते डोक्यात कसे मावणार?

दसरा झाला. विजयादशमी सरली. आठवडय़ात मधल्या दिवशीच आलेली सुट्टी संपली. पुढचा दिवस उजाडला. मोरूचा बाप कार्यालयास जाण्यासाठी हंथरुणातून उठला. स्नानादी कर्तव्ये आटोपून उभ्या उभ्या पूजा करताना मोरूच्या बापाने शेजारील भिंतीवर लटकवलेल्या पंचांगावर नजर टाकली. आज पापांकुशा एकादशी. यंदा विजयादशमीच्या दिवशी मध्यान्हीच एकादशी लागली हे त्यास कळाले. तो चुकचुकला. म्हणजे काल दसऱ्यादिनी सायंकाळी आपण शिलंगणास गेलो ती दशमी नव्हती; तर एकादशी होती या विचाराने त्यास वाईट वाटले. अरेरे! याचा अर्थ विजयादशमीचे मेळावे प्रत्यक्षात एकादशीलाच झाले हे लक्षात येऊन त्यास दु:ख झाले. पलीकडच्या खोलीत पसरलेल्या मोरूस त्याचे काय, असा विचार मनी येऊन बाप अधिकच खंतावला. अलीकडच्या पिढीस पंचांगाचे महत्त्वच नाही. ते आपल्या जवळपास सहा फुटी पोरास सांगण्याचा प्रयत्न त्याने एकदा केला असता ‘तुमच्या पंचांगात थट्टीफस्टला काय म्हणतात’ असे त्या आर्यपुत्राने तांबरलेल्या डोळय़ाने विचारले होते. तेव्हापासून मोरूच्या बापाने पंचांग आणि तिथी आपल्यापुरतेच राखायचे ठरवले. त्यांस स्मरले, पूर्वी विजयादशमीदिनी आपण आणि तीर्थरूप प्रात:काली उठोन दरवाजास झेंडूंच्या फुलांचे तोरण करत असू. आपल्या चिरंजीवांबाबत त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न वाया गेला. मोरू पसरलेलाच राहिला. त्यांस जागवण्याचा प्रयत्न केला असता त्याची मातोश्री मधे आली आणि बापास रागे भरत म्हणाली, झोपू द्या त्यांस. दांडिया नाइटवरून उशिरा आला तो. दमला असेल.

मोरूचा बाप मागे सरला. अलीकडे दहीहंडी, गणपती मिरवणुका आणि नवरात्री हे राष्ट्रीय सण झाल्याचे त्यास स्मरले. दहीहंडीत ढोपरे फोडून घरी आलेल्या मोरूने आपणास यासाठी साहसी खेळाची शिष्यवृत्ती ‘भेटणार’ असल्याचे शुभ वर्तमान यंदा दिले होते. त्यावर; ‘‘शिष्यवृत्ती मिळते आणि शिष्या भेटते’’ असा विनोद केल्याचे आणि कोणालाही तो न कळल्याचे मोरूच्या बापास आठवले. केवळ पंचांगच नव्हे, आपल्या कुलदीपकाची मातृभाषाही बदलल्याचे आणि आपण या बदलास रोखण्यात अपयशी ठरल्याचे लक्षात येऊन मोरूचा बाप खजील झाला. तथापि झटक्यात त्याने हे खजीलपण झटकले आणि उत्साह बाणवून कार्यालयास निघता झाला. त्याआधी मोरूच्या बिछान्याशेजारी पसरलेली खोकीच खोकी पाहून त्याच्या छातीत धडधडले. ही काय, कशाकशाची खरेदी असा प्रश्न त्यांस पडून यामुळे कितीचा फटका बसणार या प्रश्नाच्या चिंतेची आकडेमोड त्याच्या डोक्यात सुरू झाली. ते पाहिल्यावर आपल्या पतीच्या मनात काय आहे याचा अचूक अंदाज मोरूच्या मातोश्रीस आला. मोरूच्या बापाने काही विचारायच्या आत ती उद्गारती झाली : ‘‘मोरूने काहीही खरेदी केलेली नाही. काल दसरा. नाक्यावरच्या शाखेवरून निमंत्रण आल्याने प्रथेप्रमाणे तो विचारांचे सोने लुटण्यास गेला. यंदा ही निमंत्रणे दोन शाखांतून आली. दोन दोन ठिकाणी विचारांचे सोनेच सोने. ते डोक्यात कसे मावणार? म्हणून ही खोकी. ती वाहून आणल्याने दमून झोपला आहे तो.’’

हे ऐकून मोरूच्या बापास आपल्या चिरंजीवांची कणव आली. आपल्या लहानपणी कसे बरे होते. विचारांचे सोने वगैरे काही भानगडच नव्हती. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत नागपुराची बातमी आली की सायंकाळी ‘रामदास सायं’ शाखेतले शिक्षक हे विचारबिचार काय ते सांगत. तेव्हा शाखा म्हटले की एकच. आता तसे नाही. त्या जुन्या शाखा. नाक्यावरच्या शाखा. त्या शाखावाल्यांत फूट पडून तयार झालेल्या नव्या संघटनेच्या शाखा. कोपऱ्यात ‘मनसे’ शाखा. मनसे शाखांतली हालचाल मनातल्या मनातच दिसे, हे खरे. पण तरी नावाला आहेतच ना शाखा. मोरूच्या बापास वाटून गेले काय काय सहन करायचे या पिढीने? ऐकायचे तरी कोणाकोणाचे? एक राष्ट्रीय हिंदूहृदयसम्राट. दुसरा उपराष्ट्रीय हिंदूहृदयसम्राट. तिसरा मराठी हिंदूहृदयसम्राट. चौथा मालवणी हिंदूहृदयसम्राट. पाचवा.. आणखी कोणी. सहावा..! केवळ विचारानेच मोरूचा बाप गांगरला. परत हे सगळे काल शिलंगणास का काय ते गेले असणार आणि नंतर यातल्या प्रत्येकाने नाही तरी काहींनी तरी विचारांचे सोने लुटले असणार! म्हणजे सोनेच सोने आणि विचारच विचार!! कठीण आहे या पिढीचे असे वाटून त्याच्या मनात कणव दाटून आली. आता अधिक विचार करीत बसलो तर काळजीच वाटेल आपणास आपल्या मोरूची असे त्यांस लक्षात आले अन् तो झटकन कार्यालयास जाण्यास निघाला.

इमारतीबाहेर पडणार तर काय? समोर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी. हे नेहमीचेच असे त्यांस वाटले. पण ते तसे नव्हते. मोरूच्या बापाने धाडस करून तेथील पोलीस कर्मचाऱ्यास विचारले, हे काय? तर तो म्हणाला.. रस्ते तुंबले आहेत. काल सायंकाळी विचारांची इतकी अतिवृष्टी झाली की त्यांचा निचराच होईना. गेल्या १०० वर्षांत अशी विचारवृष्टी झालेली नाही. आपले नाले आधीच अरुंद. त्यांस इतक्या विचारप्रवाहांची सवय नाही. शिवाय या विचारी मंडळींच्या आसपास असलेल्यांनी अविचाराने उभी केलेली बांधकामे. त्यामुळे विचारांस जमिनीत मुरण्यास जागाच नाही. मग काय होणार? तुंबणारच ना..! मोरूच्या बापास दया आली त्या पोलिसांची. ते बिचारे हातातील लाठय़ाकाठय़ांच्या आधारे तुंबलेला विचारप्रवाह वाहता करण्याचा प्रयत्न करत होते. ते पाहून मोरूच्या बापाने ठरवले, आपण आपले चालत निघावे. वाहनावर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही. अशा दृढनिश्चयाने तो रेल्वे स्थानकाकडे चालत निघाला. रस्त्यावरचे खड्डेही विचारांनी ओसंडून भरलेले. त्यामुळे त्यांच्या खोलीचा अंदाज येईना. एखादा खड्डा विचाराने खोल असेल म्हणून पाऊल टाकावे तर तो अगदीच सपाट निघे आणि दुसऱ्या ठिकाणी जमीन सपाट म्हणून निर्धास्त चालावे तर त्याखाली नेमका खोल खड्डा. अर्थातच विचारांचा. हे इतके विचार-भारित रस्ते आपल्या शहरांत आहेत हे पाहून मोरूच्या बापाचा ऊर अभिमानाने की काय असा भरून आला. वाहतूक कोंडी, रस्त्यावरचे खड्डे इत्यादी कारणांनी कुरकुरणारे त्याचे मन विचार देणाऱ्यांची संख्या पाहून एकदम शांत झाले. विचार महत्त्वाचे. रस्त्यावरचे खड्डे काय? आज आहेत नि उद्या नाही. विचार कायमचे, हा साक्षात्कार होऊन तो समाधानी झाला.

पण क्षणभरच. कारण त्याच्या डोळय़ादेखत पायाखालचा पूल बागबुग करू लागला. मोरूचा बाप झाला म्हणून काय झाले. तोही माणूसच. तो घाबरला. त्यांस वाटले पूल पडतो की काय. तथापि पुलाच्या टोकाशी उभे राहून ब्रेकिंग न्यूज चालवणाऱ्या पत्रकारांस पाहून त्याचा धीर पुन्हा एकवटला. मोरूचा बाप त्या शूर पत्रकाराकडे गेला. तो कोणा तज्ज्ञाची मुलाखत घेत होता. पुलाची बागबुग हाच विषय. त्या तज्ज्ञाच्या मते या पुलास फक्त (रिकाम्या) माणसांच्या वाहतुकीची सवय आहे. पण काल एकाच वेळी दोन दोन ठिकाणी विचारांचे सोने लुटून आलेल्या माणसांची डोकी विचारांनी भरलेली असल्याने पुलास त्यांचे वजन सहन होत नाही. म्हणून तो डुगडुगतो.  हे ऐकल्यावर मोरूच्या बापाने ठरवले, आणखी एखादा दिवस घरीच आराम करावा. या विचारांचा निचरा होऊन जाऊ दे. मगच बाहेर पडावे. म्हणून तो घरी परतला. आल्या आल्या पत्नी म्हणाली.. मोरूस बरे नाही. डॉक्टरांकडे घेऊन जा. मोरू आणि मोरूचा बाप डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी २४ तासांत काय काय झाले ते विचारले. मोरूने सांगितले. ते ऐकून डॉक्टर म्हणाले : एक दिवस मोबाइल वापरू नकोस, टीव्ही पाहू नकोस. नुसता पडून राहा. फारसे काही झालेले नाही. दशमी-एकादशी एकत्रच आल्याने विचारांचे सोने जरा जास्त झाले इतकेच!