… प्राण्यांना भावना नसतात, त्यांना काही कळत नाही, त्यांचा अभ्यास तटस्थपणे करावा आदी शहाणपण शुद्ध थोतांड आहे असे त्या म्हणत…

मनुष्यांतील माकडपण वाढू लागलेले असताना माकडांतील माणूसपण आणि माणुसकी यांचा शोध घेणाऱ्या निसर्गस्नेही जेन गुडाल यांचे जाणे जगभरातील समानधर्मींसाठी वेदनादायी असेल. इंग्लंडने जगास फार मोठे पर्यावरणप्रेमी अभ्यासक दिले. जिम कॉर्बेट, केनेथ अँडरसन, सर डेव्हिड अॅटनबरो इत्यादी. अशा देदीप्यमानांच्या मालिकेतील जेन गुडाल या शेवटच्या. यांची तुलना करणे अयोग्य; पण तरीही अन्यांपेक्षा जेन गुडाल यांचे मोठेपण या आणि अशा सर्वांस पुरून उरते. प्रत्येक बाल्याच्या मनात जन्मत:च असलेले निसर्गप्रेम सहृदय, जागरूक पालकत्वामुळे एखाद्याच्या जगण्याचे प्रयोजनच कसे बनते आणि अशी व्यक्ती मग इतरांसाठीही कसे प्रेरणादायी आयुष्य जगून जाते याचे अत्यंत सात्त्विक, सालस उदाहरण म्हणजे जेन गुडाल. ‘‘आसपास जे काही चालले आहे ते पाहून उद्विग्नता येते. वाटते अंथरुणातून उठूच नये. पण लक्षात येते की वाचवायला हवे, असे अजूनही बरेच काही आहे. ही जाणीव पुन्हा नवी ऊर्जा देते आणि दिवस सत्कारणी लावण्याची प्रेरणा मिळते’’ असे म्हणणाऱ्या गुडाल गेल्या तेव्हा (फक्त) ९१ वर्षांच्या होत्या. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चे तीन ऑक्टोबरचे पॉडकॉस्ट, न्यू यॉर्क येथे दोन ऑक्टोबरच्या व्याख्यानाची तयारी अशा कामाच्या तयारीत असताना त्या गेल्या. त्यांच्याइतके भव्यदिव्य काही करणे प्रत्येकास शक्य होईल, न होईल. पण आपल्या माणूसपणाशी इमान राखण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी त्यांच्या आयुष्याची चित्तरकथा काही ना काही देणारी असेल. म्हणून ती सांगायला हवी.

लहानपणी जेनला तिच्या वडिलांनी ज्यास सॉफ्ट टॉय म्हणतात तशी एक माकडी बाहुली दिली. ती निर्जीव बाहुली त्यांना मोठेपणी खऱ्या माकडांकडे आकृष्ट करती झाली. अन्य कोणाही लहानग्याप्रमाणे कुतूहल हे जेनमध्ये ठासून भरलेले होते. कोंबडीचे अंडे नक्की येते कोठून हे पाहण्यासाठी लहानग्या जेनने आपल्या परसातील खुराड्यात मुक्काम ठोकला. आईस वाटले जेन हरवली. प्रकरण पोलिसांत तक्रार करण्यापर्यंत गेले. तिच्या शोधमोहिमेत पोलिसांची तुकडी घरात यायला आणि खुराड्यातून ताजे ताजे अंडे हातात घेऊन जेन बाहेर यायला एकच गाठ पडली. प्रसंग तणावाचा. पालकांचे हात आणि बालकांची पाठ यांच्या संयोगाचा. पण जेन भाग्यवान अशी की इतके रामायण घडत होते तरी तिची आई एका चकार शब्दाने तिला रागावली तर नाहीच; उलट अंडे बाहेर कसे येते याची बालसुलभ उत्साहीकथा पोलिसांच्या देखत तिने जेनला सांगू दिली. त्यामुळे वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी जेन कधीही न पाहिलेल्या, अत्यंत मागास अशा बदलौकिक झालेल्या आफ्रिकी देशात नवे काही करण्याच्या शोधात जेव्हा जायला निघाली तेव्हा मुलींना एकट्याने प्रवासाची परवानगी नसल्याने ‘‘मी येते तुझ्याबरोबर’’ असे म्हणत आईनेच तिला साथ दिली. खुद्द जेन यांनीच आपल्या आईचे हे वर्णन लिहून ठेवलेले आहे. जेनच्या मैत्रिणीच्या वडिलांनी नैरोबीत एक व्यवसाय सुरू केला होता आणि तेथे काम करण्यासाठी तिला विचारणा केली होती. इंग्लंडपेक्षा वेगळ्या, खऱ्या निसर्गाच्या सान्निध्यात जगायला मिळेल या एकाच विचाराने जेनने होकार दिला. जेनचे आफ्रिकेत जाणे हे कोलंबसाने अमेरिकेत जाण्याइतकेच महत्त्वाचे होते. दोघांनीही नव्या संस्कृतीचा वेध घेतला.

त्या परिसरात माकडे- त्यातही चिम्पांझी विशेष – भरपूर. तो सगळा टापू त्यांचाच. या माकडांची निरीक्षणे जेन करू लागली. त्यातील एका दृश्याने जेन कमालीची उत्साहित झाली. एक नर चिम्पांझी गवताच्या पात्यांची भेंडोळी करून विशिष्ट पद्धतीने वारुळात सरकवत होता आणि थोड्या वेळाने ती काढून भेंडोळींच्या टोकाला चिकटलेल्या मुंग्या ओरपत होता. हे बराच वेळ चालले. जेनने ही घटना पाहण्याआधीही हे असेच घडत होते. महत्त्व आहे ते जेन यांनी या दृश्याचा अर्थ लावला त्याला. म्हणजे न्यूटनने नोंद घेण्याआधीही झाडावरून सफरचंदे पडतच होती आणि अनेकजण ते पाहातही होते. पण पडणाऱ्या सफरचंदाचे कारण ज्याप्रमाणे न्यूटनला ‘दिसले’ त्याचप्रमाणे त्या चिम्पांझी माकडाच्या कृतीचा अर्थ जेनला गवसला. आपले भक्ष्य शोधण्यासाठी, सापडल्यानंतर ते टिपण्यासाठी आणि टिपल्यानंतर त्याच्या भक्षणासाठी आयुध तयार करता येणे हे फक्त प्रगत मानवालाच शक्य आहे, असे तोवर मानले जात होते. पण ज्यांना आपण माकडे म्हणतो तीदेखील हे सर्व करण्यास सक्षम आहेत, हा जेन यांचा निष्कर्ष. जेन यांनी या निरीक्षणानंतर सदर चिम्पांझीवर, त्याच्या टोळीवर अधिक लक्ष केंद्रित केले. अधिक निरीक्षणे नोंदवली, जमेल तशी छायाचित्रे घेतली आणि ३०-४० पानांचा त्यावर आधारित लेख ‘नॅशनल जिऑग्राफिक’ला धाडून दिला. वयाची तिशीदेखील न गाठलेल्या जेनचा हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर प्राणी-अभ्यासक जगात एकच खळबळ उडाली. पहिल्या प्रतिक्रियेत अर्थातच तुच्छतेने हे सर्व झिडकारले गेले. पण जेन यांच्या सातत्यपूर्ण निरीक्षणांनी सर्व तत्कालीन ढुढ्ढाचार्यांना आपापली मते बदलावी लागली. चिम्पांझी जातीची माकडे माणसांप्रमाणे टोळ्या बनवतात, माणसांप्रमाणे एकमेकांशी शब्द-नादाद्वारे संवाद साधतात, त्यांची स्वत:ची युद्धधोरणे ठरतात, माणसाप्रमाणेच त्यासाठीची अस्त्रे तयार करतात इत्यादी त्यांच्या निरीक्षणांनी इतिहास घडला. जेन यांची ही निरीक्षणे सर्वमान्य झाली, चिम्पांझी हे प्रगतीबाबत मनुष्यप्राण्याच्या जवळ आहेत हे जेव्हा सिद्ध झाले तेव्हा त्या वेळचे आघाडीचे मनुष्य उगमाभ्यासक, जेन यांचे मार्गदर्शक लुईस लिके म्हणाले : आता आपणास अस्त्र, आयुध म्हणजे काय याचा विचार नव्याने करावा लागेल, मनुष्याच्या ‘प्रगत’तेचा विचार नव्याने करावा लागेल अथवा चिम्पांझींचे मनुष्यत्व मान्य करावे लागेल.

यानंतरचे अवघे आयुष्य जेन यांनी मनुष्याच्या या आदिमावतारचरणी वाहिले. आफ्रिकेतील जंगले, तेथील श्वापदे, निसर्ग यांच्या अभ्यासात त्या गढून गेल्या. अन्य असे अभ्यासक आणि जेन यांच्यातील फरक हा की त्यांनी आपल्या संशोधनविषयाचे उगाच उदात्तीकरण कधीही केले नाही. चिम्पांझी प्रसंगी किती क्रूर असतात आणि आपल्या कळपातील माद्या पुन्हा लगेच माजावर याव्यात यासाठी अर्भकांना कसे मारून टाकतात हेही त्यांनी तितक्याच तटस्थपणे लिहिले. एरवी नैसर्गिकरीत्या चिम्पांझी मादी एका प्रसूतीनंतर दोन-तीन वर्षे माजावर येत नाही. कारण तिचे प्राधान्य असते आईपणास. त्यामुळे ‘घाई’ला आलेले नरवानर पिल्लांचा जीव घेतात. अशा नरांपासून वाचवण्यासाठी माद्या आपल्या पिल्लांना बराच काळ लपवून ठेवतात. यातही पुरुष माकडांची लबाडी अशी की ते स्वत:च्या अपत्यास मारत नाहीत, अन्य पुरुषाच्या संगातून जन्मलेल्यांचा मात्र जीव घेतात. जेन यांची अशी निरीक्षणे माणसांत अजूनही उरलेले माकडपण सातत्याने दाखवत गेली. ते सर्व पुढे अधिक अभ्यासले गेले. सारा हार्डी यांच्यासारख्यांनी माकडांतील कुटुंबव्यवस्थेचा अधिक अभ्यास केला. आपल्याकडे मराठीत व्यंकटेश माडगूळकर यांची विख्यात ‘सत्तांतर’ ही कादंबरी, त्यातील ‘लालबुड्या’ आदी व्यक्तिरेखा या अभ्यासावर आधारित आहे. आयुष्यभर जेन यांना जंगलाचा इतका लळा होता की आपल्या तान्ह्या मुलालाही त्या जंगलात घेऊन जात. त्याच्यासाठी बनवून घेतलेल्या मजबूत पोलादी पिंजऱ्यात त्याला ठेवत. आपला अभ्यासविषय असलेल्या चिम्पांझींतील कोणी आपल्या पोटच्या पोराचा जीव घेऊ नये, यासाठी ही खबरदारी. याची कबुली त्यांनीच दिलेली आहे आणि तीदेखील चिम्पांझींना अजिबात बोल न लावता. प्राणी अभ्यासाच्या क्षितिजावर जेन यांचा उदय होण्यापूर्वी अभ्यास विषयांना फक्त क्रमांक दिले जात. म्हणजे ‘टी १’, ‘एम ३’ वगैरे. जेन यांनी प्रत्येक अभ्यासविषयाचे नामकरण केले आणि त्या सर्वांस परिचिताप्रमाणे वागवले. आणि सर्वात सुखकारक बाब अशी की ही प्राणीप्रजादेखील जेन यांना स्नेह्याप्रमाणे वागवू लागली. जेन यांच्या मुलाखती, पुस्तके ज्यांनी पाहिली/वाचली असतील त्यांना जेन आणि हा चिम्पांझी परिवार यांची अनेक लोभस छायाचित्रे परिचित असतील. प्राण्यांना भावना नसतात, त्यांना काही कळत नाही, त्यांचा अभ्यास तटस्थपणे करावा आदी शहाणपण शुद्ध थोतांड आहे, असे त्या म्हणत. हा साक्षात्कार ज्याच्यामुळे झाला त्या गुरूचा त्या आदरपूर्वक उल्लेख करत. तो गुरू म्हणजे त्यांचा पाळीव श्वान.

संपूर्ण आयुष्य जेन गुडाल यांनी प्राणी हक्क, पर्यावरणसंवर्धन यासाठी व्यतीत केले. त्यासाठी जेन गुडाल इन्स्टिट्यूट काढली. आज जगभरातील तीन डझन देशांत या संस्थेच्या शाखा आहेत. मुंबईतही ती आहे. तिच्यासाठीच गेल्या वर्षी जेन गुडाल मुंबईत आल्या. सुमारे १२-१३ तासांच्या प्रवासानंतर पहाटे उतरल्या आणि सकाळी आठ वाजता महाविद्यालयीन तरुणांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. पुढच्या पिढीबाबतचा त्यांचा आशावाद कौतुकास्पद असा. तो पाहून त्या आशावादास तडा जाऊ नये, अशीच भावना निर्माण होते. वयाच्या ९१ व्या वर्षी वर्षाचे सरासरी ३०० दिवस त्या निसर्गसंवर्धनच्या प्रचार-प्रसारार्थ विविध मोहिमांस सहभागी होण्यासाठी जगभर प्रवास करत. त्यांचे लिहिणे, बोलणे, हिंडणे सर्व काही या विषयासाठीच. ‘इन द शॅडो ऑफ मॅन’, ‘माय फ्रेंड्स: द वाइल्ड चिम्पांझीज’ आदी त्यांची पुस्तके कमालीची लोकप्रिय आहेत. जगभरातील अनेकांच्या- यात प्रस्तुत लेखकही आहे- प्राणी/निसर्गप्रेमास जेन गुडाल यांनी शास्त्राधार दिला.

आताही त्या मुलांसाठी एका पुस्तकावर काम करत होत्या. विषय हत्ती आणि त्या आगामी पुस्तकाचे शीर्षक ‘एव्हरी एलिफंट हॅज अ नेम’. ते पुस्तक पूर्ण करणे ही आता जेन यांच्या सहकाऱ्यांची जबाबदारी. ते व्हावे. उत्क्रांतीतून माकडाचा माणूस झाल्याच्या सिद्धान्ताचा प्रतिवाद ‘अपक्रांतीतून माणसाचा पुन्हा माकड होऊ शकतो’ या वास्तवाने करू पाहणाऱ्यांची संख्या वाढत असताना प्राण्यांतील नितळ माणुसकीसाठी जगणाऱ्या जेन गुडाल यांना ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.