‘असे खरेच घडू शकते का? असल्यास कशामुळे?’ आदी प्रश्न ३० वर्षांपूर्वी विचारले गेले नाहीत. प्रश्न न विचारण्याची ही सवय आजही निरनिराळ्या स्वरूपात कायम आहेच…
बरोबर ३० वर्षांपूर्वीची गोष्ट. तो दिवस होता २१ सप्टेंबर १९९५. सगळ्यांचे सगळे व्यवहार नियमित सुरू होते. कुठून काय माहीत, अचानक अफवा उठली की, गणपतीची मूर्ती दूध पिते आहे. कोणत्याही अफवेला जसे तोंड नसते आणि शेपूटही नसते, तसेच या अफवेचेही होते. गणपतीने नेमक्या कुणाच्या घरी सगळ्यात आधी दूध प्यायले आणि त्याचा वार किंवा संकष्टी वगैरे कोणतीही धार्मिक निमित्ते नसताना नेमके २१ सप्टेंबर या दिवशीच का प्यायले याचा काहीच थांगपत्ता नव्हता. कुणी तरी कुणाला तरी सांगितले की गणपती दूध पितो आहे आणि ही बाब देशभर – आजच्या भाषेत सांगायचे तर प्रचंड ‘व्हायरल’- झाली. मग जो तो हातात दुधाची वाटी घेऊन आपल्या हाताने गणपतीला दूध पाजायला धावू लागला. गणपतीची मूर्ती घरातली असो वा बाहेरची, धातूची असो, मातीची असो वा दगडाची. प्रत्येकाला हा चमत्कार अनुभवायचा होता. फक्त भारतातच नाही, तर जगभरात विविध ठिकाणी असलेल्या गणपती मंदिरांसमोर ‘देवाला दूध पाजण्यासाठी’ इतक्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या की यच्चयावत आंतरराष्ट्रीय माध्यमांना त्याची दखल घ्यावी लागली. दुधाने भरलेला चमचा गणपतीच्या मूर्तीच्या जवळ नेला की तो हळूहळू रिकामा होतो, हे करून बघणाऱ्याला त्याच्या डोळ्यांनी दिसत होते. आपल्या हातांनी आपला देव दूध पितो आहे, ही बाब हरखून टाकणारी असली तरी आपण भक्तीच्या नावाखाली बुद्धीच्या देवतेसमोर निर्बुद्धपणा करतो आहोत, हे कुणाच्याही गावीदेखील नव्हते. त्या दिवशी दुधाची विक्री नेहमीपेक्षा चौपटीने अधिक झाली म्हणतात. त्यातच तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही त्यांच्या घरच्या गणपतीने दूध प्यायल्याचे माध्यमांना सांगितल्यामुळे तर लोकांच्या दृष्टीने या चमत्कारावर शासकीय शिक्कामोर्तब झाले. आजचा जमाना आहे कोणतीही गोष्ट काही सेकंदात व्हायरल होण्याचा. त्यामागे एक अत्याधुनिक, तंत्रज्ञानाधारित व्यवस्था आहे. पण मोबाइल सोडाच, लॅण्डलाइन फोनही मर्यादित संख्येने असण्याच्या, वृत्तवाहिन्यांचे फारसे पेव फुटलेले नसण्याच्या, इंटरनेट, समाजमाध्यमे हा प्रकार नसण्याच्या आणि माहितीसाठी सगळी भिस्त मुद्रित माध्यमांवर असण्याच्या काळात एखादी बातमी येते आणि ती त्या दिवशी देशभर पसरते हे जितके अनाकलनीय होते तितकेच न पटणारे, सहज स्वीकारता न येणारे होते.
माहितीच्या प्रसाराची अत्यंत तुटपुंजी साधने असतानाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आपल्या लढ्याच्या पुढच्या पावलांविषयी गांधीजी जी माहिती देत ती रातोरात अगदी खेडोपाडीदेखील पोहोचत असे. समाजाला जो संदेश द्यायचा आहे, तो नेमका सर्वांपर्यंत पोहोचवून त्यांनी एक प्रकारे समाजमनाचे व्यवस्थापनच केले होते. त्यांना कधीही बघितलेले नसताना, त्यांची भेटही झालेली नसताना अनेक माणसे उपोषणांत, सत्याग्रहांत सहभागी होऊ लागली ती या ताकदीमुळेच. दुसरीकडे जयप्रकाश नारायण यांच्या मृत्यूच्या अफवेने तर सरकारी यंत्रणांनाच नाही तर अगदी तत्कालीन पंतप्रधानांनाही चकवले होते. आकाशवाणीने हे वृत्त दिल्यानंतर त्या वेळी संसदेचे कामकाज थांबवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘मृत्यू झालेला नाही’ असा खुलासा देण्याची नामुष्की आलेल्या त्या दिवसानंतर जवळपास आठ महिन्यांनी जयप्रकाश नारायण निवर्तले. पण गांधीजींचे संदेश रातोरात देशभर पसरणे, जयप्रकाश यांच्या निधनाची अफवा या सगळ्यापेक्षा गणपती दूध पितो ही अफवा काही तासांतच देशभर पसरणे ही गोष्ट सहज वाटावी, पण सहज असू शकत नाही, अशा प्रकारातली. ती सहज नसेल तर कोणी घडवली होती, का घडवली होती, कोणाला तरी समाजमन अशा वेळी कसे वागते, काय करते, त्याला हवे तसे वळवता येते का हे जाणून घेण्याचा ‘प्रयोग’ करायचा होता का आणि तो का, हे सगळे नंतर गुलदस्त्यातच राहिले. कारण गणपती दूधबीध काही पीत नाही तर सरफेस टेन्शन म्हणजेच पृष्ठभागीय तणाव आणि केपिलरी अॅक्शन या भौतिकशास्त्राच्या संकल्पनांनुसार हे घडले आहे, हे शास्त्रीय अभ्यासकांनी स्पष्ट केले. त्यांनी वर असेही सांगितले की, कोणत्याही मूर्तीला तुम्ही या पद्धतीने दूध पाजू शकता. मूर्तीच कशाला, दगडाच्या, मातीच्या, धातूच्या एखाद्या शोभेच्या वस्तूलादेखील तुम्ही या पद्धतीने दूध वा पाणी पाजू शकता. या वस्तूंच्या पृष्ठभागावर असलेल्या अतिसूक्ष्म भेगा पृष्ठीय तणावामुळे अशा पद्धतीचा द्रव पदार्थ शोषून घेतात. गणेशमूर्तीच्या बाबतही हेच घडले.
शास्त्रज्ञांच्या या निवेदनानंतर या अफवेमधली हवा निघून गेली आणि पुन्हा प्रत्येक जण आपापल्या पोटापाण्याच्या उद्याोगाला लागला खरा, पण त्यानिमित्ताने उपस्थित झालेले प्रश्न या घटनेच्या ३० वर्षांनंतर आजही तसेच आहेत. एखाद्या देवतेवर श्रद्धा असणे ही प्रत्येक माणसाची वैयक्तिक बाब, पण त्या श्रद्धेचा बाजार करणे जसे चुकीचे, तसेच त्या श्रद्धेचा वापर करून व्यक्तीला अंधश्रद्धेकडे झुकवणे, आपल्या श्रद्धेय देवतेबाबत भावनिक होण्यास भाग पाडणेही चूकच. पण तसे होते. गणपतीला दूध पाजताना ‘असे खरेच घडू शकते का, मग ते याआधी का घडले नाही, इतर देवांनी दूध का प्यायले नाही, हे कुणाचे षड्यंत्र असू शकते का…’ आदी प्रश्न ३० वर्षांपूर्वी विचारले गेले नाहीत, तसेच आजही अनेक गोष्टींबाबत का असे प्रश्न विचारले जात नाहीत. विचारू दिले जात नाहीत. प्रश्न विचारायचा नसतो, विज्ञानाला महत्त्व देऊन धार्मिक गोष्टींबद्दल शंका घ्यायची नसते, हेच लहानपणापासून प्रत्येकाच्या मनावर बिंबवले जाते. धार्मिकच कशाला, बाकी कोणत्या गोष्टींबद्दल चौकस असतो आपण? धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील कोणत्याही गोष्टीबद्दल आपली बुद्धी न वापरता मेंढरांसारखे एखाद्याच्या मागे जाणे चुकीचे आहे, हे व्हॉट्सअॅप फॉरवर्डमधून जगाबद्दलचे ज्ञान वाढवणाऱ्यांना माहीत नसते का? एखादी गोष्ट व्हायरल वा नुसतीच फॉरवर्ड करणे, एखाद्या व्यक्तीला फॉलो वा लाइक करणे असो, समाजमाध्यमांवर जे केले जाते तेच- तशाच पद्धतीचे अंधानुकरण प्रत्यक्ष आयुष्यातही होताना दिसू शकते. माणसांचे विचार करण्याचे बटण बंद करून त्यांना भावनांच्या लाटांवर स्वार व्हायला लावले जाते. जातिधर्माबद्दलचे समज-गैरसमज, एखादा राजकीय विचार किंवा काहीही ‘व्हायरल’ करण्यासाठी अशी माणसे हे उत्तम भांडवल ठरते. कुंभमेळ्यात होणारी गर्दी किंवा मुंबईत रझा अकादमीच्या मोर्च्यात केली गेलेली तोडफोड यापेक्षा काय वेगळी होती? करोनाकाळात त्या महासाथीचे स्वरूप लक्षात न घेता पसरवले गेलेले गैरसमज असोत की नास्तिकतेला विरोध करणे असो, नवरात्रीच्या काळात विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याची मानसिकता तयार करणे असो वा भारत -पाकिस्तानदरम्यान नुकत्याच झालेल्या युद्धाच्या दरम्यान आपले लष्कर तेथील शहरे पादाक्रांत करत चालल्याच्या ‘बातम्या’ पसरवण्याचा उद्याोग असो, यामागे समाजमन हवे तसे वळवण्याचे डिझाइन असू शकते हे आपल्याला केव्हा समजणार? गोमांस बाळगल्याच्या संशयावरून एखादा मोहम्मद अखलाख दगडविटांनी ठेचून मारला जातो, तेव्हा ती उत्स्फूर्त घटना नसते तर गर्दीला भावनिक वळण देऊन हवे तसे वागायला लावले जाते, हे नीट समजून घेतले पाहिजे.
पण तसे होत नाही. म्हणूनच माणसांना ऐकायला, वाचायला, बोलायला आवडेल तेच देणे, आणि तसे करत करत त्यांना आपल्याला हवे तसे वागायला भाग पाडणे हे फक्त ‘अल्गोरिदम’चेच नव्हे, तर आपल्या फायद्यासाठी समाजमन काबूत ठेवू पाहणाऱ्या प्रत्येकाचे तंत्र असते. याचे जोवर आकलन होत नाही, तोवर या ना त्या स्वरूपात गणपती दूध पीतच राहणार!