एखाद्या विषयाची किती हवा करायची याचा काही एक विवेक असावा लागतो. हा विषय वैयक्तिक श्रद्धेसारखा भावनिक असेल आणि त्याची हवा तयार करणारे सत्ताधारी असतील तर या विवेकाची गरज अधिक. भावनेस हात घालणे सोपे. बुद्धिगम्य वैज्ञानिकता मनी रुजवणे कित्येक पटींनी अवघड. हे सत्य लक्षात घेतल्यास विद्यामान राज्यकर्त्यांनी प्रयागराज येथील ‘महाकुंभ’ची वातावरण निर्मिती केली ती किती घातक होती हे बुधवार पहाटेच्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून समजावे. जे झाले ते निर्विवाद दु:खदायक. इतके की प्रत्यक्ष किती जणांचे आयुष्य शब्दश: गंगार्पणमस्तु झाले हे सांगण्यासही दिवसभरात कोणी धजावत नव्हता. ‘बीबीसी’सारख्या वृत्तसेवेनुसार ‘जखमीं’स दाखल केलेल्या रुग्णालयात माध्यमकर्मींस मज्जाव होता. तो का न कळे. कारण गंगाकिनाऱ्यास प्रेतांच्या ढिगाऱ्यांचे नावीन्य नाही. कोविडकाळात देशाने ते पाहिले, त्या तुलनेत आजचे (बहुधा) तीसेक जणांचे मृत्यू कमी! तेव्हा याप्रकरणी इतकी गुप्तता बाळगण्याचे काही कारण नव्हते. कदाचित दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या प्रकरणाचा बभ्रा झाल्यास राजधानीचा हातातोंडाशी आलेला घास जायचा, याचीही भीती असेल. संकट कितीही गहिरे, तीव्र असो. निवडणूक विजय त्या सगळ्यापेक्षा अधिक महत्त्वाचा! असो. जे झाले त्याबाबत शोक व्यक्त करून आणि मृतात्म्यांस सद्गती मिळो अशी इच्छाही व्यक्त करून काही मुद्द्यांचा ऊहापोह व्हायला हवा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उदाहरणार्थ या कुंभमेळ्यास हजर राहिलेल्यांची संख्या. कोणी १० कोटी सांगतो, कोणी १२ कोटी वा कोणी आणखी काही. या संख्येच्या सत्यासत्यतेबाबत चर्चा करायची नाही असे ठरवले तरी भाव महत्त्वाचा की भाविकांची संख्या हा प्रश्न कोणालाच पडू नये? महाभारतात केवळ संख्येच्या प्रेमात पडून कृष्णाचे काही अक्षौहिणी सैन्य मागणारे कौरव आणि भक्तिभावाने कृष्णाची साथ मागणारे पांडव यांच्या लढाईत काय झाले याचे स्मरण या प्रसंगी अनाठायी ठरणार नाही. सगळ्यात मोठे, सगळ्यात भव्य, सर्वाधिक संख्या, पहिल्या तिनांत इत्यादी दावे करणाऱ्यांच्या मनात स्वत:विषयी न्यूनगंड असतो याची जाणीव आपणास केव्हा होणार? खरे सामर्थ्यवान वा बलवंत हे उठता-बसता शड्डू ठोकत नाहीत. हा मुद्दा येथे प्रकर्षाने लक्षात घ्यावयाचा याचे कारण हा काही पहिला आणि शेवटचा महाकुंभ नाही. याच्याआधीही असे अनेक कुंभ झाले आणि यानंतरही ते होतील. याच्याआधी कोणास ‘सर्वाधिक गर्दीचा’ इत्यादी दावे करण्याची गरज वाटली नाही. आताच ती वाटण्याचे कारण काय? बरे, असा दावा करायचा तर व्यवस्थाही तितकीच चोख हवी. ती किती नव्हती हे परदेशी वृत्तवाहिन्या पाहून कळते. बाकी एरवी एखादा फटाका फुटला तरी ‘थेट प्रक्षेपणा’त ‘वहां का माहौल कैसा है’ सांगण्यास उतावळ्या आपल्या वृत्तवाहिन्यांनी या दुर्घटनेबाबत पाळलेली ‘मौनी अमावास्या’ डोळ्यांत न भरणे अवघड. असो. या मुहूर्तावर पवित्र गंगेच्या अतिपवित्र संगमात डुबकी मारण्यास गेलेल्या उत्सुकांचा लोंढा हाताबाहेर गेला. गंगाकिनारी झोपलेले अनेक पायदळी तुडवले गेले. या अपघातानंतर त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेथे हजर भक्तगणांस आवाहन केले आणि संतमहंतांच्या प्रमुखांनीही काही भूमिका घेतली. त्यावरून काही प्रश्न पडतात.

जसे की सर्व भक्तांनी संगमावर येण्याचा हट्ट बाळगू नये, जवळ जो कोणता घाट असेल तेथे स्नान करून घ्यावे असे योगी म्हणाले. ते योग्यच. मग मुद्दा असा की ‘जवळ असेल त्या’ घाटावर स्नान केल्याने तितक्याच पुण्याची हमी दिली जाणार असेल तर मग गावोगावच्या भक्तांनी जीव कष्टवून संगमावर जाण्याची गरजच काय? आपल्याकडे प्रत्येक नदीलाच गंगावतार मानले जाते. त्यातील अनेक कोरड्याठक्क झाल्या असल्या तरी या मुहूर्तावर या नद्यांत पाणी सोडून अनेकांच्या पुण्यप्राप्तीची हमी आपल्या अधिकारीगणांनी दिलीच असती. नाशिकमध्ये एका बड्या नेत्यांस पुण्यप्राप्ती व्हावी म्हणून विशेष पाणी कसे सोडले गेले याचे स्मरण काहींस या निमित्ताने होईल. ते योग्यच. तसे केले असते तर गावोगावच्या नद्यांना यानिमित्ताने तरी ऊर्जितावस्था आली असती आणि स्थानिकांना पुण्यप्राप्तीसाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या नसत्या. दुसरा मुद्दा संतमहंतांच्या प्रमुखांनी घेतलेल्या अत्यंत समंजस भूमिकेचा. या अपघातानंतर त्यांनी आजच्या सुमुहूर्तावर स्नान (काही काळ तरी) थांबवले. त्यांच्या या समंजस कृतीचा असाही अर्थ निघू शकतो की महाकुंभांच्या काळात कधीही संगम स्नान केले तरी ते तितकेच पुण्यदायी असू शकते. हा अर्थ बरोबर असेल तर या आजच्या मुहूर्ताचा इतका डांगोरा पिटायचे कारण काय? कुंभ-काळात कधीही या, असे भाविकांस सांगता आले असते. चेंगराचेंगरीच्या अपघातामुळे तेच करण्याची वेळ आयोजकांवर अखेर आली. त्यातही, आजच्या सुमुहूर्तावर प्रयागराजकडे निघालेल्या विशेष रेल्वेगाड्या आयोजकांनी रद्द केल्याची बातमी सकाळी आली. मग दुपारी उशीरा त्या रद्द नसल्याची बातमी आली. या घोळामुळे या विशेष गाड्यांतून येणाऱ्या कित्येक भक्तांस आजचा मुहूर्त गाठता आला नाही. त्यांचा हिरमोड झाला असणार आणि निसटलेल्या पुण्यप्राप्तीसाठी आणखी १२ वर्षे थांबावे लागणार किंवा काय, या प्रश्नाने ते हताश झाले असणार. त्यांचे हरपलेले पुण्य लवकरात लवकर त्यांस कसे मिळेल, याचा विचार आता सरकारला करावा लागणार.

या दुर्दैवी अपघातापेक्षा महाकुंभातील अधिक सुदैवी बातमी होती ती आदरणीय ममता कुलकर्णी यांच्या साध्वीकरणाची. त्या आता किन्नर आखाड्याच्या पदाधिकारीही झाल्या आहेत. म्हणजे इतके दिवस या ममतेकडे ‘स्त्री’ म्हणून आणि त्या नजरेतून पाहणाऱ्या देशातील लाखो पुरुषांचा हा मानभंग मानायचा का? अन्यथा ‘अंगे भिजली जलधारांनी’ अशी ललना काही नरपुंगवांस आलिंगने देताना पाहावयाची सवय झालेल्यांस त्यांचे ‘किन्नर’पण स्वीकारावे लागणे हा स्वप्नभंग ठरेल. अर्थात किन्नर नसतानाही किन्नरांत सामील होता येते अशी काही धर्मसोय असल्यास ते माहीत नाही. तसा खुलासा अद्याप तरी कोणी केलेला नाही वा कोणी मागितलेलाही नाही. तथापि त्यांच्या या साध्वीपणास आक्षेप घेतला तो ओरिजनल बाबा रामदेव यांनी. याबद्दल बाबांचे अभिनंदन करावे की हा त्यांच्या पुरुषी मानसिकतेचा आविष्कार मानावा, हे ठरवणे अवघड. पण बाबांनी या ममताबाईंचा अमली पदार्थ सेवन इतिहास, त्यांनी मध्यंतरी इस्लाम धर्म स्वीकारल्याची वदंता याचा उल्लेख केला. पण तो निरर्थक ठरतो. कारण ममताबाईंच्या साध्वीपणाच्या आड अमली पदार्थ सेवन हा काही आक्षेप घ्यावा असा मुद्दा असणार नाही. आणि त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता हे सत्य असेल तर यानिमित्ताने एक यवन कमी झाला याचा आनंद आहेच.

पण बुधवारी पहाटे जे झाले ते झाले नसते तर महाकुंभास गालबोट लागते ना. आगामी काळात अशा सोहळ्यांतून या त्रुटी दूर व्हाव्यात यासाठी देशातील मेजॉरिटीने मौनाविषयीची आपली ममता सोडायला हवी. तसे करणे अधिक पुण्यप्रद असेल.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on stampede at mahakumbh in prayagraj amy