सर्व कामगारांची सुखरूप सुटका झाली या आनंदोत्सवात हिमालय ‘पोखरण्या’च्या योजनांचा, प्रकल्पांचा फेरविचार करण्याची वेळ आलेली आहे, या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष संभवते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाकडून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पराभूत झाल्यामुळे निर्माण झालेल्या राष्ट्रीय दु:खावर उत्तराखंडातील बोगद्यात १७ दिवस अडकलेल्या कामगारांची यशस्वी सुटका हा उतारा होता. या सुटकेत महत्त्वाची भूमिका बजावणारे, अथक प्रयत्न करणारे आणि यशाचा मार्ग दाखवणारे तंत्रज्ञ अर्नाल्ड डिक्स हे ऑस्ट्रेलियाचेच असावेत हा विचित्र योगायोग. या डिक्स यांच्या जोडीला विविध सरकारी उपक्रमांस आणि उपकरणांस मुन्ना कुरेशी, फिरोज, रशीद, इर्शाद, नसीम, नसीर, अंकुर, जतीन, सौरभ, वकील, हसन, देवंदर अशा झारखंड, बिहार आदी राज्यांतील गरीब, आदिवासी उपेक्षित कामगारांची साथ निर्णायक ठरली आणि जवळपास ४०० तास अंधारबोगद्यात खितपत पडलेल्या कामगारांस अखेर मोकळा श्वास घेता आला. या कामगार बचाव मोहिमेत सहभागी असलेले वरील सर्व आणि अन्य नि:संशय अभिनंदनास पात्र ठरतात. गेले दोन-अडीच आठवडे समस्त भारतीयांचा दिवस एकाच प्रश्नाने उगवत होता आणि त्या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत संपत होता. ही प्रतीक्षा आता संपली. आपल्या राष्ट्रीय सवयीप्रमाणे आता या सुटका मोहिमेचे गोडवे इतके गायले जातील की त्यात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पूर्ण दुर्लक्षित होईल. ‘मुळात ही अशी अडकून राहण्याची वेळ या कामगारांवर आलीच कशी, का आणि कोणामुळे’, हा तो प्रश्न. कामगारांच्या यशस्वी सुटकेनंतर आता तो विचारणे हे कर्तव्य ठरते. कारण असे प्रश्न विचारणे हाच आपल्या मानवी जीवांबद्दल असलेल्या राष्ट्रीय हेळसांड सवयीवरील उपाय असू शकतो.

उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या या कामगारांच्या सुटकेसाठी शेवटी ‘रॅट होल मायिनग’ या अवैध खनिकर्म पद्धतीचा अवलंब करावा लागला. विविध बनावटींची छिद्रक यंत्रे कुचकामी ठरली तेव्हा हाताने खणून कोळसा उचकटणाऱ्यांना पाचारण करावे लागले. हा तोडगा यशस्वी ठरला हे ठीक. पण त्याचा अवलंब करावा लागणे हे, अशा प्रकल्पांच्या आणि संभाव्य दुर्घटनांच्या हाताळणीतील आपल्या सिद्धतेबाबत प्रश्न निर्माण करणारे ठरते. उत्तरकाशी हा जिल्हा उत्तराखंड राज्यातला. त्या राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी अडकलेल्या कामगारांच्या सुटकेबद्दल स्थानिक देवतेचे आभार मानले. श्रद्धा म्हणून हेही ठीक. कारण इतर सारे प्रयत्न सातत्याने अपयशी ठरत असताना बहुधा या कृपाप्रसादाची त्यांना इतके दिवस प्रतीक्षा असावी! या परमेश्वरी ताकदीची धामी सरकारला खात्री इतकी, की दुर्घटनास्थळी खास बोलावून घेतलेले आंतरराष्ट्रीय बोगदे तंत्रज्ञान तज्ज्ञ डिक्स यांनाही पूजापाठ करावा लागला म्हणतात. तेव्हा इतके दिवस पर्वतउदरात अडकून कासावीस झालेल्या कामगारांना अखेरीस प्रकाशाचा कवडसा दाखवण्याचे श्रेय स्थानिक देवतेस आणि पोटाची खळगी भरण्यासाठी ‘रॅट-होल मायिनग’सारख्या धोकादायक परंतु अवैध उद्योगात गुंतलेल्या अनामांनाच द्यावे काय, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी असेल, तर या संपूर्ण दुर्घटनेची तंत्रसिद्धतेच्या दृष्टिकोनातून चिकित्सा होणे गरजेचे आहे. चारधाम प्रकल्पाचा भाग असलेल्या सिलक्यारा-बारकोट या निर्माणाधीन बोगद्याचा सिलक्याराच्या बाजूकडील ६० मीटर उंचीचा भाग खचल्यामुळे कामगार अडकले. १२ नोव्हेंबर रोजी पहाटे ही घटना घडली. दरम्यानच्या काळातील निराशा, सततचे अपयश यांकडे दुर्लक्ष करून अखेरीस २८ नोव्हेंबर रोजी कामगार सुखरूप परतले. तथापि त्यांच्या स्वागतास फक्त मुख्यमंत्री धामी वा एकच केंद्रीय मंत्री असणे ही तशी आश्चर्याचीच बाब! या आनंदोत्सवात हिमालय ‘पोखरण्या’च्या अशा अनेक योजनांचा, प्रकल्पांचा फेरविचार करण्याची वेळ आलेली आहे, या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष संभवते.

सिलक्यारा-बारकोट या प्रस्तावित साडेचार किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम सुरू असताना १२ नोव्हेंबर रोजी सिलक्याराच्या बाजूकडील बोगद्याचा काही भाग खचला आणि त्यामुळे बोगद्यात आधीपासूनच गेलेले ४१ कामगार अडकले. या बोगद्याच्या बारकोटकडील बाजूच्या मधल्या भागात ४८३ मीटर लांबीच्या भागातील काम बाकी आहे. त्यामुळे साधारण दोन किलोमीटर लांबीच्या बांधकामाधीन बोगद्यामध्ये कामगार अडकून पडले. त्या भागातील विजेच्या तारांना धक्का लागला नाही. त्यामुळे कामगार असलेल्या भागात विजेचे दिवे सुरू होते. तसेच चार इंच रुंदीच्या कॉम्प्रेसर पाइपचेही नुकसान झाले नाही. अडकलेल्या कामगारांसाठी हा पाइप जणू जीवनवाहिनी ठरला. या पाइपच्या माध्यमातून शुद्ध हवा बोगद्यामध्ये सोडता येत होती. याशिवाय आणीबाणीच्या प्रसंगी वापरले जाते त्या स्वरूपाचे पोषण आधार अन्न, जीवनसत्त्वयुक्त पदार्थ आणि वैद्यकीय मदत कामगारांपर्यंत पाठवता येत होती. वैद्यकीय साधनांत नैराश्यशमनाच्या औषधांचाही समावेश होता. दुर्घटना घडली त्यानंतर काही दिवसांनी आणखी एक सहा इंची पाइपलाइन सोडण्यात आली. तिच्या माध्यमातून शिजवलेले अन्न आणि चलचित्रण कॅमेरा पोहोचवता येत होता. कॅमेऱ्याच्या माध्यमातून कामगारांची सुरक्षा आणि ख्यालीखुशाली यांवर लक्ष ठेवता येत होते. परंतु अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढणे हे या मोहिमेचे प्रधान उद्दिष्ट होते आणि त्याला यश येत नव्हते. विविध पाच प्रकारांनी प्रयत्न करून कामगारांपर्यंत पोहोचण्याची योजना होती. यात सिलक्याराकडून आणि बारकोटकडून समस्तरीय (हॉरिझॉन्टल) छिद्रणाच्या तीन योजना होत्या. तर आणखी दोन योजनांमध्ये बोगद्याच्या वरच्या बाजूने उभ्या दिशेत छिद्रण करून सुटका करण्याचा प्रस्ताव होता. या दोन योजनांमध्ये जोखीम अधिक होती. म्हणून सिलक्याराकडूनच कामगारांपर्यंत पोहोचण्यास प्राधान्य दिले गेले, पण तरी अपेक्षित यश येत नव्हते. इतके दिवस प्रयत्नांची शर्थ करायला आणि श्वास रोखून धरायला लावणारे हे यश अखेर मिळाले.

आता प्रश्न असा की हिमालयीन पर्वतराजीची आपण आणखी किती अवहेलना करणार आहोत? श्रद्धाळूंच्या मते भगवान शंकराचे वसतिस्थान, धार्मिकांच्या मते देवभूमी आदी कित्येक विशेषणे त्या परिसरास वापरली गेली तरी भूगर्भशास्त्रीयदृष्टय़ा सत्य एकच आहे. ते म्हणजे हिमालयाचे एक पर्वत म्हणून नवथर असणे. सह्याद्री आदी पर्वतरांगांच्या तुलनेत हिमालय वयाने तरुण आहे आणि अजूनही त्यात तारुण्यसुलभ अस्थिरता आहे. त्यामुळे या परिसरात भूकंपांची शक्यता अधिक. या भागात पृष्ठभागाखालील भूस्तरांची हालचालही अधिक. जोशीमठादी परिसरात जमिनीस भेगा पडणे, भूस्खलन इत्यादी घटना वारंवार होत असतात त्यामागील कारण हे. याच्या जोडीला पर्यटनाच्या आणि त्यामुळे उत्पन्नाच्या ओढीने या परिसरात डोंगर आणि वृक्षकाटणी बेसुमार सुरू आहे. हे कमी म्हणून की काय श्रद्धावानांचे आशीर्वाद- त्यानंतर मते ओघाने आलीच- मिळावेत यासाठी चारधाम योजना हाती घेतली गेली. अनेक तज्ज्ञांनी या संदर्भात इशारा दिलेला होता. मोठय़ा प्रमाणावर रस्ते रुंदीकरण, महामार्ग उभारणी, बोगदे खोदाई या परिसरात करणे संकटास आमंत्रण देणारे ठरेल, हा इशारा अनेकांनी दिलेला होता. तथापि तज्ज्ञांच्या मतांस य:कश्चित लेखण्याची नवी प्रथा अलीकडे रुजताना दिसते. त्यानुसार या इशाऱ्यांकडेही दुर्लक्ष केले गेले. वास्तविक अशा प्रकारचे बोगदे बांधताना असे काही होईल याचा विचार करून आणीबाणीप्रसंगी सुटकेचा मार्गही तयार ठेवला जातो. असे काहीही येथे नव्हते. करू नये ते करायचे आणि ते करताना आवश्यक सुरक्षा उपायही योजायचे नाहीत असा हा प्रकार. तो अंगाशी आला. परंतु देवभूमीत ४१ जणांच्या प्राणावर बेतलेले हे संकट अखेर ऑस्ट्रेलियन तज्ज्ञ आणि वर उल्लेखिलेले कामगार यांच्या धडाडीमुळे बोगद्यावर निभावले. झाले ते झाले. पण ते का झाले याच्या चौकशीची घोषणा आता तरी व्हावी. हा बोगदा बांधणाऱ्या कंपनीने काही हयगय केली काय, कामात त्रुटी होत्या किंवा काय आदी मुद्दय़ांची चौकशी तज्ज्ञांकडून होणे गरजेचे आहे. कामगार वाचल्याचा आनंद आहेच, पण त्यांचा जीव संकटात टाकणाऱ्यांचे सत्यही वाचवायला हवे. हे सत्य समोर यावे यासाठी सरकार आग्रह धरेल ही आशा.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial successful rescue of workers stuck in tunnel in uttarakhand for 17 days amy